computer

मुंबईकर मुलीने केलाय चक्क अटलांटिक महासागरात हा पराक्रम !!

मंडळी, आजची चांगली बातमी घ्या. मुंबईच्या बोरीवली येथे राहणाऱ्या आरोही पंडित (वय वर्ष २३) ही LSA विमानातून अटलांटिक महासागर ओलांडणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. चला तर LSA विमान काय असतं, तिने हा विक्रम कसा केला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया.

LSA म्हणजे light-sport aircraft. ही विमाने हलक्या वजनाची असतात. आरोही पंडितने वापरलेल्या Sinus 912 LSA विमानाचं वजन अवघं ४०० किलो होतं, तर विमानाला केवळ एक इंजिन होतं. ही विमाने अटलांटिक महासागर सारख्या ठिकाणांवर उडण्यासाठी बनलेली नसतात. आरोहीचं यासाठी कौतुक आहे की तिने चक्क LSA विमानातून एवढा मोठा प्रवास करण्याची हिम्मत दाखवली.

तिने हा विक्रम कसा केला ?

वरील नकाशावर अटलांटिक महासागर आपण बघू शकतो. तो दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये अवाढव्य पसरलेला आहे. हा प्रवास कठीण होता. या प्रवासात तिच्या सोबत तिची सहकारी पायलट किथर मिस्किटा पण होती.

जुलै २०१८ मध्ये पंजाब पासून त्यांचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास ५ टप्प्यांमध्ये होता. पहिला टप्पा पाकिस्तानात होता. पंजाब, राजस्थान, गुजरात प्रवास करून त्यांनी पाकिस्तान गाठलं. पाकिस्तानातून इराण, तुर्कस्तान, सर्बिया, स्लोवेनिया, जर्मनी, फ्रांस आणि युके असा त्यांनी प्रवास केला. इंग्लंड पासून आरोहीला आपला प्रवास एकटीने करायचा होता. खरं तर पुढचा प्रवासच अधिक कठीण होता. कारण तिला ग्रीनलंड येथे थांबावं लागणार होतं. ग्रीनलंडचा बर्फाळ भाग ओलांडायचा होता. तिने हे चॅलेंज पण यशस्वीपणे पूर्ण केलं.

अशा प्रकारे तिने १३-१४ मे २०१९ रोजी कॅनेडात पोहोचून आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि ती LSA विमानातून अटलांटिक महासागर ओलांडणारी पहिली महिला ठरली आहे.

तिच्या नावावर नोंदलेले विक्रम.

मंडळी, तिने फक्त अटलांटिक महासागर ओलांडण्याचा विक्रम केलेला नाही त्यासोबत आणखी काही जागतिक विक्रम तिच्या नावावर नोंदवले गेले आहेत.

१. स्वातंत्र्यानंतर LSA विमानातून पाकिस्तानात उतरणारी ती पहिली नागरिक ठरली आहे.

२. ग्रीनलंडच्या बर्फाळ भागातून LSA विमानातून प्रवास करणारी ती जगातील पहिली महिला पायलट ठरली आहे.

३. एवढंच नाही तर ती जेव्हा जुलै २०१९ पर्यंत भारतात परतेल तोवर तिच्या नावावर आणखी विक्रम नोंदवलेले असतील.

मंडळी, आरोहीने ३००० किलोमीटरचा प्रवास करण्यापूर्वी ७ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण घेतलं होतं. हे प्रशिक्षण भारतासहित ग्रीनलंड, सायबेरिया, इटली या ठिकाणी पार पडलं. प्रवासात येणाऱ्या सर्व अडथळ्यांशी झुंजण्यासाठी तिने पूर्ण तयारी केली होती.  

तर मंडळी, मराठी मुलीची ही गगनभरारी अभिमानास्पद आहे. त्याबद्दल तिचं कौतुक हे झालंच पाहिजे. तुम्ही आरोहीच्या यशाबद्दल काय म्हणाल ? कमेंट मध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required