computer

बार्कलेज बँक म्हणते येणार्‍या काळात भारताचा जीडीपी विकासाचा दर शून्य टक्के असेल. वाचा काय म्हणते बार्कलेज बँक !!

होय, सगळ्या भारतीय जनतेला खात्री आहे की आपण सध्याच्या अक्काबाईच्या फेर्‍यातून बाहेर पडू. पण त्यानंतरच्या आर्थिक भोवर्‍यातून आपण कसे बाहेर पडणार हा सर्वात गहन प्रश्न सगळ्यांना छळतो आहे. ज्याला 'गळवावरती फोड' असे म्हणता येईल अशी ही परिस्थिती आपल्यासमोर उभी राहणार आहे. 

२००८ च्या 'सब प्राईम'च्या घोटाळ्याने आलेल्या मंदीत अमेरीकेसारखे देश पोळले पण आपली अर्थव्यवस्था सुखरुप होती. पण येणारा भविष्यकाळ थोडा वेगळा आहे. सगळं जग मंदीच्या दिशेने जाणार आहे असा अर्थतज्ञांचा होरा आहे. आपण आपल्यापुरता विचार केला तर अनेकांचे अनेक अंदाज आहेत . 

आर्थिक विकास दर शून्य म्हणजे नक्की काय ? 

कालच बार्कलेज बँक या अर्थसंस्थेने जो अंदाज वर्तवला आहे तो असा आहे की भारताचा आर्थिक विकास दर या वर्षी शून्य टक्के असेल. पण आर्थिक विकास दर शून्य म्हणजे नक्की काय ? 

आपलं दिवाळं वाजणार आहे ? नाही.

महागाई वाढणार आहे ? अंशतः वाढेल.

नोकर्‍या जातील ? काही क्षेत्रात जातील तर काही क्षेत्रात  पगार आणखी काही वर्षे कमी होतील.

नक्की काय काय होऊ शकेल हे सांगणे म्हणजे कुडमुड्या ज्योतिषावर भरवसा करणे होईल.

बार्कलेज बँक 'म्हणजे अगदी 'अंदाजपंचे दाहोदरसे' वर्तवणारी संस्था नाही. चला तर समजून घेऊ या सगळं काही . कदाचित बर्‍याचजणांना येणार्‍या काळात कसे तग धरून राहायचे याची कल्पना येईल. 

जीडीपीचे गणित

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी जे संख्यात्मक साधन असते त्याला जीडीपी असं म्हणतात.  Gross Domestic Product या संकल्पनेचे ते लघुरुप आहे. मराठीत वार्षिक सकल उत्पन्न असे म्हणतात. मराठीत काय किंवा इंग्रजीत काय भाषा बदलून त्याचा खरा अर्थ समजणार नाही. त्यासाठी या मोजमाप करणार्‍या संख्येची गणितीय उत्पत्ती कशी होती ते बघू या.

एका विशिष्ट कालवधीत देशाने निर्माण केलेल्या उत्पादनांची आणि सेवांचे आंतराष्ट्रीय चलनातले मूल्य म्हणजे जीडीपी. इथे विशिष्ट कालावधी म्हणजे आर्थिक वर्षं असे गृहीत धरू या. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी काय मूल्य असेल त्यावर आपला विकास दर अवलंबून असेल. आता तुमच्या हे लक्षात आले असेल की या संख्या तुलनात्मक असतील कारण कोणते तरी एक वर्षं बेस (आधारवर्ष) धरून हे मोजमाप केले जाते. सध्याच्या जीडीपीचे गणित २०११ हे आधारवर्षं धरून करण्यात येते.

आता हे काम कोण करते तर केंद्रीय सांख्यिकी संस्था’ (Central Statistics Office ) या सरकारी विभागाचे हे काम आहे. पण ही संख्या अधिकृत सरकारी  प्रमाणसंख्या झाली. याखेरीज इतर म्हणजे वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनीटरी फंड, आंतराष्ट्रीय गुंतवणूकदार इतकेच काय तर अमेरीकेतली सी.आय.ए. सारखी गुप्तचर संस्था पण जीडीपीचे गणित मांडत असते. 

फॉर्म्युला एकच असतो

सगळ्यांचा फॉर्म्युला एकच असतो तो असा C (Consumption ) + I (Investment) + G (Government Spending) + (X (Export) – M (Import ) 
आता सध्याची परिस्थिती काय आहे ते बघा. 

१ ) Consumption कमी आहे.

२) Investment कमी आहे 

३ ) Government Spending प्रचंड प्रमाणात वाढले आहे आणि वाढणार आहे.

४ ) Export) – M (Import )- एक्स्पोर्ट जवळजवळ बंद आहे आणि इंपोर्टही कमी आहे. आपले काही इंपोर्ट जे नेहेमी अर्थव्यवस्थेला सतवत असतात ते म्हणजे क्रूड आणि सोने. हे दोन्ही सध्या कमी आहेत. किंबहुना हीच काय ती सध्याची जमेची बाजू आहे. 

पण हे सगळे गेल्या दोन महीन्यातील बदल आहेत. त्यापूर्वी काय स्थिती होती किंवा काय अपेक्षीत  विकास दर होता तेही बघणे आवश्यक आहे. जानेवारीत जाहीर झालेल्या आकडेवारीप्रमाणे विकासाचा दर ६.९ टक्क्यावरून घसरून ४.९ ते ५.० टक्क्यावर घसरणे अपेक्षीत होते. त्यानंतर आलेल्या संकटामुळे हा आकडा २.० ते २.०५ पर्यंत घसरेल असा अंदाज होता पण बार्कलेजच्या मते आता विकासदर शून्य टक्के असेल.

