३२१ तासांत ७८२० किलोमीटर प्रवास करून देशाला प्रदक्षिणा घालण्याचा विश्वविक्रम करणारा मराठी तरुण!!

बाईक चालवणे कुणाला आवडत नाही? आपल्यापैकी अनेकांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास बाईकवरून केला असेल. मुंबई ते गोवा, मुंबई ते पुणे वगैरे प्रवास करणारे आपल्यात पुष्कळ लोक आहेत. एवढंच काय, महाराष्ट्रातून लेह-लडाखपर्यंत जाऊन येणारेही बाईक रायडर्स तुम्हाला माहीत असतील. या सगळ्या प्रवासात थोड्या-थोड्या अंतरावर आपण विश्रांती घेतो. पण सलग शंभर किलोमीटर न थांबता बाईक चालवता येईल काय? पण कल्पना करा, एखाद्याने संपूर्ण भारतालाच सुवर्ण चतुष्कोन (Golden Quadrilateral) या मार्गावरून प्रदक्षिणा घातली तर?
होय, आज ओळख करून घेणार आहोत लातूरच्या एका जिगरबाज तरुणाची... त्याचं नाव आहे प्रतीक फुटाणे! प्रतीकने सुवर्ण चतुष्कोन विक्रमी वेळेत पूर्ण केलाय आणि तो हा पराक्रम करणारा जगातला सर्वात लहान रायडर ठरला आहे. त्याचे नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'मध्ये नोंदवले जात आहे आणि पुढे लिम्का बुक व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्येही नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या प्रतीकचा प्रवास १९ सप्टेंबर २०२० रोजी सुरू झाला आणि ०१ ऑक्टोबर २०२० रोजी पूर्ण झाला. या दरम्यान ३२१ तासांत त्याने तब्बल ७८२० किलोमीटर बाईक चालवली आहे. त्याचा हा एकमेवाद्वितीय पराक्रम आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत. बोभाटातर्फे लातूरच्या अनुप कुलकर्णी यांनी त्याची मुलाखत घेतली आहे. चला तर मग पाहूया प्रतीक त्याच्या यशाबद्दल काय म्हणतोय...

सर्वप्रथम बोभाटा आणि बोभाटाच्या सर्व वाचकांतर्फे तुझे हार्दिक अभिनंदन! तू फार मोठा विक्रम केला आहेस यात शंकाच नाही. ही राईड करावी किंवा विक्रम करण्यासाठी सुवर्ण चतुष्कोन हाच रस्ता निवडावा असे तुला का वाटले हे आम्हाला जाणून घेण्यास आवडेल.
प्रतीक : धन्यवाद! बाईक चालवण्याची मला आवड तर आहेच, शिवाय आपल्या भारत देशावरही माझे खूप प्रेम आहे. भारताची विविधतेमधील एकता मला नेहमी आकर्षित करते. वेगवेगळ्या प्रांतातील राहणीमान, तिथली संस्कृती, त्यांचे पेहराव आणि विचारसरणी जाणून घ्यायला मला आवडते. भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत एकसंधपणे जोडला जावा यासाठी सुवर्ण चतुष्कोन रस्त्याचे स्वप्न पाहिले होते आणि जर यामुळे भारत जोडला जातोय तर आपण सुद्धा याच संपूर्ण रस्त्यावर प्रवास करून अटलबिहारी वाजपेयींना मानवंदना द्यावी हा विचार माझ्या मनात होता.
पण आताच हा प्रवास का करावा वाटला?
प्रतीक : हे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर मी लांब पल्ल्याचे अनेक प्रवास बाईकवरून केले आहेत. पण एकदा समजलं की सुवर्ण चतुष्कोनवर माझ्याएवढ्या कमी वयाच्या कुठल्याच रायडरने प्रवास केला नाही. त्याचवेळी मी ठरवलं की हा विक्रम मीच करणार. तशी त्याची तयारी सुद्धा केली होती परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काही महिने थांबावे लागले. शिवाय काही दिवसांतच मी २३ वर्षांचा होईन. आणखी काही काळ थांबलो असतो तर 'यंगेस्ट बायकर' हा किताब मिळाला नसता.

