computer

हे आहेत इको फ्रेंडली गणेश : यांचातला तुम्ही कोणता बसवणार? 

मंडळी गणेशचतुर्थीला सर्वांच्या घरी बाप्पा येतायत.. तशी तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी एव्हाना चालू केलीच असणार म्हणा, पण गणेशमूर्तीचं काय? यावर्षी तरी इको फ्रेंडली गणेशमूर्ती बसवण्याचा संकल्प केलाय ना? नसेल तर आत्ताच करून टाका. गेल्या काही वर्षांत बरेच लोक पर्यावरण प्रदूषणाला गंभीरतेने घेऊन इको फ्रेंडली गणेशमूर्तीना प्राधान्य देतायत. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या इको फ्रेंडली गणेशमूर्तींची यादी आणलीये.

प्लांट गणेशा

या वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती लाल माती, सेंद्रिय खत, नैसर्गिक रंग आणि बियाण्यांपासून बनवल्या जातात. गणेशोत्सवानंतर ही मूर्ती पाण्यात विसर्जित न करता ती एखाद्या माती असलेल्या कुंडी किंवा पॉटमध्ये ठेवा, आणि संपूर्ण विरघळेपर्यंत तिच्यावर पाणी घाला. मुर्ती तर सहज विरघळेल, सोबत तिच्यात असलेल्या बिया रूजून एखादं छानसं झाड तुमच्या अंगणात वाढेल!! आहे ना खरा इको फ्रेंडली गणपती?

चॉकलेट गणेशा

संपूर्ण चॉकलेटपासुन बनवलेली गणेशमूर्तीही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या मुर्तीला दूधात विसर्जित करून हे चॉकलेट मिल्क  तुम्ही गरीब मुलांना वाटू शकता.

फिश फ्रेंडली गणेशा

या मुर्ती मैदा, कणिक, बिस्किट, ब्रेड, अशा खाद्य पदार्थांपासून बनवल्या जातात. यांना दिलेला रंगही नैसर्गिक असतो. त्यामुळे या मूर्तींना तुम्ही खुशाल पाण्यात विसर्जित करू शकता. एकीकडे माशांना खाद्यही मिळेल आणि दूसरीकडे प्रदूषणही होणार नाही!

व्हेजीटेबल गणेश

घरच्याघरी उपलब्ध असणार्‍या फळभाज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गणेशमूर्ती बनवू शकता. यासाठी कलिंगड, दुधीभोपळा, दोडका, कारली, गाजर, शिमला मिरची, अशा विविध फळभाज्या तुम्हाला उपयोगाला येतील.

कोकोनट गणेश

नारळ, नारळाच्या साली आणि करवंट्यापासूनही तुम्हाला इको फ्रेंडली गणपती बनवता येईल.

पेपर गणेशा

घरात असणार्‍या रद्दीचा लगदा बनवून डिंकाच्या मदतीने घरीच तुम्ही पेपर गणेश साकारू शकता. या मूर्ती आकर्षक स्वरूपात बाजारातही मिळतील. या वजनाला अत्यंत हलक्या असतात, ज्यामुळे लहान मुलंही बाप्पांना सहज उचलून घेतील.

तुरटीपासून बनवलेला गणेश

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीना एक उत्तम पर्याय म्हणून तुम्ही तुरटीपासून गणेशमूर्ती बनवून घेऊ शकता. तुरटी ही पाणी शुध्द करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे या तुरटीच्या साध्या सुंदर गणेशमूर्ती वापरल्यास जलपर्यावरणाची निगा राखली जाईल.

घरच्याघरी चिकणमाती, शाडू माती, पीठ, अशा साहित्याचा वापर करूनही तुम्ही तुम्हाला हवा तसा इको फ्रेंडली गणेश बनवू शकता. 

बघा मंडळी, पर्यावरणाची काळजी घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव तुम्हाला समाधान तर देईलच, सोबत काहीतरी कल्पक, आणि नाविन्यपूर्ण केल्याचा आनंदही देईल. चला तर मग, पर्यावरण संरक्षण हे आपलं कर्तव्य मानून इको फ्रेंडली गणपती घरी आणूया. आणि हो, फटाके आणि डॉल्बीला फाटा द्यायला विसरू नका...

सबस्क्राईब करा

* indicates required