computer

जहाज बाहेर काढणाऱ्या बुलडोझरचे मिम्स शेअर केले? आता त्या बुलडोझर चालकाबद्दल जाणून घ्या!!

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले सुएझ कालव्यामध्ये अडकलेले जहाज गेल्या आठवड्यात सुटले. या अडकेलेल्या जहाजाला काढायला अनेकजण प्रयत्न करत होते. त्याबद्दलच्या बातम्या सतत माध्यमांमध्ये येत होत्या. मिम्स च्या जगातही हा ट्रेंडिंग विषय कसा मागे राहील? अडकलेलं जहाज बाहेर काढण्यासाठी एक छोटासा पिवळा बुलडोझर मदत करतोय असा एक फोटो व्हायरल झाला होता. दोघांच्या आकारमानात असलेली तफावत प्रचंड विनोदाचा भाग बनली. याविषयी अनेक विनोद मिम्स फिरले.

हे सगळं ठीक आहे पण या छोट्या बुलडोझरने जहाजाला बाहेर काढण्यात मोठी मदत केली आहे हे विसरून चालणार नाही. हे काम ज्या तरुणाने केलं तो कसा हिरो ठरला याविषयी आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया.

२६ वर्षीय अब्दुल्ला २३ मार्चला नेहमीप्रमाणे कामाला निघाला. सकाळी ७ वाजता निघाला असता त्याला दिसले की काही दरवाजे बंद आहेत. त्यावेळी अब्दुल्लाला काहीच कल्पना नव्हती की कालव्यात एक मोठे जहाज अडकून पडले आहे. तो अल अरबाईन येथे असलेल्या त्याच्या घरी गेला. थोड्यावेळाने अब्दुल्लाला त्याच्या मॅनेजरचा फोन आला. त्याने त्याला कालव्याच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर यायला सांगितले. सुएझ कालवा प्राधिकरणच्या कारने तो तातडीने तिकडे रवाना झाला. मॅनेजरने त्याला एव्हर ग्रीन जहाजाबद्दल सांगितले आणि ते नेमके कुठे अडकले आहे याची कल्पना दिली. 

अब्दुल्लाला त्या जागेची पूर्ण कल्पना होती व तिथे बऱ्याचद ये-जा केल्याने अनुभवही होता.  त्या जहाजाचे बो गाळात गेल्यामुळे ते अडकले असावे हे सांगितले. ते मुक्त करायचे असेल तर दोन्ही बाजूंनी जहाजच्या भोवती खोदणे आवश्यक आहे. त्याने लगेच ते मिशन समजून काम करायला सुरुवात केली. बुलडोझरच्या साह्याने खोदकाम सुरू केले. तो गाळ काढणे खूप आव्हानात्मक होते. त्याला न थांबता, न थकता काम करावे लागले. अखेर २९ मार्च २०२१ रोजी जेव्हा ते जहाज सुटले तेव्हा अब्दुल्ला घामाने डबडबला होता. प्रचंड थकला होता. पण जहाज सुटल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

अब्दुल्ला एकीकडे आपलं काम करत होता तर दुसरीकडे त्याचे मिम्स व्हायरल होत होते. याबद्दल पहिल्यांदा समजल्यावर त्याला आपली थट्टा होत आहे असं जाणवलं, पण त्यासोबतच आंतरराष्ट्रीय व्यापारीमार्ग सुरळीत करण्यासाठी त्याने केलेल्या कामाचे जगभरात कौतुक होत आहे याचा त्याला आनंदही झाला. जगभरातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. एक खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणून त्याचे सगळीकडे कौतुक होऊ लागले.

अब्दुल्ला म्हणतो, माझ्या बुलडोझर समोर ते जहाज ५००पट मोठे होते, पण म्हणून कोणालाही लहान समजून त्याची मस्करी करू नये.

त्याच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे. लहान टग बोट्स आणि अब्दुल्लाच्या लहानशा बुलडोझरनेच हे अवाढव्य जहाज जागचे हलू शकले. अब्दुल्लाने दाखवलेल्या धडसाबद्दल त्याच कौतुकच करायला हवं.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required