f
computer

भारतात या लोकांच्या गाड्यांना कधीच नंबरप्लेट नसते...

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नंबरप्लेट्स वाहनांवर तर पाहिल्या असतीलच. कधी वाटलंय का तुम्हांला की पांढर्‍यावरती काळ्या रंगातल्या अक्षराचीच नंबरप्लेट का? आणि लोक जसे आकड्यांचे खेळ करून कधी दादा तर कधी बापूची नंबरप्लेट बनवतात, तसे लाल-पिवळ्या-हिरव्या-निळ्या रंगावर दुसर्‍याच कुठल्यातरी रंगात लिहिलेले आकडे का दिसत नाहीत?  कारण आहे आपल्या देशाचे कायदे.

 भारत सरकारनं प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठी बॅकग्राऊंड आणि आकडे या दोन्हीचा रंग ठरवून दिलाय आणि त्यात बदल करायची कुणालाच परवानगी नाहीय. चला तर मग आज जाणून घेऊ कोणती नंबरप्लेट कुणासाठी असते ते..

पांढरी नंबरप्लेट

खाजगी वाहनाची नंबरप्लेट ही पांढर्‍या रंगाच्या बॅकग्राऊंडवर काळ्या आकड्यांची असते. खाजगी वाहन म्हणजे जे कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी वापरलं जात नाही. तुमची कार किंवा बाईक जी तुम्ही फक्त स्वत:साठी आणि तुमच्या घरच्यांसाठी वापरता ती खाजगी वाहन असते. 

पिवळी नंबरप्लेट

ट्रक आणि टॅक्सी, ओला, उबर यांसारख्या कमर्शिअल वाहनांची नंबरप्लेट पिवळ्या रंगाची असते आणि तिच्यावर काळ्या रंगाने गाडीचा नंबर लिहिलेला असतो. या गाडीच्या ड्रायव्हरकडे कमर्शिअल म्हणजेच व्यावसायिक वाहतूक करण्याचं लायसन्स असावं लागतं. 

 

 

काळ्या रंगावर पिवळ्या आकड्यांची नंबरप्लेट

आजकाल भारतातसुद्धा सेल्फड्राईव्ह करण्याच्या गाड्या मिळतात. म्हणजे गाडी भाड्याचीच असते पण ती आपल्याला चालवता येते. मग त्यासाठी ते डिपॉझिट घेतात आणि तुम्ही काही दिवसांसाठी गाडी घेऊन कुठेही जाऊ शकता. आजकाल कुटुंबं लहान असतात, पण कधीकधी सगळ्यांनी कुठेतरी एकत्र जायचं ठरतं. सामान आणि माणसं बघता कदाचित असलेली गाडी लहान पडते आणि आठ-दहा दिवस बाहेर राहायचं तर पुन्हा ड्रायव्हरची पण सगळी सोय पाहायला लागते. त्यामुळं लोक सेल्फ-ड्राईव्ह कारला खूप पसंती देताना दिसतात. अर्थात आपल्याकडे नसलेली भारी गाडीसुद्धा या प्रकारात अगदी आपलीच असल्यासारखीच चालवता येते.

ही गाडी चालवणाराकडं कमर्शिअल वाहन चालवण्याचं लायसन्स असायची गरज नसते.

आकाशी रंगाची नंबरप्लेट

परदेशी दूतावासातल्या अधिकार्‍यांच्या गाड्या अशा निळसर रंगाच्या बॅकग्राऊंडवर पांढर्‍या रंगाच्या अक्षरातल्या असतात. या गाड्यांवर UN, CD किंवा CC लिहिलेलं असतं. UN लिहिलेल्या गाड्या युनायटेड नेशन्स, CD लिहिलेल्या परराष्ट्र अधिकारी म्हणजेच डिप्लोमॅटिक कोअर आणि CC लिहिलेल्या परराष्ट्र वकिलात म्हणजेच कॉन्स्युलर कोअरच्या गाड्या असतात.

भारतातल्या मेक्सिकोच्या राजदूत सगळीकडे फिरताना रिक्षा वापरतात. ही वरच्या चित्रातली रिक्षा त्यांचीच आहे. ४८ हा मेक्सिकोचा नंबर तर पुढचं CD म्हणजेच त्या राजदूतावासतल्या पराराष्ट्र अधिकारी असल्याचं दिसतंय. विकिपिडियावर भारतात  इतर देशाच्या गाड्यांना दिले जाणारे काही क्रमांक दिले आहेत पाहा..

मिलिट्रीच्या गाड्यांच्या नंबरप्लेट्स

मिलिटरीच्या गाड्यांना काळ्या बॅकग्राऊंडवरती पांढर्‍या रंगाचे अंक लिहिलेल्या नंबरप्लेट्स  असतात. आणि हो, त्या नंबरप्लेटवरचं पहिलं किंवा तिसरं अक्षर हा वरची दिशा दाखवणारा बाण असतो. हा बाण ब्रिटिश कॉमनवेल्थच्या बर्‍याच देशांत वापरला जातो. बाणानंतरचे दोन आकडे हे त्या वाहनाच्या खरेदीचं वर्ष असतं.

ही सगळी वाहनं संरक्षण मंत्रालयाच्या दिल्ली ऑफिसकडं रजिस्टर केलेली असतात.

विना नंबरप्लेट्सच्या गाड्या

भारताचे राष्ट्रपती आणि सर्व राज्यांचे राज्यपाल यांच्या गाड्यांना नंबरप्लेटच नसते. त्यांच्या गाडीवर लाल रंगाच्या पट्टीवर थोडी उठावदार असलेली सोनेरी रंगातली भारताची राजमुद्रा असते.  

सबस्क्राईब करा

* indicates required