तू या प्रवासात दोन संदेश घेऊन निघाला होतास. तेच संदेश तू का निवडलेस?
प्रतीक : माझा पहिला संदेश होता तो 'डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव्ह'. हा संदेश निवडला याचे कारण असे की भारतात रोज सरासरी १७०० रस्ते अपघात होतात. रोज सरासरी ४८५ मृत्यू रस्ते अपघातामुळे होतात. आणि यात दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. दारू पिऊन गाडी चालवणारे जास्त लोक हे ट्रक ड्रायव्हर असतात. मी ज्या रस्त्यावर प्रवास करणार होतो त्यावर ट्रक्सची प्रचंड वर्दळ असते म्हणून जनजागृती करण्यासाठी डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव्ह हा संदेश निवडला. दुसरा संदेश होता तो 'सेव्ह गर्ल्स'. भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी आहे. कित्येक मुलींना गर्भातच मारले जाते. अनेक मुलींवर अत्याचार होतात अश्या घटना आपण रोज बघतो. या घटना कमी व्हाव्या आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सन्मान मिळावा म्हणून मी 'सेव्ह गर्ल्स' हा संदेश निवडला.
तू एवढा मोठा प्रवास करण्याचा निर्णय घरी सांगितला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? शिवाय इतक्या कमी वयात तुला प्रवासखर्च कसा झेपला?
प्रतीक : खरंतर मला बाईक रायडिंगची खूप आवड आहे हे माझ्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना माहीत आहेच. शिवाय ही भटकंतीची आवड माझ्यात माझ्या वडिलांनीच रुजवली आहे. मी लहान असताना त्यांनी मला सोबत घेऊन बराच प्रवास केला आहे आणि विविध ठिकाणे दाखवली आहेत. जेव्हा हा निर्णय मी घरी सांगितला तेव्हा वडिलांनीच पूर्ण पाठिंबा दिला. सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांनीच घेतली. माझे वडीलच माझे प्रेरणास्थान आणि स्पॉन्सर आहेत. याशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांनी माझ्या प्रवासादरम्यान माझे लोकेशन जीपीएसवर तपासण्याची जबाबदारी घेतली. चोवीस तास कुणी ना कुणी जीपीएस वर लक्ष ठेऊन असे. मी कुठे दहा मिनिटं एका जागी थांबलो तर मला काळजीपोटी फोन येत असे. मग ती वेळ दिवसाची असो वा रात्रीची! माझी एक बहीण तर परदेशातून लक्ष ठेऊन होती. हे सर्वजण माझ्या सोबतच आहेत असा विश्वास प्रवास करताना मला कायमच वाटत होता.
आता जरा प्रत्यक्ष प्रवासाबद्दल बोलू या… संपूर्ण भारताची प्रदक्षिणा तू केली आहेस तर विविध अनुभव सुद्धा आले असतील. रस्त्यात भेटलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? काही अडचणी आल्या? बाईकने व्यवस्थित साथ दिली का?

प्रतीक : याबाबत खूप काही बोलण्यासारखं आहे. सुदैवाने मला चांगले अनुभवच जास्त आले. काही अनुभव विशेष सांगण्यासारखे आहेत. रस्त्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती माझा पेहराव आणि छातीवरचा तिरंगा बघून माझी चौकशी करत असे. मी कुठून आलो विचारत असे. मी महाराष्ट्र राज्यातील लातूरचा आहे असे समजताच, "अच्छा विलासरावजी देशमुख का गांव?" असे उद्गार त्यांच्या तोंडून निघत. काही जणांनी तर "वो ट्रेन से पानी दिया वो लातूर?" असेही विचारले. काही जणांनी भूकंपामुळे लातूरला लक्षात ठेवले आहे. प्रवासात सर्वच ठिकाणी लोकांनी मदत केली. एवढंच काय, भेटलेल्या सर्व वाहतूक पोलिसांनी सहकार्य केले. आपुलकीने चौकशी केली. काही ठिकाणी मिलिटरीचे जवान सुद्धा भेटले. त्यांनीही माझे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या प्रवासात एकदा एका जवानाला लिफ्टची गरज होती तेव्हा मी रस्ता सोडून पंचवीस किलोमीटर आत त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी सोडून आलो.
वाईट अनुभव सांगायचे झाले तर त्यांना वाईट म्हणणार नाही, पण कठीण अनुभव म्हणता येईल अश्या दोन घटना घडल्या. राजस्थान मध्ये एका फाट्यावर मी चुकून वेगळा रस्ता पकडला होता. त्यामुळे मूळ रस्ता सोडून दोनशे किलोमीटर पुढे गेलो होतो. तो एकच रस्ता परत येण्याचा असल्याने परत दोनशे किलोमीटर यावे लागले. ही चारशे किलोमीटरची राईड जास्त झाल्याने मला वेळेची बरीच कसरत करावी लागली. दुसऱ्या एका प्रसंगात स्थानिक आंदोलनामुळे रस्ते बंद होते म्हणून मला जंगलातील आडमार्ग घ्यावा लागला. हा शंभर दीडशे किलोमीटरचा रस्ता एकदम सुनसान होता आणि माझ्याशिवाय त्या रस्त्यावर कुणीच नव्हते. हा रस्ता कायम माझ्या लक्षात राहील.
आता गोष्ट बाईकची… तर हा प्रवास व्यवस्थित पार पाडू शकलो याचे मुख्य श्रेय तर बाईकचेच आहे. माझ्या अव्हेंजर २२० सीसी बाईकने मला मोलाची साथ दिली. काहीवेळा चेनचा प्रॉब्लेम आला, पण भारतात विखुरलेल्या आमच्या बायकर्स असोसिएशनच्या सदस्यांनी तो दूर केला. त्यांचे आभार मानावे तितके कमीच! ज्या शहरात मी जाईन तिथले सदस्य मला येऊन भेटत असत. माझे धाडस वाढवत असत. शिवाय जिथे मी विश्रांती घ्यायची ठरवत असे तिथेही त्यांच्यापरीने बरीच व्यवस्था करत असत.
आणखी एक गोष्ट विशेष नमूद करावी वाटते... ओरिसा, बिहार आणि उत्तरप्रदेश मध्ये फिरताना मनावर दडपण येत असे. एकट्याने प्रवास करताना तिथे बराच धोका असतो हे वेळोवेळी तिथले नागरिक मला सांगत. काही ठिकाणी तसे अनुभवही आले. पूर्ण प्रवासात एक गोष्ट मात्र लक्षात आली… आपल्या महाराष्ट्राएवढा सुरक्षित प्रवास दुसरीकडे होऊ शकत नाही.
आता सांग, एवढे अनुभव घेऊन आणि ही ट्रिप करून तू काय मिळवलेस असे तुला वाटते? म्हणजे मी रेकॉर्ड बाबत बोलत नाही. तू तुझे नाव त्यावर कोरले आहेच, याशिवाय तुला वैयक्तीकरित्या काय फायदा झाला?

