computer

बंगलोरमध्ये मराठी तर दिल्लीत तेलगु जाहिरात...या उलटसुलट जाहिरातीमागचं कारण काय ?

या स्वातंत्र्यदिनी कॅडबरीने एक अनोख्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मराठी मथळा असलेली जाहिरात कन्नड पेपरमध्ये तर तेलुगू मथळा असलेली जाहिरात दिल्लीच्या वृत्तपत्रात दिली होती. वरवर पाहता ही काहीतरी गंडलेली जाहिरात वाटते पण ठळक मथळ्यानंतर मजकूर वाचला तर हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेला अभिनव प्रयोग आहे असं दिसतंय.

या जाहिरातीमागचं कारण जाणून घेऊया.

कॅडबरीने ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त “युनिटी बार” आणला होता. नावाप्रमाणेच या चॉकलेट बारमध्ये ऐक्य दिसून येतं. ते असं की या एकाच चॉकलेट बारमध्ये तुम्हाला वेगवेगळे फ्लेव्हार्स मिळतात. एका अर्थी युनिटी बार हा भारताचंच प्रतिक आहे. वेगवेगळी माणसं, भाषा, राहणी, चालीरीती अशा सर्व वैविध्यपूर्ण गोष्टी भारतात एकवटल्या आहेत. भारताचं हेच तर वेगळेपण आहे.

भारताच्या याच वेगळेपणाला अधोरेखित करण्यासाठी जाहिरातीत "भाषा कोणतीही असो, गोडवा तोच आहे" ही संकल्पना मांडण्यात आली होती.

युनिटी बारची जाहिरात १५ ऑगस्टच्या दिवशी इकॉनॉमिक टाईम्समध्ये छापून आली होती. पहिल्याच पानावर संपूर्ण पान भरून असलेल्या या जाहिरातीने लोकांना धक्का दिला. जाहिरात लगेच व्हायरल झाली. हे वेगळं सांगायला नको की लोकांना जाहिरातीची ही पद्धत बेहद्द आवडली.

युनिटी बारच्या जाहिरातीमागे कोणाचा मेंदू होता ?

ही आयडिया होती Ogilvy India या जाहिरात कंपनीची. मुळची Ogilvy कंपनी न्यूयॉर्क येथे आहे. या कंपनीची भारतातील शाखा म्हणजे Ogilvy India. पूर्वी ज्या फेव्हिकॉलच्या जाहिराती यायच्या त्या Ogilvy India ने तयार केलेल्या होत्या. याखेरीज वोडाफोनची गाजलेली ‘झुझू’ जाहिरातीमागे Ogilvy India चं डोकं होतं. भारतीय पर्यटन मंत्रालयाला ‘Incredible India’ हे घोषवाक्य Ogilvy India ने दिलं. या उदाहरणांवरून तुम्हाला समजलं असेलच की या एका जाहिरातीमागे किती मुरलेली माणसं आहेत.

तर मंडळी, भारताचं वैविध्य अशा हटके पद्धतीने दाखवणारी ही जाहिरात तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा..

सबस्क्राईब करा

* indicates required