'कार्डियॅक अॅरेस्ट’ आणि 'हार्ट अटॅक' मध्ये काय फरक आहे ? जाणून घ्या !!
ओम पुरी, रीमा लागू, फारुख शेख, आणि काही दिवसांपूर्वी श्रीदेवी यांच्या निधनाने ‘कार्डियॅक अॅरेस्ट’ बद्दल पुन्हा एकदा चर्चा होत आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दलची खरी कारणं काहीही असली तरी पहिल्यांदा जेव्हा ही बातमी आली, तेव्हा ‘कार्डियॅक अॅरेस्ट’ आणि हार्ट अटॅकमध्ये अनेकांनी गल्लत केली होती. काही वृत्तपत्रं आणि वाहिन्या त्यांना ‘हार्ट अटॅक’ आल्याची बातमी देत होते, तर काही ठिकाणी कार्डियॅक अॅरेस्टची बातमी फिरत होती. यावरून अनेकांना गोंधळात पाडलं. नक्की कार्डियॅक अॅरेस्ट आणि हार्ट अटॅक एकच आहेत का? की या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत?
तुमचाही गोंधळ झाला असणार. म्हणूनच आम्ही आज सांगणार आहोत ‘कार्डियॅक अॅरेस्ट’ आणि हार्ट अटॅक मधला फरक काय असतो.
‘कार्डियॅक अॅरेस्ट’ म्हणजे काय ?

हृदयाची धडधड ही विद्युत स्पंदनांमुळे अव्याहत चालू असते. ही विद्युत स्पंदने अचानक जेव्हा अचानक थांबतात, तेव्हा हृदय काम करण्याचे ताबडतोब थांबवते. याचा सरळ परिणाम शरीराच्या रक्ताभिसरणावर होतो. त्याला वैद्यकीय भाषेत ‘कार्डियॅक अॅरेस्ट’ असं म्हणतात. ‘कार्डियॅक अॅरेस्ट’च्या केसमध्ये मृत्यूची शक्यता खूप जास्त असते.
कार्डियॅक अॅरेस्टची लक्षणे
आश्चर्य म्हणजे कार्डियॅक अॅरेस्टची सहसा लक्षणे दिसून येत नाहीत. माणसाचा श्वास नियमित चालू असतो, त्यांना कसलाही त्रास होत असलेला दिसून येत नाही. त्यामुळे धडधाकट माणसाला देखील कार्डियॅक अॅरेस्टचा झटका आल्याची अनेक उदाहरणे आहेत. याला काही अपवाद देखील असू शकतात.
हार्ट अटॅक म्हणजे काय ?

‘हार्ट अटॅक’ म्हणजे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळे येऊन हृदयाचे कार्य विस्कळीत होणे. यावेळी धमन्यांमध्ये अडथळे येऊन हृदयाच्या स्नायुंना रक्त मिळत नाही व त्यातील पेशी मरतात. ह्यामुळे ह्र्दयाचे कार्य विस्कळीत होते. हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच वेळा ‘परिहृद् धमनी’त (कॉरोनरी आर्टरी) निर्माण झालेल्या रक्तगुठळ्यांमुळे निर्माण होऊ शकतो.
आपल्या आहार आणि विहाराच्या असंतुलानातून शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. हे कोलेस्ट्रॉल हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात जमा होते. ह्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही. याचा परिणाम हृदय विकाराच्या झटक्याद्वारे दिसून येतो.
हार्ट अटॅकची लक्षणे
छातीच्या मधोमध दुखायला सुरुवात होऊन हा त्रास सहसा तुमच्या डाव्या हाताकडून पसरत मानेला, पाठीला तसेच जबड्यापर्यंत पसरत तिथे त्रास सुरु होतो. याच बरोबर मळमळ, घाम सुटणे, चक्कर येणे, अस्वस्थता, उलट्या होणे अशी लक्षणे सुद्धा दिसू लागतात.
हार्ट अटॅक किंवा कार्डियॅक अॅरेस्ट’ आल्यास काय करावे.
1. हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतर सर्वात आधी रुग्णाला झोपवून त्याचे कपडे सैल करावेत. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुमच्या मुखावाटे त्याला श्वासोछ्वास देणं फायदेशीर ठरू शकतं. मुखातून जाणारा श्वास बाहेर पडू नये म्हणून हाताने रुग्णाचे तोंड काहीसे या प्रकारे झाकावे की तुम्ही दिलेला श्वास सरळ त्याच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचेल. जर रुग्णाला अॅस्पीरीनची अॅलर्जी नसेल तर त्याला पाण्यात ढवळून अॅस्पीरीन द्यावे. सुरुवातीच्या काही मिनिटात या प्रकारची काळजी घेतल्याने धोका बऱ्याच अंशी टाळता येतो.

2. कार्डियॅक अॅरेस्टचा झटका आल्यास त्वरित रुग्णाला आडवे झोपवून त्याचा श्वास तपासावा आणि मोठ्या आवाजात त्याचे खांदे हलवून तो ठीक असण्याची खात्री करून घ्यावी. मोठ्याने विचारल्याने अश्या परिस्थितीत रुग्णापर्यंत तुमचा आवाज नीट पोहोचतो. श्वास चालू असल्यास त्वरित डॉक्टरांना फोन करून सर्व कल्पना द्यावी. श्वासोच्छ्वास नीट चालत नसल्यास रुग्णाच्या छातीवर जवळजवळ ३० वेळा दाब द्यावा. रुग्णाला यावेळी श्वास घेण्यास समस्या येऊ शकते. अशावेळी वर म्हटल्या प्रमाणे तुम्ही त्याला आपल्या मुखाद्वारे श्वास देऊ शकता.
मंडळी या दोन्ही विकारांचा संबंध आपल्या हृदयाशी असला तरी दोन्हींचं स्वरूप वेगवेगळं आहे. म्हणून हार्ट अटॅक आणि कार्डियॅक अॅरेस्ट हे एकच आहेत असं म्हणण्याची गल्लत करू नका.