computer

ऑस्ट्रेलियात जाळींचे साम्राज्य पसरले आहे...त्याचा पावसाशी कसा संबंध आहे?

जुनी घरे, बगीचे किंवा इतर ठिकाणी तुम्ही कोळ्यांची जाळी बघितली असेल. यात विशेष असे काहीही नाही, ही गोष्ट नेहमीची आहे. पण सध्या ऑस्ट्रेलिया या कोळ्यांमुळे त्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतातील गिप्सलँड या भागात सगळीकडे कोळ्यांची जाळी तयार झाली आहेत. आता सिनेमातील स्पायडरची जाळी वेगळी पण इथे तर खरोखरच्या स्पायडर्सनी लोकांच्या नाकी नऊ आणले आहेत. 

गिप्सलँड भागात लाखोंच्या संख्येत कोळ्यांनी जाळी पसरली आहेत. चारी बाजूला हलक्या पांढऱ्या रंगाची चादर अंथरल्यासारखे चित्र दिसत आहे. झाड, मैदान, रस्ते अशा सर्व ठिकाणी ही जाळी दिसत आहेत.

पण एवढ्या मोठ्याप्रमाणात कोळ्यांची जाळी कसे पसरले, काय आहे कारण?

या मागील कारणे समजून घेऊया...

गिप्सलँड भागात प्रचंड पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी पाण्यापासून बचाव करण्यासाठी कोळ्यांनी जमिनीवरून उंच स्थानाकडे आपला मोर्चा वळवला. यात विशेष गोष्ट म्हणजे कोळ्यांनी उंच स्थानावर जाण्याची घटना एकाच वेळी घडली. त्यामुळे जाळींचं एक साम्राज्याच निर्माण झालं.

खालून वर जाताना या कोळ्यांनी आपली जाळी असे विणले की त्यामूळे गिप्सलँडचा पूर्ण परिसर त्यात वेढला गेला. एके ठिकाणी तर ही जाळी एक किलोमीटरपर्यंत सलग पसरलेली आढळून आली आहेत. तज्ञांच्या मते एका आठवड्यानंतर जाळींचं साम्राज्य संपुष्टात येईल. 

व्हिक्टोरिया प्रांतात कोळ्यांची जाळी विणण्याचे काम सहसा हिवाळ्यात सुरू होते. कारण याच काळात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक पाऊस असतो. पाऊस आल्यावर कोळी या प्रकारची बारीक जाळी विणतात. हवेपेक्षा जास्त हलके असल्याने ही जाळी झाडे, रस्ते आणि इतर ठिकाणी चिकटून जातात. त्यांच्या सहाय्याने कोळ्यांना वर जाण्यास मदत मिळते. या जाळींच्या आधारे कोळी जवळपास १०० किलोमीटरचे अंतर पार करतात. 

या घटनेला कारणीभूत असलेले सर्वच कोळी धोकादायक नसले तरी यांच्यातील काही प्रजाती प्रचंड धोकादायक असतात. या कोळ्यांनी चावल्यामुळे आजवर कित्येकजणांचे मृत्यू झालेले आहेत. २००० ते २०१३ पर्यंत जवळपास १२५०० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

तर, कधी ऑस्ट्रेलियात गेलात आणि रस्त्याच्याकडेला अशा जाळी दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.

सबस्क्राईब करा

* indicates required