दिनविशेष : कलामहर्षी बाबुराव पेंटर जयंती

मुळचे कोल्हापूरचे असलेले बाबुराव मेस्त्री उर्फ कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून १८९० साली झाला. बाबुराव पेंटर हे गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे कलाक्षेत्रात ठसा उमटवून गेले. मुळात वडिलांकडून मिळालेल्या शिल्पकला, चित्रकलाचे धडे पुढे जाऊन त्यांना कलाक्षेत्रातील शिक्षण घेतलेलेले नसतानाही उत्तम कलाकृती घडवण्यास कामी पडले. १९३० साली त्यांनी रंगवलेले सिनेमांचे पोस्टर्स पाहून तत्कालीन जे. जे. स्कूल च्या संचालकांनी त्यांचा सत्कार केला होता. कोणतेही शिक्षण घेतले नसताना रंग, रंगांचे मिश्रण तसेच चित्रकलेतील तंत्रकौशल्य याची त्यांना उत्तम जाण होती. चित्रकला, शिल्पकला, ते १९१३ साली दादासाहेबांनी आणून घातलेला चित्रपट अश्या तीनही कलांवर बाबुराव पेंटर यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

बाबुराव मेस्त्री ते कलामहर्षी बाबुराव पेंटर या प्रवासात त्यांच्या वडिलांबरोबर आतेभाऊ आनंदराव पेंटर यांचा देखील महत्वाचा वाटा होता. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. १ डिसेंबर १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली याच कंपनीच्या अंतर्गत तयार झालेला पहिला स्त्री पात्रे असलेला चित्रपट म्हणजे ‘सैरंध्री’ हा पुण्यातील ‘आर्यन’ थिएटरमधे ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. त्यातील भीम आणि कीचक यांच्यातील द्वंद्व पाहून थियेटर मधील प्रेक्षक बेशुद्ध पडले होते. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नसलेल्या काळात ते दृश्य जिवंत चित्रित करण्यात आले होते. चित्रपटातील फ्लॅशबॅक पद्धत वापरणारे पहिले दिग्दर्शक म्हणजे बाबुराव पेंटर. ‘सावकारी पाश हा फ्लॅशबॅक पद्धत वापरून तयार केलेला मूकपट परदेशात प्रदर्शित झालेला भारतातील प्रथम चित्रपट ठरला.

दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटाचा पाया रचला तर बाबुराव पेंटरांनी त्याला कलात्मकतेचा रंग चढवला असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्याच तालमीत तयार झालेले व्ही शांताराम, एस. फत्तेलाल, विष्णुपंत दामले व केशवराव धायबर यांनी तो वारसा पुढे चालविला.

अशा अष्ठपैलू कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना त्यांच्या जयंती निमित्त बोभाटा.कॉम तर्फे शत शत नमन.

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required