शाळेच्या बसचं अपहरण करणारा ६ मिनिटातच बस सोडून कसा पळाला? काय घडलंय?

बस किंवा विमानाचे अपहरण होण्याच्या बातम्या आपल्यासाठी नव्या नाहीत. खंडणीसाठी किंवा आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी अनेकदा दहशतवादी किंवा गुन्हेगार असे कृत्य करतात हे तर आपल्याला माहितच आहे. पण कधी केवळ ६ मिनिटांसाठी स्कूलबसचं अपहरण झाल्याचं पाहिलं आहे का?
ही घटना घडली होती अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिना राज्यात. केवळ ६ मिनीटांसाठी एका स्कूलबसचं अपहरण करण्यात आलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही अशी पहिलीच घटना असेल ज्यात स्वतः अपहरणकर्ताच मुलांच्या प्रश्नाला आणि आरडाओरडीला वैतागून बसमधून उतरून गेला. या अपहरणकर्त्याने कुणालाही कसलाही त्रास दिला नाही, उलट काही वेळाने त्याने स्वतःहूनच बस सोडली. कोण होता मग हा अपहरणकर्ता आणि त्याने बसचे अपहरण केलेच का? जाणून घेऊया या लेखातून.
साऊथ कॅरोलिना मधील कोलंबिया शहरात ही घटना घडल्याची बातमी स्वतः त्या शहराचे शेरीफ लिओन लॉट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी सात वाजता जोवान कोलाझो हा २३ वर्षांचा तरूण फोर्ट जॅक्सन या लष्करी तळावरून एका रायफल घेऊन निघाला. या रायफलमध्ये गोळ्या नव्हत्या ती रिकामीच होती. पुढे इंटरस्टेट ७७ या चौकात जाऊन त्याने गोंधळ घातला. चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या बाईकवाल्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. कुणीच त्याला दाद दिली नाही तेव्हा तो एका स्कूलबसमध्ये जबरदस्तीने चढला.
बस मध्ये ड्रायव्हर आणि फॉरेस्ट लेक इलेमेंटरी स्कूलची अठरा मुले होती. अर्थात त्याला बसमधील कुणालाही दुखवायचे नव्हते. बस ड्रायव्हरला त्याने पुढच्या गावात बस नेण्याचा आदेश दिला. बस मधील सगळ्या पोरांना पुढच्या बाजूला येऊन बसण्यास सांगितले. मुले पुढे आली आणि मुलांनी त्याला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. तू आमच्या ड्रायव्हर अंकलना मारणार नाही ना? तू आम्हाला काही करणार नाही ना? तू ही बस कुठे घेऊन जाणार आहे? मुलांनी एकामागून एक प्रश्नांचा मारा सुरू केला. काही मुलांनी आपल्या फोनवरून पालकांना जे काही घडत होते त्याची कल्पना दिली. दरम्यान ड्रायव्हरने मात्र त्याला कसलाच विरोध केला नाही. फक्त सहा मिनिटे झाली नसतील तोवर त्या मुलांच्या प्रश्नांनी आणि आवाजांनी जोव्हान वैतागून गेला आणि त्याने बस थांबवायला सांगितली. तो उतरून पुढे गेला देखील. बस मधील ड्रायव्हर आणि मुले मात्र सुखरूप होती.
पण जेव्हा पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी जोव्हानला ताब्यात घेतले. त्याच्यावर अपहरण करण्यासह लष्कराची शिस्त मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशिवाय आणखीही काही गुन्हे नोंदवले आहेत. त्याला कोणत्याही प्रकारच्या समुपदेशनाची गरज नसल्याचेही पोलीस म्हणाले. पण आता त्याच्यावरच्या या खटल्याला कोणते वळण मिळेल याबाबत मात्र त्यांनी आत्ताच काही स्पष्टीकरण दिले नाही. कदाचित काही दिवस त्याला सस्पेंड करून पुन्हा प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात येईल.
जोव्हान हा न्यू जर्सीचा रहिवाशी असून तीन आठवड्यांपूर्वीच तो फोर्ट जॅक्सन लष्करी तळावर ट्रेनिंगसाठी रुजू झाला होता. तीन आठवडे घराशी संपर्क न झालेल्या या तरुणाला घराची आणि घराच्या लोकांची प्रचंड आठवण येत होती. त्याला फक्त आपल्या घरी परत जायचे होते. घरी परत जाण्याच्या एकाच उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे पुढे स्पष्ट झाले.
प्रशिक्षणार्थी सैनिकाकडे दिलेली रायफल ही रिकामीच असते त्यामध्ये गोळ्या नसतात म्हणूनच कोलाझोकडे जी रायफल होती ती रिकामीच होती. बसमधील कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. त्यामध्ये काळ्या रंगाचा ARMY अशी अक्षरे लिहिलेला टी-शर्ट घातलेला आणि हातात रायफल घेतलेला एक तरूण ड्रायव्हरला बस दुसरीकडे वळवण्याची सक्ती करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलीस अधिकारी लेटो यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा व्हिडीओ देखील प्रसारित केला.
खरे तर त्याला कुणाला त्रास द्यायचा किंवा दुखावण्याचा हेतू अजिबात नव्हता. यापूर्वीही त्याचे तसे कुठलेच रेकॉर्ड पोलिसांना आढळले नाही. फक्त आपल्या घरी जाण्यासाठीच त्याने हे कृत्य केले. पोलीस चौकशीत बस ड्रायव्हरने देखील हीच माहिती दिली की, त्याने मला किंवा मुलांना कसलाच त्रास दिला नाही. आम्ही सगळेच सुखरूप आहोत.
लहानपणी घराची आठवण आल्याने शाळा सोडून किंवा हॉस्टेल सोडून घर गाठण्याचा पराक्रम तुम्हीही केला असेल. माणूस कितीही मोठा झाला आणि कुठेही गेला तरी त्याला आपल्या घराची ओढ सुटत नाही हेच खरे, पण एका लष्करी प्रशिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणाच्या या कृत्यातून तुम्ही कोणता अर्थ काढाल? तुमचे उत्तर कमेंट मधून जरूर सांगा.