बार्कलेज असे का म्हणते आहे ?

बार्कलेज असे का म्हणते आहे ?
सुरुवातीच्या अनुमानाप्रमाणे या साथीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला १२० बिलीयन डॉलरचा फटका बसणे अपेक्षीत होते. आता जसजसा या साथीचे आवाका वाढतो  आहे ते लक्षात घेतले तर आपल्या अर्थव्यवस्थेला २३४.४ बिलीयन डॉलरचा फटका बसणार आहे.
 या आकड्यांचे गांभीर्य समजायचे असेल तर लक्षात घ्या की एक बिलीयन म्हणजे १०० कोटी आणि एका डॉलरची रुपयातील आजची किंमत रुपये ७६ आहे. आता उरलेले गुणाकार केले तर पोटात गोळा उभा राहील .
पण हे असेच होईल का ? तर त्याचे उत्तर असे आहे परिस्थिती गंभीर असली तरी या आ़कड्यात भारतीय जनतेची सहनक्षमता, भारताच्या नागरीकांची मानसिकता  नागरीकांची  परिवर्तन क्षमता या बाबी या आकड्यात अंतर्भूत नाहीत . 

आपल्या सामूहिक ताकदीचे एक उदाहरण

काही उदाहरणे बघू या.
१ )१९४८-१९६२-१९६५-१९७१ यासारख्या युध्दातून,  अनेक अवर्षण आणि दुष्काळाचे फटके सोसूनही आपला जीडीपी वाढतो आहे. १९७२ साली आपण मदत म्हणून मिळालेल्या पीएल ४८० योजनेचा लाल गहू आणि लाल ज्वारीवर गुजराण केली पण पुढच्या दशकात आपण अन्नक्षेत्रात स्वयंपूर्ण झालो. 

२ ) विदेशी चलनासाठी १९९१ नंतर सोने विकून आपल्याला खर्च चालवायला लागला होता पण त्यानंतरच्या काळात अशी वेळ पुन्हा कधीच आली नाही. आताही रिझर्व बँकेकडे पुरेसे परकीय चलनाचा साठा आहे.

३) भारतीय बौध्दीक संपदेचे मूल्य या आकड्यात गृहीत धरलेले नसते.विदेशात असलेल्या भारतीय नागरीकांच्या माध्यमातून म्हणजे १९७० नंतर मध्यपूर्व आणि त्यानंतर अमेरीका युरोप कॅनडा  येथे स्थायिक असलेल्या भारतीयांमुळे  अनेक राज्यांचा आर्थिक स्तर उंचावल आहे. पंजाब, महाराष्ट्र, केरळ , गोवा, आंध्र प्रदेश ही काही ठळक उदाहरणे आहेत. गेल्या दहा वर्षात जगाचा असा एकही कोपरा नाही जेथे भारतीय नागरीक नाहीत.

४) जेव्हा इतर पुढारलेल्या देशात सार्वजनीक वैद्यकीय सेवेचा फजीतवाडा उडला आहे त्याच काळात आपल्या सार्वजनीक वैद्यकीय सेवा व्यवस्थित काम करत आहेत.

५) सगळ्यात शेवटची जमेची बाजू म्हणजे परिवर्तनशिलता आणि सामाजिक शिक्षण- १९८२ साली इतर देशात जेव्हा एड्स पसरत होता तशीच सुरुवात भारतात पण झाली होती. परंतू केवळ सामाजिक शिक्षणातून आपण वेळीच बचावलो. सध्या भारतात एड्सचे रोग्यांची संख्या अत्यंत कमी आहे. थोडक्यात भारतीय नागरीक वेळीच शहाणे होतात.

आपल्या सामूहिक ताकदीचे एक शेवटचे उदाहरण देतो आहे ते असे.  इंदीरा गांधी पंतप्रधान असताना १९८३ साली एशियाड स्पर्धा भारतात घेतल्या गेल्या. या स्पर्धांची तयारी बघण्यासाठी आंतरराष्ट्रीय पथक जेव्हा आले तेव्हा कामाचा विकास बघून ते नाराज झाले आणि काम वेळेत पूर्ण होणार नाही असे त्यांना वाटत होते. परंतू भारतीय मनुष्यबळावर भरवसा असलेल्या पंतप्रधानांनी अशी ग्वाही दिली की तुमच्याकडे जे काम यंत्राने होते ते भारतात मनुष्यबळावर होते. त्याची प्रचिती जगाला आपोआपच आली.

आर्थिक नियोजन

तर आता पुन्हा बार्कलेजच्या अहवालाकडे वळू या.

त्यांच्या अनुमानाने सरकारने वेळीच उचललेली पाऊले या धक्क्यातून उद्योगांना सवरू शकतात. याला 'स्टिम्युलस' असेही म्हणतात. सोबत नागरीकांनी उचललेली पावले पण महत्वाची असतील.

सोबतच मान्सूनचे  वारे हवे तसे वळले तर आर्थिक उलाढालीत फरक पडू शकेल.

बोभाटाच्या वाचकांना काही खास सूचना: येणारा काळ आर्थिक आणि सर्वसाधारण नियोजनाच्या दृष्टीने फार महत्वाचा असेल. बोभाटाने आर्थिक नियोजनाचा भाग म्हणून एक खास प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीची उत्तरेच तुम्हाला आर्थिक नियोजनात मदत करतील. सर्वसाधारण नियोजनाचा भाग म्हणून एक पुस्तिका आम्ही बोभाटावर प्रसिध्द करू त्याचाही वाचकांनी फायदा घ्यावा.

सबस्क्राईब करा

* indicates required