मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्रप्रकल्पातल्या २९ पिलांच्या 'कॉलरवाली' सुपरमॉमचे निधन!!

मध्य प्रदेश हे राज्य सर्वाधिक वाघांच्या संख्येमुळे वाघांचे राज्य म्हणून ओळखले जाते. येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातील अधिकांश वाघांची माय एकच होती. दुःखाची गोष्ट म्हणजे तिचे नुकतेच निधन झाले आहे. सुपरमॉम किंवा कॉलरवाली वाघीण या नावाने जगभरातील निसर्गप्रेमी तिला ओळखत होते.

शनिवारी या वाघिणीचे निधन झाले. त्यावेळी तिचे वय १६ वर्षं होते. वाघांचे सरासरी वय हे १२ वर्षं मानले जाते. त्यामानाने ही वाघीण अधिक जगत असल्याने सर्वांना आनंद होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. तिचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

T-15 असे तिचे अधिकृत नाव होते. या वाघिणीला शेवटचे पर्यटकांनी बघितले ते म्हणजे १४ जानेवारीला. यावेळी ती अतिशय थकलेली वाटत असल्याचे अनेकांनी नोंदवले आहे. कॉलरवाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आईचा जंगलात दबदबा असल्याचे रिपोर्ट्स आहेत.

T-7 नावाच्या वाघिणीला सप्टेंबर २००५ साली चार शावकं झाली. त्यातीलच एक ही कॉलरवाली वाघीण. तिने लवकरच २३ ऑक्टोबर २०१०ला ४ मादी आणि १ नर अशा ५ शावकांना जन्म दिला होता. या वाघिणीला कॉलरवाली नाव पडले यामागेही कारण आहे. २००८ साली तिला रेडिओ कॉलर्ड करण्यात आले होते.
२०१० साली जेव्हा या रेडिओ कॉलरने काम करणे बंद केले, तेव्हा परत रेऍक्टिव्हेट करण्यात आल्याने तिची ओळख कॉलरवाली अशीच तयार झाली होती.

या वाघिणीचे खरोखर उपकार आहेत. देशात सुरू असलेल्या सेव्ह टायगर मोहिमेत तिने एकटीने २००८ ते २०१८ या १० वर्षांत २९ शावकांना जन्म दिला. २०१० पूर्वी २००८ सालीही तिने ३ शावकांना जन्म दिला होता. पण त्यातला एकही बछडा वाचला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये तिची शेवटची प्रसूती झाली. तिच्या एकूण शावकांची संख्या ही २९ झाली होती. एकूण २९ पैकी २५ शावकं वाचू शकले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाला एकहाती महत्व मिळवून देण्याचे श्रेय निश्चितच या कॉलरवाली वाघिणीचे आहे असे म्हणता येईल.

पेंच प्रकल्पाचे संचालक अशोक मिश्रा यांनी सांगितले की, "एका वाघिणीने इतके वर्ष जगणे आणि इतक्या प्रमाणात शावकांना जन्म देणे हे खरोखर आश्चर्य आहे. T - 4 हे अधिकृत नाव असलेली कॉलरवालीची मुलगी इथेच आपल्या ५ शावकांसोबत राहते.

या वाघिणीचे महत्व यावरून लक्षात येऊ शकते की ती जगातील सर्वाधिक फोटो काढली गेलेली वाघीण म्हटली जाते. पेंचला जाणाऱ्या पर्यटकांना तिला पाहण्याची उत्सुकता असणे हे महत्वाचे कारण होते. सहज दिसण्यासाठी ती प्रसिद्ध होती. या कॉलरवाली वाघिणीला शेवटचा निरोप हा अतिशय सन्मानपूर्वक देण्यात आला आहे.

कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू हा व्याघ्र प्रेमींसाठी खरोखर दुखद घटना आहे. पण तिच्या ऋणात राहणे हीच या वाघिणीला श्रद्धांजली ठरू शकेल.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required