प्रतीक : माझी निर्णयक्षमता वाढली. बाईक वेगात जात असतानाही आजूबाजूला संपूर्ण लक्ष ठेवण्याची क्षमता वाढली. फिटनेस अधिक चांगला झाला आणि आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. महत्वाचं म्हणजे या प्रवासात मी रायडर तर होतोच, पण आता मेकॅनिकसुद्धा झालो आहे. कारण बाईकचा प्रत्येक पार्ट मी ओळखायला शिकलो आहे. बाईकच्या आवाजावरून कुठे काय प्रॉब्लेम असू शकेल हे मी आता खात्रीने सांगू शकतो.
ग्रेट! आता साहजिकच माझा पुढचा प्रश्न हा आहे की, तुझ्यापासून अनेक तरुण आता प्रेरणा घेणार आहेत. हे भव्य यश मिळवल्याने तुझ्याकडून लोक मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतील. तुझी प्रेरणा घेऊन कुणी अशी ट्रिप करायची ठरवली तर तू त्यांना काय सांगशील?
प्रतीक : हो याची मला जाणीव आहे… मी एवढंच सांगेन की, विविधतेने नटलेल्या भारत प्रत्येकानेच पाहायला हवा. रेल्वे, बस किंवा विमानाच्या प्रवासात खरा भारत दिसत नाही. तो बाईकवरूनच दिसतो. लोकांत मिसळायचे असेल आणि भारत जाणून घ्यायचा असेल तर नक्की ही ट्रिप किंवा मोठ्या अंतराची कोणतीही ट्रिप करा. पण… हे तेव्हाच करा, जेव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संपूर्णपणे सक्षम असाल! कारण अश्या ट्रिपमध्ये जेवढे शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे आहे तेवढेच, किंवा त्यापेक्षा जास्त खंबीर मानसिकता महत्वाची असते.
आता शेवटचा प्रश्न… यापुढे काय? भारताची प्रदक्षिणा करून प्रतीक शांत बसणार की पुढचे काही ध्येय ठरवले आहे?
प्रतीक : ही ट्रिप करताना माझ्या मनात कायम विचार येत होता की आपण एवढे सुरक्षित फिरू शकतो, लोक आपापली कामे सुरळीतपणे करू शकतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे निर्धास्त राहू शकतात ते कुणामुळे? तर भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या जवानांमुळे! ही ट्रिप करतानाच मी ठरवलं आहे की आपले पुढचे ध्येय असेल 'भारत सेना सन्मान यात्रा'. यात भारताच्या प्रत्येक बॉर्डरवर जाऊन सैनिकांना भेटण्याचा माझा प्रयत्न असेल.
खरोखर फार छान ध्येय ठेवले आहेस प्रतीक. आम्हाला तुझा अभिमान वाटतो. पुढील कार्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा!

तर वाचकहो, बावीसाव्या वर्षी एवढा मोठा पराक्रम करणाऱ्या प्रतीकचा आदर्श प्रत्येक तरुणाने ठेवायला हवा. तुम्हाला त्याच्या विविध ट्रिप्सविषयी अधिक माहिती हवी असेल तर तो त्याच्या 'Road Burner' या युट्युब चॅनलवर उपलब्ध असेल.