हे आजोबा वयाच्या ९७ वर्षांपर्यंत महिन्याला २१ कोटी मानधन घ्यायचे!

‘धरमपाल गुलाटी’ हे नाव तुम्ही कधी ऐकलयं का?  नाव जरी ओळखीच नसलं तरी तुम्ही त्या व्यक्तीला नक्कीच  ओळखता.  एमडीएच मसाल्यांच्या जाहिरातीतील लाल फेटा आणि पांढऱ्या मिशीतले दादाजी आठवले का? तेच एमडीएचवाले दादाजी म्हणजे धरमपाल गुलाटी.

त्यांना ‘दादाजी’ किंवा ‘महाशयजी’  सुद्धा म्हणतात. डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. तो पर्यंत हे आपल्या कंपनीत काम तर करत होतेच पण महिन्याला २१ कोटी मानधन सुद्धा घेत होते. 

१९१९ साली सियालकोट (आताच्या पाकिस्तानातलं गांव) इथं धरमपालांचे वडील ‘चुन्नीलाल’ यांनी ‘महाशियान दि हट्टी’ (एम.डी.एच) या नावाने  एक लहानसं मसाल्याचं दुकान सुरू केलं होतं. आज त्या लहानश्या दुकानाचं रुपांतर १५०० करोड रुपयांच्या कंपनीत झालंय.  फाळणीनंतर धरमपाल गुलाटी दिल्लीला आले आणि त्यांनी करोल बागेत आपलं नवीन दुकान सुरु केलं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांच्या एकूण १५ मसाला फॅक्टरीज आहेत आणि या फॅक्टर्‍या  देशभरातल्या १००० वितरकांना आपली उत्पादनं विकतात.

एमडीएच मसाले सुमारे १०० देशांमध्ये आपला माल विकतात. इतकंच नाही, तर लंडन, दुबई इथंही त्यांची ऑफिसेस आहेत. गुलाटींनी वितरण आणि एकूण बिझनेस त्यांचा मुलगा आणि सहा मुलींच्या हाती सोपवला आहे. मसाला फॅक्टरीशिवाय एमडीएच एक  हॉस्पिटल आणि २० शाळा चालवते. आजच्या घडीला बाजारात पाहिलं तर  एवरेस्ट मसाल्यांच्या खालोखाल एमडीएच मसाले बाजारपेठेत आघाडीवर आहेत. अर्थातच,  याचं सगळं श्रेय धरमपाल गुलाटी यांना जातं.

एमडीएचचे ‘देगी मिर्च’, ‘चाट मसाला’, ‘चना मसाला’ असे एकूण ६० प्रॉडक्टस आहेत ज्यांचे महिन्याला करोडो पॅकेट्स विकली जातात. धरमपाल गुलाटी यांना त्यांच्या यशाबद्दल विचारलं असता ते “माझ्या कामामागची प्रेरणा म्हणजे प्रामाणिकपणे कमी किमतीत जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन देणे आहे” असं म्हणतात.  अगदी आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत हे रोज वितरक, बाजारपेठ, त्यांच्या कारखान्यांना स्वतः भेटीद्यायचे आणि कामाची तपासणीकरायचे. त्यांना भारत सरकार तर्फे पद्म भूषण पुरस्कार पण देण्यात आला होता. 

अशा या अचाट व्यक्तिमत्वाची आज आठवण काढून आपण त्यांचा सन्मान करूया. 

सबस्क्राईब करा

* indicates required