साहित्याचं नोबेल पारितोषिक प्रथमच एका गीतकाराला- बॉब डीलन बनला नोबेल लॉरेट

प्रख्यात गायक बॉब डीलनला साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले, या बातमीचं महत्त्व भारतीयांना तितकंसं कळणार नाही पण जगभरातल्या दर्दी संगीत रसिकांच्या आनंदाला या बातमीने नक्कीच उधाण आलं असणार याची आम्हाला खात्री आहे. विविध लक्षी साहित्य सृष्टी निर्माण करणा-या मोठमोठ्या कथाकार, कादंबरीकार, कवी यांना मिळणारा सन्मान प्रथमच एका संगीतज्ञ गायक गीतकाराला मिळालेला आहे. गीतकाराला साहित्य सृष्टीमध्ये जरा कमस्सलच मानतात पण संगीताच्या साहाय्याने गाता येतील अशी गीतं रचताना समाजात बदल घडवण्याचं सामर्थ्य त्या गीतांतील शब्दांमध्ये भरण्याचं बॉबचं वादातीत कौशल्य त्याला आज नोबेल पारितोषिकापर्यंत घेऊन गेलेलं आहे,असं म्हटल्यास ते वावगं होणार नाही अशी आमची खात्री आहे. 

रॉबर्ट ॲलन झिमरमान म्हणजेच बॉब डीलन साठच्या दशकात संगीत क्षेत्रात अवतरला आणि पुढील पन्नास-पंचावन्न वर्ष त्याने पॉप्युलर म्युझिक इंडस्ट्रीवर आपला प्रभाव कायम ठेवला. शालेय जीवनापासूनच संगीत क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारा बॉब, गिटार, पियानो आणि हार्मोनिका वाजवण्यात निपुण होता. सुरूवातीला एल्विस प्रिस्ले आणि लिटील रिचर्डच्या संगीताचा प्रभाव असणा-या बॉबने काही वर्षांतच ब्लूज, सोल आणि कन्ट्री संगीतावर प्रभुत्व मिळवलं. काही दिवस त्यावेळच्या मोठ्या कलाकारांना साथ देता देता बॉब स्वत:साठी स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नाला लागला. याच काळात त्याच्यावर प्रभाव पडला वेल्श कवी डीलन थॉमसचा आणि यातूनच बॉबने स्वत:ची नव्याने ओळख करून दिली, बॉब डीलन या नावाने. पुढे हेच नाव त्याने कागदोपत्री निश्चित केलं.

त्यावेळच्या संगीत क्षितीजावरचे तारे वूडी गुथ्री, डेव व्हॉन रॉन्क, फ्रेड नील, पीट सीगर, जॅक इलियट यांच्याबरोबरच्या कामातून, गायनातून आणि गीत लेखनातून बॉब डीलन, आजचा बॉब डीलन बनण्याच्या प्रक्रियेला वेग आला.

बॉबने केलेल्या अनेक प्रकारच्या सांगीतिक प्रयोगांमुळे त्याला संगीत क्षेत्रातील अनेक जॉनर्सचा विशेषज्ञ मानतात. पन्नासहून अधिक काळातील त्याच्या करियरमध्ये फोक, ब्लूज, कन्ट्री, गॉस्पेल, रॉक ॲन्ड रोल अशा पॉप्युलर संगीत प्रकारांमध्ये त्याची गीतं आहेत. पण बॉब ओळखला जातो त्याच्या प्रोटेस्ट सॉंग्जसाठी. युद्धखोरी, गुलामगिरी, गुन्हेगारी, गरीबी, स्त्रीमुक्ती, भ्रष्टाचारविरोधी अशा अनेक चळवळींना बॉबच्या गाण्यांनी बळ मिळवून दिलेलं आहे. त्याची अनेक गाणी सामाजिक सुधारणांच्या कार्यांमध्ये राष्ट्रीय गानाच्या पातळीवर पोहोचली. अनेकांना या गाण्यांनी धीर दिला, अनेकांना आधार दिला, अनेकांना मानसिक बळ दिलं.

समाजात घडलेल्या, घडणा-या घटनांनी प्रेरित होऊन आणि विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारी, उपाय सुचवणारी आणि सुधारणावादी दृष्टी देणारी बॉबची गाणी गेली पन्नास वर्ष एखाद्या दीपस्तंभासारखी कार्यरत आहेत. यांमध्ये ब्लोविंग इन द विंड, हार्ड रेन्स गोन्ना फॉल, डोन्ट थिंक ट्वाईस इट्स ऑल राईट, द लोन्सम डेथ ऑफ हॅटी कॅरोल, मॅन ऑफ कॉन्स्टंट सॉरो अशा अनेक गाण्यांचा समावेश होतो.

आपल्या हयातीतच एक लेजेन्ड बनलेल्या बॉब डीलनला त्याच्या सामान्यांचे प्रश्न मांडणा-या आणि सामाजिक सुधारणांसंबंधीच्या गीतांसाठी साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल बोभाटा परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

सबस्क्राईब करा

* indicates required