१ ऑगस्ट पासून बँकिंग क्षेत्रात हे ४ मोठे बदल होणार आहेत....सविस्तर माहिती पाहून घ्या!!

जुलै महिना लवकरच संपणार आहे. ऑगस्टपासून अनेक नवीन बदल होत आहेत. यात बँकांशी संबंधित काही नवीन बदलांचा अंतर्भाव आहे. ग्राहकांना काही नियमांमुळे मदत होते, तर काही नियम खिशाला कात्री बसणारे असतात. सर्वात मोठा बदल हा तुमच्या पगाराशी, निवृत्तीवेतनाशी, ईएमआयशी संबंधित आहे. १ ऑगस्टपासून बँकिंगशी संबंधित काही नियम बदलत आहेत याची माहिती आपण घेऊयात. हे नियम आधीच माहीत असले म्हणजे काही अडचण होणार नाही.
१ ऑगस्टपासून एक स्वागतार्ह नियम बदलत आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊस (NACH) यंत्रणा सात दिवस चालू ठेवण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे तुम्ही आपले बँकेतले बरेच व्यवहार रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी देखील करु शकता. याशिवाय बदललेले नियम खालीलप्रमाणे आहेत.
एटीएममधून पैसे काढणे
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार आता ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा ५ मोफत व्यवहार म्हणजे withdraw करू शकतात. त्यानंतर प्रत्येक वेळेला पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाईल. आरबीआयने आर्थिक व्यवहारांसाठी १५ ते १७ रुपये आणि इतर बिगर आर्थिक व्यवहारासाठी ५ ते ६ रुपयांची वाढ केली आहे.
पगार सुट्टीच्या दिवशीही येईल
आता पगार होण्यासाठी, पेन्शन आणि ईएमआय पेमेंटसाठी कामकाजाच्या दिवसांची वाट बघण्याची गरज लागणार नाही. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा ही कामे शक्य आहेत. आरबीआयने नॅशनल ऑटोमेटेड क्लीयरिंग हाऊस (NACH) चे नियम बदलले आहेत. NACH मध्ये NPCI ही पेमेंट सिस्टम आहे. यामधून डिव्हिडंड, व्याज, पगार आणि पेन्शन यासारख्या विविध प्रकारचे पेमेंट होत असतात. सध्या ही सेवा फक्त कामकाजाच्या दिवसांसाठी आहे. पण १ ऑगस्टपासून ही सेवा सात दिवसांसाठी असेल. म्युच्युअल फंड, एसआयपी, घर-कार किंवा वैयक्तिक कर्जाचा मासिक हप्ते (ईएमआय) त्याचप्रमाणे यात टेलिफोन, गॅस आणि विजेची बिले भरणे देखील समाविष्ट आहे.
ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी नियम
आयसीआयसीआय बँकेत दरमहा ४ वेळा मोफत आर्थिक व्यवहार करता येतात . म्हणजे महिन्यातून फक्त ४ वेळा खात्यातून पैसे काढता येतात. जर कोणी ४ वेळापेक्षा जास्त पैसे काढले तर त्याला प्रत्येक व्यवहारासाठी १५० रुपये द्यावे लागतील. आयसीआयसीआय बँकेने दरमहा १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार निश्चित केले आहेत. त्या वरील व्यवहारांसाठी तुम्हाला दरमहा पाच रुपये शुल्क भरावे लागेल.
IPPB बँकिंग घरपोच सेवा सशुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) यांनी या महिन्याच्या सुरूवातीस जाहीर केले आहे की जे ग्राहक घरपोच सेवा वापरतात त्यांना आता अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. १ ऑगस्टपासून आता घरपोच बँकिंग सेवेसाठी २० रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क लागू होईल. सध्या ही सेवा मोफत आहे. तसेच आयपीपीबीने हेही सांगितले आहे की जेव्हा आयपीपीबीचा सेवक घरी भेट देईल तेव्हा एका भेटीत व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा येणार नाही.
बँकिंग व्यवहार आधी मोफत असतात, नंतर त्यावर शुल्क आकारले जाते. त्यामुळे ग्राहकांनी याची माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. ही माहिती सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका.
लेखिका: शीतल दरंदळे