computer

बोभाटाची बाग - भाग १८ : आपल्या देशी वृक्ष संस्कृतीशी जोडलेल्या झाडांची ओळख करून घ्या !!

वाचकहो, बोभाटाच्या बागेत गेल्या दोन भागांत आम्ही ज्या वृक्षांची माहिती देतो आहोत ती कदाचित थोडी रुक्ष वाटली असण्याची शक्यता आहे. असे होणेही साहजिक आहे कारण आपल्या रोजच्या परिचयाच्या मानसिक प्रतिमांशी या वृक्षांचा तसा संबंध जुळून आलेला नसू शकतो.

उदाहरणार्थ, बकुळ म्हटली की आपलीशी वाटते. बकुळीच्या फुलांचा आणि जुन्या आठवणींचा संदर्भ अनेक गीतांतून आपण ऐकतो. आपल्यापैकी काहीजणांचे काही रोमँटिक क्षण गुलमोहोराच्या झाडाखाली काढलेल्या छायाचित्रात बंदिस्त झाले असतील. पण सगळ्याच वृक्षांसोबत असे काही खास क्षण, आठवणी, पुस्तक-सिनेमांतले संदर्भ असतत असं नाही, त्यामुळं काही झाडांसोबत 'हृदयीच्या तारा' जोडल्या गेल्या नाहीत असं होऊ शकतं. पण लक्षात घ्या की हे न जोडली गेलेली झाडे आपल्या देशी वृक्ष संस्कृतीची पुरातन सदस्य आहेत. त्यांची नव्या पिढीशी ओळख होण्याआधीच ती पुसट होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणूनच वृक्षांचे 'सोयरे'पण पुन्हा जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे .

चला तर आज आणखी काही झाडांची ओळख करून घेऊ या !

वाळुंज -

नदी, ओहोळ यांच्या किनार्‍याने वाढणार्‍या झाडांपैकी एक महत्वाचे झाड म्हणजे वाळूंज. वनस्पती शास्त्रीय परिभाषेत वाळुंजला सॅलीक्स टेट्रास्पर्मा असे नामकरण आहे. इंग्रजीत त्याला इंडीयन विलो असेही म्हटले जाते. सर्वसाधारण दिसणरा हा वृक्ष नदीकाठी असलेल्या मातीची धूप थांबवण्याचे महत्वाचे कार्य करतो. गेली काही वर्षे वाळुंजची बेसुमार कत्तल झाल्याने नदीचे पात्र मातीने भरून जाते आणि साहजिकच त्यामुळे पाण्याचा लोट वाढला की पात्र बदलते. थोडक्यात, बदलणारे पात्र ही आपल्यासाठी धोक्याची सूचना आहे असे समजण्यास हरकत नाही.

फणस -

अनेक फळांनी लगडलेले, लेकुरवाळ्या प्रपंचासारखे दिसणारे, कोकणात बहुतेक अंगणांत दिसणारे हे झाड Artocarpus heterophyllus म्हणजे फणसाचे झाड. केवळ कोकणातच नव्हे, तर भारतात बहुतेक राज्यांमध्ये आणि आशिया खंडातल्या अनेक देशांत फणसाचा आढळ असतो. बांगला देशाचे तर हे राष्ट्रीय फळ आहे. रसरशीत गोड गरे हे फणसाचे वैशिष्ट्य! अनेक फुलं एकत्र येऊन फणसाचे फळ बनते. कापा आणि बरका या प्रकारापेक्षा इतरही काही जातीचे फणस भारतात आढळतात. काही फणस केवळ भाजीच्या उपयोगात येतात. केवळ फळच नव्हे, तर इतर अनेकरित्या फणसाचा उपयोग असतो. त्याचे मजबूत लाकूड फर्निचर बनवण्यासाठी वापरतात. फणसाच्या पानांचा वापर करून बनवलेली इडली कधी खाल्ली आहे का?

मुचकुंद -

टेरोस्पर्मम ॲसरिफोलियम किंवा टेरोस्पर्मम सुबरिफोलियम या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणर्‍या या वृक्षाला हिंदीत अनेक नावे आहेत. त्यांपैकीच पद्म पुष्प -कनकचंपा ही काही नावं!! या झाडाची खासियत म्हणजे त्याची रुंद पानं. ती पत्रावळी बनवण्यासाठी वापरतात. त्याच्या फुलांच्या सुगंधाने वटवाघळं या झाडाकडे आकर्षित होतात. भारतात अनेक बागांमध्ये हा वृक्ष आढळतो. पण याचे मूळ वसतीस्थान ब्रह्मदेश आहे असे समजले जाते.

अंकोळ-

Alangium salviifolium-भारतातल्या महाराष्ट्र -मध्यप्रदेश राज्यांत आढळणारा हा आणखी एक वृक्ष -अंकोळ! अनेक औषधी गुणांसाठी अंकोळ प्रसिध्द आहे. सापाचे विष उतरवण्यासाठी पण याचा उपयोग होतो असा दावा बर्‍याच ठिकाणी केला जातो. इथे एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो असा की प्रत्येक झाडाकडे आकर्षित होणारे किटक -पक्षी वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ मुचकुंदाकडे वटवाघळं धाव घेतात, तर अंकोळाच्या फुलांकडे मधमाशा रांगा लावतात.

कुसूंब -

काही वृक्ष त्याच्या फुलाच्या सुगंधाने त्याची ओळख सांगतात तर काही फुलांच्या रंगाने!

चाला वाही देस
प्रीतम पावा, जालान वाही देस
कहो कुसुम्बी साड़ी रंगवा,
कहो तो भगवा भेस

मीराबाईच्या या पदात रंगामुळे उल्लेख असलेला हा वृक्ष म्हणजे कुसूंब! सिलोन ओक, लाख ट्री अशाही नावाने तो ओळखला जातो. त्याच्या फुलांचा केशरी- भगावा रंग ही या झाडची ओळख हे खरे, पण शास्त्रीय परिभाषेत Schleichera oleosa असे त्याचे नामानिधान आहे.

आजच्यासाठी इतक्या झाडांची ओळख पुरे. येत्या शुक्रवारी बागेत पुन्हा भेटूच. पण तोवर आपल्याकडे या झाडांचे फोटो असतील तर इथे जरूर शेअर करा!

सबस्क्राईब करा

* indicates required