बोभाटाची बाग : भाग २६ - जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या 'बर्थ फ्लॉवर' आणि त्यांच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या !!

एकाच वेळी अनेक भावछटांचे प्रदर्शन अनुभवायचे असल्यास जुलै महिन्याच्या 'लार्कस्पर'च्या फुलाकडे बघा. डेल्फीनीयम या प्रजातीतल्या या फुलाला हलकासा सुगंध असतो. ३०० हून अधिक सभासद असलेल्या डेल्फीनीयमच्या कुळात अनेक रंगांची लार्कस्परची फुले बघायला मिळतात. त्यांपैकी गुलाबी लार्कस्पर बंडखोर -विरोधाभास याचे प्रतिक आहे, तर पांढरे लार्कस्पर सुखी शांत जीवनाचे प्रतिक आहे. गर्द जांभळ्या रंगाचे लार्कस्पर पहिल्या प्रेमाची किंवा गाढ प्रेमाची निशाणी समजली जाते.
(लार्कस्पर)
पाच दलांच्या आत चार पाकळ्या असलेली ही फुलं एकत्र गुच्छासारख्या फुलोर्यात येतात. त्यांचा दर्शनी अविर्भाव उस्फूर्त असा दिसतो म्हणून नावात 'Spur' जोडला गेला आहे. खंबीर चारित्र्य, अभेद्य नैतिकता, चिरस्थायी आठवणी,मोह, सन्मान... अशा वेगवेगळ्या भावना दर्शवणारे हे फूल आहे.
ग्लॅडीओलसची फुलं गुलाबी, लाल, जांभळा, पिवळा, केशरी, पांढरा आणि हिरवा अशा विविध रंगांमध्ये येतात. प्रौढ प्रेमाचे प्रतिक असे समजून लग्नाच्या चाळिसाव्या वाढदिवसाला या फुलांचा गुच्छ दिला जातो. हे फुल ऑगस्ट महिन्याचे मानले जाते.
(ग्लॅडीओलस)
अॅस्टर म्हणजे सप्टेंबर महिना! सध्या शोभिवंत पुष्प सजावटीत या फुलांचा भरपूर वापर होत असल्याने अॅस्टरची ओळख पटकन पटेल. एकाचवेळी दोन विरुध्द टोकांच्या भावना म्हणजे धीरगंभीर आणि चांचल्य या दोन्हींचेही अॅस्टर प्रतिक समजले जाते .
(अॅस्टर)
आपण आतापर्यंत इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे फुलांची माहिती घेतली. आपल्या मराठी वर्षांच्या महिन्याप्रमाणे अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने साधारण याच इंग्रजी महिन्यांच्या सोबत येतात. योगायोग असा की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ज्या फुलांचे प्रतिनिधित्व करतात तीच फुले अश्विन आणि कार्तिक या मराठी महिन्यातल्या बहुतेक सणांत वापरली जातात. झेंडू आणि शेवंती मराठीत, तर मेरीगोल्ड आणि क्रिसेंथीमम इंग्रजीत!
ऑक्टोबरचे मेरीगोल्ड माया-ममता, सर्वस्व वाहून देण्याची भावना याचे प्रतिक समजले जाते तर नोव्हेंबर महिन्याचे क्रिसेंथीमम दोस्ती, आनंद, निर्व्याज प्रेम याचे प्रतिक समजले जाते.
(क्रिसेंथीमम)
डिसेंबर महिन्याचे फूल आम्हाला तरी भारतात फारसे बघायला मिळाले नाही. लालभडक आणि किरमिजी रागाचे "पाँ(इ)सेट' या फुलाचे मुळ वस्तीस्थान मध्य अमेरिकेत आहे. आता या फुलांचे उत्पादन अनेक बागांमध्ये घेतले जाते. प्राचिन अॅझटेक संस्कृतीपासून अत्याधुनिक अमेरिकन संस्कृतीसोबत हे फूल जोडले गेले आहे. अॅझटेकच्या नाहुटी भाषेत याला क्यूटलॅक्सोचिटी म्हणजे 'मातीचे फूल' म्हटले जाते. ख्रिस्ती संस्कृतीत त्याला 'स्टार ऑफ बेथलेहेम' म्हटले जाते. ख्रिस्तजन्माच्या वेळी आकाशात दिसणार्या तार्यासारखा या फुलांचा आकार असतो. काहीजण त्याच्या लाल रंगाला येशूख्रिस्ताच्या बलीदानाचे प्रतिक समजतात. सर्वसामान्यपणे 'तू एक खास व्यक्ती आहेस' असा संदेश द्यायचा असेल तर या फुलांचा गुच्छ दिला जातो.
(पाँ(इ)सेट)
वाचकहो, बोभाटाच्या बागेत आता काही दिवस मध्यंतर घेण्याची वेळ आली आहे. काही दिवसांनी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोतच पण त्यापूर्वी एक विशेष सूचना :
आपल्या परिचितांपैकी कोणी या विषयाचे तज्ञ असतील तर त्यांना आमच्यासोबत संपर्क करायला सांगा. ही मालिका पुढे नेण्यासाठी आम्हाला नव्या दमाच्या लेखकांची आवश्यकता आहे.