बस्तरमधल्या लोकांनी तयार केलीय बांबूची सायकल!! ती किती वजन पेलू शकते ते ही पाहा!

बस्तर हे नाव वाचल्याबरोबर येथे नेहमी होणाऱ्या नक्षलवादी कारवाया डोळ्यासमोर येतात. यावेळी मात्र छत्तीसगड राज्यातील हे ठिकाण एका चांगल्या गोष्टीसाठी बातम्यांमध्ये आले आहे. येथील लोकांनी बांबूची सायकल तयार केली आहे. लोखंड, तागाचा धागा आणि कांस्यधातू वापरून नवी कोरी सायकल उभी करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यानंतर इथे नेचरस्केप नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पाच्या नावातच निसर्गाच्या जवळ जाणे हा हेतू स्पष्ट होते. या प्रकल्पाचे सहसंस्थापक असिफ खान सांगतात, " स्थानिक लोकांची हातकाम कला ही जुन्या काळापासून त्यांना निसर्गाशी जोडून ठेवणारी आहे. हस्तकला ही येथील लोकांच्या जगण्याचा भागच आहे."

पुढे ते असेही नमूद करतात, 'आम्ही गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पावर काम करत आहोत. आम्ही या सायकल डिजाईनवर थोड्या वेगळ्या पद्धतीने काम केले. ही सायकल सुरक्षित आणि आरामदायी कसे बनवता येईल हा मुख्य प्रयास होता. या सायकलीला १०० किलोग्राम वजन सहन करण्याच्यादृष्टीने तयार केले आहे."

ही बांबूची सायकल फक्त ८ किलो वजनाची आहे. बाजारात मिळणारी सायकल सरासरी १८ किलो वजनाची असते. त्या मानाने ही सायकल खूपच हलकी म्हणावी लागेल. एक सायकल तयार करण्यासाठी जवळपास २० दिवस लागतात. या बांबूला योग्य तयार करण्यासाठी अनेक प्रक्रिया करण्यात येतात. त्यातून गेल्यावर ही सायकल तयार केली जाते.

सध्या या सायकलची किंमत ३५ हजार ठेवण्यात आली आहे. पुढे जाऊन महिलांसाठी सुद्धा सायकल तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required