computer

कंपन्या आणि रंगांवरचे त्यांचे हक्क!! ट्रेडमार्क कायदा याबद्दल काय म्हणतो?

यावर्षीच्या जानेवारीमध्ये शेमारू कंपनीने 'शेमारू मराठी बाणा' या नव्या मराठी चित्रपट चॅनेलची घोषणा केली. पण मराठी बाणा हे नाव मराठी जनतेला नवीन नव्हतं. अशोक हांडे या नावाने गेली कित्येक वर्षे मराठी संस्कृतीचा आणि ती जपणाऱ्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम करत आहेत. अर्थातच त्यांनी या चॅनेलच्या नावाला आक्षेप घेतला आणि शेमारूविरुध्द २०० कोटींचा दावा ठोकला. संगीताच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे त्यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम मराठी रसिकांच्या मनाला रिझवतो आहे.  त्यामुळे 'मराठी बाणा' हा शब्द शेमारू कंपनीला व्यापारी उत्पादनासाठी वापरता येणार नाही असा त्यांचा दावा होता. हा शब्द त्यांच्या 'चौरंग' या संस्थेमार्फत 'ट्रेडमार्क' म्हणून नोंदणी केला आहे. त्यामुळे शेमारूला हा शब्द वापरण्यास कोर्टाने निर्बंध घालावेत असा या खटल्याचा आशय होता. हायकोर्टाने अशोक हांडे यांचा दावा सध्या तरी नाकारला आहे.

असो, या खटल्याचं काय होईल हे पुढे आपल्याला दिसेलच, पण या अनुषंगाने ट्रेडमार्क,पेटंट, कॉपीराईट आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अमुक एक शब्द -अमुक एक वाक्य - अमुक एक रंग यावर नक्की हक्क कोणाचा यावरून अनेक विवाद कोर्टात होत असतात. या विवादासाठी ट्रेड्मार्क, पेटंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असे अनेक कायदे आहेत. पण हक्कासाठी दावे चालतच असतात. आता या शब्दांगर्तगत काय येतं हे आपण पुन्हा कधीतरी पाहूच, आणि आज फक्त ट्रेडमार्कबद्दल बोलू.  

ट्रेडमार्क फक्त नावापुरता मर्यादित नसतो. एखादी व्यक्ती किंवा कंपनी त्यांच्या उत्पादनाचे रंग, त्यांच्या टॅग लाईन, त्यांच्या ट्यून्स पण ट्रेडमार्क कायद्याद्वारे नोंदणी करू शकतात. आज आपण काही रंग किंवा रंगछ्टा या 'ट्रेडमार्क' म्हणून कोणी नोंदणी करून ठेवले आहेत याची काही उदाहरणे बघूया!!

चला सुरुवात करू या आपल्या आवडत्या चॉकलेटपासून, म्हणजे कॅडबरीपासून. डोळे मिटून कॅडबरी म्हणा, काय दिसतं? ते कॅडबरी मिल्क चॉकलेटचं जांभळ्या रंगाचं पाकीट! आता याच जांभळ्या रंगावरून माँडलेझ म्हणजे कॅडबरी बनवणारी कंपनी आणि किटकॅट बनवणारी नेस्ले यांच्यामध्ये एक कायदेशीर राडा झाला. माँडेलेझच्या म्हणण्याप्रमाणे हा जांभळा रंग फक्त आणि फक्त कॅडबरीच वापरू शकते. तर नेस्लेचं म्हणणं असं होतं की ही जांभळी रंगछटा PANTONE 2685 C माँडेलेझच्या मक्तेदारीची नाही. या भांडणात नेस्ले जिंकली. आता नेस्लेला हा रंग वापरायचा होता का? बिल्कुल नाही. पण माँडेलेझचा पराभव करणे हाच त्यामागचा उद्देश होता. 

