पाटणा रेल्वे स्टेशनवर भीक मागून जगणारी अनाथ मुलगी आता कॅफे चालवते, स्वत:च्या पायावर उभी आहे!!

स्त्री भ्रूणहत्या किंवा जन्माला आलेली मुलगी सोडून देणे हा खरंतर संवेदनशील मनाला त्रास देणारा विषय. पण तरीही अशा घटना देशाभरात घडत असताना आपण नेहमी वाचत असतो. जन्म झाल्याबरोबर सोडून दिलेल्या मुलींचे भविष्य कसे असेल हा विचार येऊनही धस्स होते. त्यात काहींचे एखादी एनजीओने पालनपोषण करते, इतरांच्या वाट्याला तुलनेने वाईट दिवस येतात.

भिकाऱ्यांच्या हाती या मुली लागल्या तर त्यांना पण आयुष्यभर भीक मागावी लागेल हा विचार अनेकांच्या मनात येऊन जातो. अशीच काहीशी कहाणी असलेली एक मुलगी मात्र कुणालाही अभिमान वाटेल असे काम करत आहे.

ज्योती ही १९ वर्ष असलेली मुलगी आजवर आपले आईवडील कोण आहेत हे जाणून घेऊ शकलेली नाही. आईवडिलांनी सोडून दिले आणि एका भिकारी दाम्पत्याला ती पटना रेल्वे स्टेशनवर सापडली. त्या भिकारी जोडप्याला या मुलीची काही विशेष माहिती नव्हती. साहजिकच ज्योतीचे बालपण देखील भीक मागण्यात गेले. भीक मागून पुरेसे पैसे मिळत नाहीत हे समजल्यावर तिने कचरा वेचायचेसुद्धा काम केले.

ज्योतीला मात्र आजूबाजूला शिकणाऱ्या मुली दिसत होत्या. शिक्षणाचे महत्व तिला कळून चुकले. लाख अडचणींवर मात करून तिने कसेबसे शिक्षण सुरू केले पण तिला वाढवणारी तिची आई मरण पावली. एवढ्या अडचणी येऊनही ज्योतीने मात्र हिंमत सोडली नाही. असे म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग तसेच रॅम्बो फाऊंडेशन नावाची एनजीओ तिच्या आयुष्यात देवदूत बनून धावून आली.

रॅम्बो फाउंडेशनच्या बिहारच्या प्रमुख विशाखा कुमारी सांगतात, पटना शहरात अनाथ आणि गरीब मुलांना शिकवण्यासाठी ५ सेंटर्स चालवली जातात. रॅम्बो फाउंडेशनमध्ये गेल्यावर ज्योतीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तिने चांगल्या मार्क्सने पूर्ण केले. पुढे तिने उपेंद्र महारथी इन्स्टिट्यूटमधून मधुबनी पेंटिंग शिकून घेतली.

ज्योती आता आधुनिक जगाचे अभ्यासातून निरीक्षण करत होती. आज ती एका कॅफे चालवण्याच्या जॉबवर आहे. दिवसभर कॅफे चालवायचा आणि रात्री अभ्यास करायचा असा तिचा दिनक्रम आहे. ज्योती स्वतःच्या कमाईने भाड्याच्या घरात राहते. तिला अजून शिक्षण घ्यायचे असून मार्केटिंग या क्षेत्रात करियर करायचे आहे.

देशभर कित्येक मुली या ज्योतीसारख्या अतिशय वाईट परिस्थितीतून जात असतात. पण ज्योतीने आज इच्छाशक्तीच्या जोरावर इथपर्यंत मजल मारली आहे. ज्योती आज खरोखर देशभरातील सर्वच लोकांसाठी प्रेरणा आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required