computer

नाकात अडकलेलं नाणं तब्बल ५० वर्षानंतर कसं काढण्यात आलं ? एवढ्या वर्षात पत्ता कसा लागला नाही ?

बालपणी केलेली कुठली खोडी किंवा चूक कधी अंगाशी येईल सांगता येत नाही. मोठ्यांचे लक्ष चुकवून किंवा त्यांच्या नकळत मुलं असे काही करतात की सगळ्यांची पळता भुई थोडी होते.  लहान मुलं किती गोड असतात हे अगदी खरं असलं तरी खोडसाळपणात म्हणा किंवा उत्सुकतेत, ती अशी काही कामगिरी करतात की डायरेक्ट डॉक्टरकडे पळावं लागतं. उदाहरण सांगायचं झालं तर नाकात घातलेले शेंगदाणे, छोटंसं नाणं किंवा सायकलचं बेअरिंग बॉल, कानात घातलेला खोडरबर किंवा छोटा खडा हे असे अनेक उद्योग आपण सगळ्यांनी केले असतीलच की. त्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी केलेले घरगुती प्रयत्न आणि नाहीच जमले तर डॉक्टरांची भेट ठरलेलीच. हे सगळं संपल्यावर मिळणारा ओरडा हा प्रत्येकाला परिचयाचा असेलच. हो ना?

पण अशीच एखादी वस्तू शरीरात गेलीय आणि ते कळलंच नाही तर? काय होईल? ती वस्तू अनेक वर्षे शरीरातच राहिली तर? अशक्य वाटतंय ना? पण असं खरोखर झालंय. रशियामध्ये एका ५९ वर्षांच्या वृद्ध माणसाच्या नाकातून तब्बल ५० वर्षांनंतर नाणं काढण्यात आले आहे. आहे की नाही धक्कादायक? चला वाचूया सविस्तर..

वयाच्या पाचव्या वर्षी खेळताना या मुलाने उजव्या नाकपुडीतून चुकून एक नाणं आत घुसवलं. पण तो ते आईला सांगायला इतका घाबरला की तो गप्प बसला आणि काही दिवसानंतर ही गोष्ट तो विसरूनच गेला. कदाचित नंतर कधी काही त्रास ही झाला नसावा म्हणून ते धातूचं नाणं तब्बल पाच दशकं त्याच्या शरीरात राहिलं. वयाच्या ५९व्या वर्षी जेव्हा त्याला श्वासोच्छवास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. स्कॅन केल्यावर लक्षात आलं की उजव्या नाकपुडीत काही अडसर असल्यामुळं श्वास घेण्यास अडथळा येत आहे. मेडिकल रिपोर्ट्सनुसार Rhinolith आहे हे सिद्ध झाले. ग्रीकमध्ये rhino म्हणजे नाक आणि lithos म्हणजे दगड किंवा खडे. थोडक्यात नाकात सापडलेला खडा. त्या नाण्याभोवती तयार झालेल्या खड्यामुळे या मनुष्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. 

नशीबाने इंडोस्कोपी करून ते खडे आणि नाणं काढण्यात डॉक्टर यशस्वी ठरले. नाणं बाहेर काढल्यावर त्या नाण्याचं नीट निरीक्षण करण्यात आलं. तेव्हा ते सोव्हिएत रशियाच्या चलनातलं एक कोपेकचं नाणं असल्याचं आढळलं. म्हणजे भारतीय चलनानुसार या कोपेकची किंमत होते १ पैसा. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा घटना फार दुर्मिळ असतात. डिस्चार्ज दिल्यावर तो पेशंट दोन्ही नाकपुडीद्वारे अगदी सहज श्वास घेऊ शकला. ऐकावं ते नवलच नाही का?

हे असं एकच उदाहरण नाही बरं का.. तर चीनमध्येही असा एक किस्सा नुकताच घडला आहे.  चीनमध्ये  झांग बिनशेंग (Zhang Binsheng) या तीस वयाच्या व्यक्तीसोबत ही असंच घडलं आहे. केवळ दहा वर्षांचा असताना झांग तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. पण नशीब इतकं चांगलं होतं की जीवाला काही बरंवाईट झालं नाही. पण त्या अपघातात त्याचे दोन दात तुटले. त्यातला एक तुटलेला दात सापडला. पण दुसऱ्या दाताबद्दल काहीच कळले नाही. त्याचा तुकडा कुठेच सापडला नाही. पण जीव वाचल्यामुळे सगळे आनंदात होते आणि त्या दुसऱ्या दाताबद्दल साफ विसरून गेले.

पण तब्बल वीस वर्षानंतर रात्री झोपल्यानंतर झांगला खूप दुर्गंधी येतेय हे जाणवले.. आधी वाटले जवळपासच्या एखाद्या वस्तूची किंवा खिडकीतून हा दुर्गंध येत असावा. पण बऱ्याच रात्री जागून काढल्यावर त्याला जाणवलं की हा सडल्यासारखा दुर्गंध नाकातूनच येत आहे. त्याने लगेचच डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांच्या सल्ल्याने नाकाचा एक्सरे करून घेतला. एक्सरेत जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरांना ही धक्का बसला. एका नाकपुडीत एक जड दिसत होती. सगळा इतिहास जाणून घेतल्यावर डॉक्टर या निष्कर्षापर्यंत पोहोचले की अपघातात जो दुसरा दात तुटला होता तो इथे जाऊन अडकला होता आणि त्याचाच दुर्गंध येत होता. ऑपरेशन करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. ऑपरेशनद्वारे तो दात काढण्यात आला. आश्चर्य वाटतंय ना? तब्बल वीस वर्षे तो दात नाकात राहिला होता.

कधी कधी अपघाताने अशा गोष्टी घडतात की त्याचा त्रास अनेक वर्षांनीसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांकडे धावलेले बरे, नाही का? मुलांकडे ही काळजीपूर्वक लक्ष ठेवलेले चांगले. नाहीतर छोट्या दुर्लक्षित केलेल्या गोष्टी कधी परत त्रास देतील किंवा जीवावर बेततील हे कोणीही सांगू शकत नाही.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required