computer

केक खाल्ल्याने दारू प्यायल्यासारखी नशा चढते? ह्या दुर्मिळ आजाराबद्दल माहित आहे का?

दारू किंवा कोणताही अंमलीपदार्थ न घेता जर नशा चढत असेल आणि या नशेत हातपाय लटपटत असतील तर? तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे घडू शकतं. याला एबीएस सिंड्रोम म्हणतात. एबीएस सिंड्रोम म्हणजे ऑटो-ब्रिव्हरी सिंड्रोम. ६२ वर्षाच्या निक कॅर्सनला हाच सिंड्रोम असल्याने त्याला दारू न पिताही नशा चढते. ऑटो-ब्रिव्हरी सिंड्रोममुळे त्याला असा त्रास होतो, पण याचा उलगडा होण्याआधी त्यालाही कळत नव्हते की नेमके त्याच्या सोबत काय घडते आहे?

एबीएस सिंड्रोम असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे जंतू असतात. या जंतूमुळे त्याच्या शरीरातील कर्बोदके (Carbohydrate) आंबतात. शरीरात कर्बोदके आंबली की त्यातून इथेनॉल तयार होते. हे इथेनॉल लहान आतड्यात जाऊन साठते. ज्यामुळे रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण वाढते आणि व्यक्तीला नशेत असल्याचा अनुभव येतो.

पण हा सिंड्रोम का होतो याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. काही अभ्यासकांच्या मते, मधुमेह किंवा इतर काही जनुकीय बदल, दीर्घकाळ प्रतीजैविकांचे सेवन करणे आणि अतिप्रमाणात कर्बोदकेयुक्त आहार सेवन करणे अशा कारणांमुळे हा सिंड्रोम होतो.

निक इंग्लंडच्या सफोल्क भागातील लोस्टॉफ येथे राहतो. निकची स्वतःची हाउसकीपिंग कंपनी आहे. स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यात हे बदल जाणवू लागले. एकदा त्याने इमारतीच्या स्वच्छतेचे काम घेतले होते. तिथली फरशी स्वच्छ करून झाल्यावर अचानकच त्याला त्रास जाणवू लागला. तब्येत बिघडल्याने तो घरी आला, पण त्याला नेमके असे कशामुळे होते हे डॉक्टरही सांगू शकले नाहीत.

निकच्या या आजाराचे निदान अगदी विचित्र पद्धतीने झाले. निक आणि त्याची पत्नी कॅरेन टीव्हीवरील एक कॉमेडी सीरिअल पाहत होते. त्यातील डॉक मार्टिन नावाचा एपिसोड याच एबीएस सिंड्रोमवर आधारित होता. त्याची बायको करेनला वाटले की निकचा आजारही याच लक्षणांशी जुळणारा आहे. निकला दारू न पिताही का नशा चढते यामागील खरे कारण त्या दोघांनाही तेंव्हा कळले.

निकने खूप मेहनतीने या आजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याला नेहमी स्पंज केक खाण्याची इच्छा होते. या आजारात व्यक्तीला ज्या पदार्थातून कर्बोदके जास्त प्रमाणात मिळतील असा आहार घेण्याचीच जास्तीतजास्त इच्छा होते. म्हणूनच केक खाण्याची इच्छा त्याला नेहमी हतबल करते. कर्बोदकेयुक्त आहार घेतल्यानेच त्याला त्रास होतो, पण त्याला कर्बोदकेयुक्त पदार्थ खाल्ल्याशिवाय चैनही पडत नाही. थोडक्यात दारूचे व्यसन नाही पण त्याला कर्बोदकांचेच व्यसन लागले आहे. कर्बोदकांचे सेवन टाळण्यासाठी तो गेली कित्येक वर्षे किटो डाएट फॉलो करत आहे.

निक सांगतो, “काही क्षणांपूर्वी मी शांत वाटत असतो आणि काही क्षणातच असा काही बदल होतो की वाटावे याने किती दारू घेतली आहे, कुणास ठाऊक? असा अचानक बदल झाल्याने मला शारीरिक आणि मानसिक पातळीवर काय त्रास अनुभवावा लागतो ते मी शब्दात नाही सांगू शकत. जोपर्यंत यामागचे नेमके शास्त्रीय कारण माहित नव्हते तोपर्यंत तर या सगळ्या प्रकाराचे एक विचित्रच दडपण होते. पण, यामागचे नेमके कारण कळल्यापासून आम्ही दोघेही म्हणजे मी आणि माझी पत्नी याबाबत अधिकाधिक माहिती शोधून त्याबद्दल लोकांना सांगत असतो. यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याकडेही आमचे कटाक्षाने लक्ष असते. परंतु, चुकूनही कर्बोदके युक्त आहार घेतला गेला तर हमखास हा त्रास जाणवतो.” सुरुवातीला निकला यामुळे प्रचंड मानसिक तणाव सहन करावा लागला.

निकची पत्नी कॅरेन यासाठी नेहमीच त्याच्यावर लक्ष ठेवून असते. कारण, त्याला अचानक कधी नशा चढेल सांगता येत नाही. कॅरेन म्हणते, “यामुळे तो मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ होतो. त्याचे स्वतःवरील नियंत्रणच कुणीतरी हिरावून घेतल्यासारखे त्याला वाटते.”

दोघेही नवरा बायको या आजाराबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. असा प्रसंग वारंवार येणार नाही, याबद्दलही ते दक्ष असतात. या आजाराबद्दल आम्ही अधिक माहिती मिळवल्यानेच त्यांना या आजाराशी सामना करता आला.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required