computer

आयुष्याने दिलेल्या संधीचे सोनं कसं करावं? बिल गेट्सच्या आयुष्यातली हि घटना आपल्या सगळ्यांसाठी एक चांगला धडा आहे

जगभर पसरलेल्या प्रचंड कर्तृत्व आणि यशाचे धनी असलेल्या लोकांच्या यशामागे त्यांची मेहनत, हुशारी, व्यवहारी स्वभाव अशा अनेक गोष्टी असतात. या यशस्वी लोकांचा यशस्वी होण्यामागील प्रवास आपण नेहमी प्रेरणादायी म्हणून वाचत ऐकत असतो. पण अनेक यशस्वी लोकांमध्ये एक महत्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे त्यांना संधी मिळते आणि ते मिळालेल्या संधीचे सोनेही करतात. सगळ्यांनाच संधी मिळते असेही नाही आणि संधी मिळाली तरी तिचं काय करायचं हे ही काहींना उमगत नाही.

अनेक यशस्वी लोकांमध्ये हो गोष्ट दिसून येते. मिळालेली संधी भविष्याचा अंदाज घेऊन स्वीकारणे आणि त्या संधीतून हळूहळू करत मोठे साम्राज्य उभारणे सगळ्यांना जमत नाही. ज्यांना जमते ते यशस्वी म्हणून मोजले जातात.

बिल गेट्स हा जगातील कित्येक वर्ष सर्वाधिक श्रीमंत राहिलेला माणूस आहे. मायक्रोसॉफ्ट ही त्याची कंपनी आजही अब्जावधी रुपयांचा टर्नओव्हर करत असते. आजवर बिल गेट्सच्या अनेक यशस्वी गोष्टी तुम्ही वाचल्या-ऐकल्या असतील. मात्र आज त्याला मिळालेली संधी आणि त्या संधीचे त्याने कसे सोने केले ही गोष्ट तुम्ही वाचणार आहोत.

बिलचा जन्म १९५५ सालचा. बिल आठवीत गेला. तोवर इतर मुलांसारखे त्याचे आयुष्य सुरू होते. पण १९६८ साली त्याला लेकसाईड स्कुल या शाळेत टाकण्यात आले. तर योगायोगाची मालिका इथून सुरू होते. ही अशी शाळा होती जिथे कॉम्प्युटर्स होते. तो काळ असा आहे की, त्या काळात अगदीच एखाद-दुसऱ्या शाळेत कॉम्प्युटर होते. अगदी मोठया विद्यापीठांमध्ये पण तेव्हा कॉम्प्युटर्स असायचेच असे नाही.

बिल गेट्सच्या शाळेत कॉम्प्युटर आले तरी शाळेत काय तो एकटा विद्यार्थी नव्हता. पण आधी म्हटल्याप्रमाणे मिळालेल्या संधीचे सोने करणारे यशस्वी होतात. बिलच्या अभ्यासक्रमात कॉम्प्युटर्स अनिवार्य होता असेही काही नव्हते. बरोबरीची मुले याकडे दुर्लक्ष करत असताना बिल मात्र मिळेल तितका वेळ या कॉम्पुटरसमोर बसून राहत असे.

आता दुसरा योगायोग बघा. याच शाळेत पॉल एलन नावाचा अजून एक विद्यार्थी होता. यालाही कॉम्प्युटरचे प्रचंड वेड होते. मग काय दोघांची चांगलीच गट्टी जमली. पुढे जाऊन याच दोघानी मिळून बलाढ्य मायक्रोसॉफ्ट उभी केली. हा इतिहास वेगळा सांगण्याची गरज नाही.

पॉल आणि बिल यांनी मिळून कॉम्प्युटरवर प्रतिभा मिळवली. बिलने तेथे असतानाच पहिला प्रोग्राम लिहिला होता. जेव्हा कॉम्पुटर काय असतो हे कुणाच्या गावीही नव्हते, त्यावेळी बिल प्रोग्राम्स लिहायला लागला होता. टेक्नॉलॉजीत घेतलेली ही आघाडी त्याने कायम टिकवून ठेवली आणि याचा थेट फायदा त्याला आयुष्यभर झाला.

पुढे ज्या शाळेत तो कॉम्प्युटर शिकला त्याच शाळेत २००५ साली त्याला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी तो जे बोलला ते एकाचवेळी त्याची शाळेबद्दल असणारी कृतज्ञता आणि मिळालेल्या संधीचा सदुपयोग करणे किती महत्वाचे असते हे सिद्ध करते. बिल म्हणतो, 'जर मी या लेकसाईड स्कूलमध्ये आलो नसतो तर कदाचित आज मायक्रोसॉफ्टही उभी राहिली नसती'.

आयुष्य संधी देत असते, मात्र ही संधी ओळखून भविष्याकडे पाऊल टाकणारे यशस्वी होतात हेच बिलच्या आयुष्यातील या घटनेकडे बघून म्हणता येऊ शकते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required