बंगलोरच्या शास्त्रज्ञाने हाती घेतलेली झाडांना खिळेमुक्त करण्याची मोहीम काय आहे?

सहज रस्त्याने येता जाता तुमचे कधी लक्ष गेले आहे का, झाडांवर कधी जाहिराती किंवा कधी बॅनर लावलेले दिसतात. झाडाच्या मोठ्या खोडावर बऱ्याचदा वरपासून जाहिरातींचे कागद लावलेले असतात. साधारण शाळांच्या जवळपास झाड असेल तर त्यावर निरनिराळ्या क्लासेसच्या जाहिराती दिसतात. जवळपास व्यायामशाळा असेल तर तिथल्या झाडावर जिमच्या ऑफरबद्दल माहिती असते.
घरगुती पोळी-भाजी डबे, घरबसल्या दहा हजार कमवा, कॉल सेन्टर, पाळणाघरे, दोन दिवसांत इंग्लिश बोला, कुठल्याश्या दुर्धर आजारावरच्या जालीम उपायासाठी संपर्क करा, अशा एक ना अनेक जाहिराती आपण वाचल्याच असतील. अनेकदा दोन शेजारच्या झाडांच्या खोडावर मोठे बॅनर ही लावलेले दिसतात. आपण जाहिरात वाचून विसरून जातो किंवा सोडून देतो. पण कधी विचार केलाय का हे त्या झाडांसाठी किती घातक असेल...
या जाहिराती खिळ्यांनी ठोकून झाडांवर लावलेल्या असतात आणि लावलेली जाहिरात निघू नये म्हणून झाडांना खिळे तसेच पिन्सही टोचल्या जातात. काही दिवसांनी त्या जाहिराती फाटतात, पण ठोकलेले खिळे आणि पिन्स तशाच टोचलेल्या अवस्थेत राहतात. त्या झाडांना तर इजा करतातच, पण एखाद्या अपघातालाही कारणीभूत ठरू शकतात. कायद्याने अशा जाहिरातींना बंदीही आहे. तसेच या खिळ्यांमुळे झाडाचे आयुष्य ६० ते ७०% कमी झाल्याचेही दिसून आले आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्यातील बहुतेकांनी कधीच विचार केलेला नसेल, पण बंगलोरच्या एका अवलियाने हा विचार केला. नुसता विचारच नाही तर त्याने त्याविरोधात कामही सुरु केले.
त्यांचे नाव आहे विनोद कर्तव्य. विनोद कर्तव्य हे बंगलोर मध्ये डीआरडीओमध्ये सहाय्यक वैज्ञानिक म्हणून काम करतात. एकदा झाले असे की एकदा ते बाईकवरून त्यांच्या मित्रांसोबत जात असताना त्यांना फोन आला. त्यांनी बाईक झाडाजवळ लावली आणि फोन उचलला, बोलताना खाली वाकले तर त्यांच्या डोक्याला खिळा लागला. त्यांनी पाहिले तर त्या झाडावर ठोकलेला खिळा त्यांना टोचला होता. अजून बारकाईनं पाहिल्यावर लक्षात आले की त्या झाडावर जवळपास २५ ते ३० खिळे व पिन्स ठोकलेल्या आहेत. हे पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की हे खिळे त्वरित काढून टाकायला हवेत. त्यांनी त्यांच्या मित्रांनाही यात सहभागी करून घेतले.
१ नोव्हेंबरपासून विनोद आणि त्यांचे पाच मित्र दर रविवारी एक भाग निवडतात आणि तिथे जाऊन प्रत्येक झाडाला खिळे, पिन्स तसेच त्यावर लावलेल्या जाहिराती आणि बॅनर यांपासून मुक्त करतात. पहिल्याच दिवशी त्यांनी बंगलोरच्या विठ्ठलमल्ल्या रोड वरील १० झाडांमधून ४० खिळे आणि ५०० स्टेपल पिन्स काढल्या.
एका महिन्यात म्हणजे २९ नोव्हेंबरपर्यंत विनोद आणि त्यांच्या मित्रांनी दर रविवारी जवळपास ४० झाडांना खिळेमुक्त केले आहे. विनोद म्हणतात, "मागच्या रविवारी आम्ही KG रोड येथील झाडांवरून जवळपास १ ते २००० हजार पीन्स आणि २५० खिळे काढले. आम्हाला फक्त सात झाडे स्वच्छ करण्यासाठी तीन तास लागले. वृक्ष संरक्षण कायदा आणि बंगळुरू महानगरपालिका अधिनियमानुसार झाडांवर बिल लावणे बेकायदेशीर असले तरी या कायद्याची अंमलबजावणी करताना कोणी दिसत नाही."
त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर "nails free trees" हे चॅलेंजही सुरू केले आहे. या चॅलेंजमध्ये झाडावरचे खिळे, पिना, जाहिराती काढून स्वच्छ झाडासोबत फोटो शेयर करायचा आहे. हा चॅलेंज सुरु झाल्यापासून अनेकांनी आपले फोटो शेअर केले आहेत. लोकांकडून चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. विनोद यांना आशा आहे की आणखी लोक या अभियानात सामील होतील आणि झाडांना बंधनमुक्त करतील. पर्यायाने निसर्गाचा ऱ्हासही थांबवतील.
विनोद कर्तव्य यांच्या प्रयत्नांना बोभाटाकडून सदिच्छा...
लेखिका : शीतल अजय दरंदळे