computer

सामन्यातील असामान्य - भाग २: मरणाच्या दारात असेपर्यंत रुग्णांची सेवा करणाऱ्या इंदौरच्या पहिल्या डॉक्टर....

डॉ. भक्ती यादव या इंदूर शहरातल्या पहिल्या डॉक्टर! त्यांच्या कार्याची नोंद घेऊन भारत सरकारने २०१७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. मात्र त्याच वर्षी त्यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी त्या हे जग सोडून गेल्या. ९४ वर्षे वय असलं तरी मृत्यूच्या वर्षभर अगोदरपर्यंत त्या रुग्णांची सेवा करत होत्या. देशभर डॉक्टर दादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या डॉक्टरांची माहिती देण्यासाठी आजचा हा लेख प्रपंच!!

आज सामन्यातील असामान्य मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण डॉ. भक्ती यादव यांच्या कार्याबद्दल वाचणार आहोत. त्यांचं कार्य वाचून आपल्यालाही प्रेरणा मिळेल यात शंका नाही.

त्यांचा जन्म उज्जैनजवळ १९२३ साली एका मराठी कुटुंबात झाला होता. एमजीएमच्या पहिल्याच बॅचमधील एकमेव महिला म्हणून त्यांना गौरविण्यात आहे. त्याचप्रमाणे डॉ. यादव या त्याकाळी मध्यभारतातील एमबीबीएससाठी निवड झालेल्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. 

डॉ यादव यांना सरकारी रुग्णालयात नोकरी मिळाली होती. पण ती नाकारत त्यांनी खासजी रुग्णालय सुरू केले. पण यामागील त्यांची भावना मात्र पैसे कमावण्याची नाहीतर गरिबांवर मोफत उपचार करता यायला हवा ही होती. डॉ यादव या त्यांच्याकडे येणाऱ्या श्रीमंत रुग्णांकडून फी घेत असत तर गरिबांचा उपचार निशुल्क केला जात असे. 

त्या १९४८ सालापासून स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात तब्बल दीड लाखाहून अधिक प्रसूती केल्या आहेत. यातील एकाही प्रसूतीचे त्यांनी  पैसे आकारले नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य.

डॉ यादव यांच्या याच कार्यामुळे त्यांना संपूर्ण आयुष्यात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. डॉ यादव यांना म्हणूनच सगळीकडे प्रेमाने डॉक्टर दादी म्हटले जाऊ लागले. त्यांचे कार्य उल्लेखनीय असण्यामागे मोठं कारण म्हणजे त्यांनी कुठली मोठी संस्था किंवा चळवळ न उभारता स्वतःपुरते आयुष्यभर रुग्णांची सेवा करत राहिल्या. तसेच आयुष्याच्या शेवटापर्यँत त्या आपल्या कामात सक्रिय होत्या. यावरून वैद्यकीय व्यवसायावर असलेले त्यांचे प्रेम देखील स्पष्ट होते.

अशा या एका महान भारतीयाला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required