पण माँडलेझ यावर गप्प बसली असेल असं तुम्हांला वाटतं? अहं. यानंतरचा वाद किटकॅट चॉकलेटच्या पॅकेजिंगवरून झाला. किटकॅट आणि त्यांची टॅगलाईन 'हॅव अ ब्रेक' यावर नेस्लेचा हक्क आहे. नेस्ले जेव्हा किटकॅटचे 'फोर फिंगर' पॅकिंग डिझाईनचा हक्क मागायला गेली तेव्हा त्यावर माँडेलेझने आक्षेप घेतला. परिणामी 'फोर फिंगर पॅकिंग'वर नेस्ले स्वतःचा हक्क शाबित करू शकली नाही. माँडेलेझने आधी झालेल्या पराभवाचे असे उट्टे काढले.

तुम्ही 'पोस्ट इट'चे चिकट कागद ( स्टिकी नोट) ऑफीसात नेहमीच वापरत असाल. हे 'पोस्ट इट'  3M नावाची आंतरराष्ट्रीय कंपनी बनवते. केवळ 'पोस्ट- इट' या शब्दावर केवळ 3M चा हक्क आहे असे नाही, तर स्टिकीनोटच्या पिवळ्या रंगावर म्हणजे कॅनरी येलो रंगछटेवर पण 3M चाच हक्क आहे. पोस्ट इटसारखे दिसणारे पिवळे नोट पेपर कोणीही बनवू शकेल, पण ही पिवळी रंगछटा कायदेशीरपणे वापरू शकणार नाही.

बार्बी डॉल तर आपण घरोघरी बघतो. लहान मुलांची खेळणी बनवणार्‍या मॅटेल या कंपनीने 'बार्बी' हे नाव आणि बार्बीच्या फ्रॉकचा रंग (जो जगभर बार्बी पिंक) म्हणून ओळखला जातो हे दोन्ही ट्रेडमार्कचा भाग म्हणून नोंदणीकृत केले आहेत. या गुलाबी रंगछटेचे नाव आहे Pantone 219C.

जगभारातल्या कुरिअर कंपन्यांध्ये युपीएसचे नाव पहिल्या काही नावांत घेतले जाते. या कंपनीच्या लोगोमध्ये वापरलेल्या ब्राऊन रंगाच्या छटेला ' पुलमन ब्राऊन' या नावाने ओळखले जाते. अमेरिकेतल्या पुलमन रेल्वे कंपनीच्या डब्ब्याचा रंग एकेकाळी असाच असायचा. युपीएसने मात्र या रंगावर आपले मालकी हक्क मिळवले आहेत. अर्थात हे हक्क फक्त युनिफॉर्म आणि युपीएसच्या लोगोपुरतेच आहेत. कलरकोडच्या भाषेत या छटेला Pantone 462C असे म्हटले जाते.

आता एक प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिकच येणे शक्य आहे,.  "भारतात या पध्दतीने रंग किंवा रंगछटा ट्रेडमार्क करता येतात का?" हो, करता येतात. एक किंवा एकाच वेळी अनेक रंग भारतात ट्रेडमार्कखाली नोंदणी  करता येतात. यासाठी ट्रेडमार्क कायद्याचे असे सांगतो की,

"Section 10 in The Trade Marks Act, 1999

10. Limitation as to colour.—
(1) A trademark may be limited wholly or in part to any combination of colours and any such limitation shall be taken into consideration by the tribunal having to decide on the distinctive character of the trademark.
(2) So far as a trade mark is registered without limitation of colour, it shall be deemed to be registered for all colours.

हे सगळं गुंतागुंतीचं आहे मंडळी. आजकालच्या फॉरवर्डच्या जमान्यात आपण या गोष्टींकडे इतके लक्ष देत नसलो तरी त्या-त्या कंपन्यांसाठी त्यांची ओळख बनलेले रंग, डिझाईन आणि टॅग लाईन्स खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळेच कधीकधी हक्क नक्की कोणाचा याची भांडणे पार कोर्टापर्यंत जातात!!

सबस्क्राईब करा

* indicates required