computer

पाकिस्तान आणि बलुचिस्तानच्या भांडणाचं मूळ, आणि सद्यपरिस्थिती नक्की काय आहे?

‘दि फॅमिली मॅन’ आणि ‘बार्ड ऑफ ब्लड’ या दोन नवीन सिरीज रिलीज झालेल्या आहेत. दोन्ही सिरीजची कथानकं वेगळी आहेत, पण एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे बलुचिस्तान.

काही वर्षांपासून वृत्तपत्रांमध्ये, सोशल मिडीयावर बलुचिस्तानची चर्चा जोर धरत आहे. यावर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये ‘Justice for Balochistan' हे वाक्य लिहिलेला बॅनर स्टेडीयमवरून फिरवण्यात आला होता. स्टेडीयमच्या बाहेर पाकिस्तानी आणि बलुची प्रेक्षकांमध्ये हाणामारी पण झाली होती.

हे सगळं बघितल्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की बलुचिस्तानचा प्रश्न नेमका आहे तरी काय? आज आम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कुठे आहे बलुचिस्तान ?

बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या नैऋत्येला असलेला प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या अर्धा भाग बलुचिस्तानने व्यापलाय, पण त्या मानाने पाकिस्तानच्या लोकसंख्येत बलुची लोकसंख्या केवळ ३.६ टक्के एवढीच आहे. बलुचिस्तानच्या मोठ्या भागात माणसांची वस्ती नाही. तिथली लोकसंख्या फारच विरळ आहे.

पाकिस्तानसाठी बलुचिस्तान अत्यंत महत्वाचा आहे, कारण हा भाग तेल, नैसर्गिक वायू, युरेनियम, सोने, तांबे अशा नैसर्गिक संसाधानांनी समृद्ध आहे.

बलुचिस्तान पाकिस्तानशी कसा जोडला गेला?

पंजाब पासून इराणपर्यंत पसरलेल्या दुराणी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर बलुचिस्तान भागात ‘माकरान’, ‘खारान’, ‘लास बेला’ आणि ‘कलाट’ ही ४ राज्यं उदयास आली. ब्रिटीश काळात या चार राज्यांमध्ये आणि ब्रिटीश सरकारात ‘कलाटचा तह’ करण्यात आला. या तहामुळे ही राज्यं ब्रिटीश अंमलाखाली आली पण त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं.

स्वातंत्र्यानंतर बलुचिस्तानचा भागही स्वतंत्र झाला, पण काही काळापुरताच. १९४७ साली ‘माकरान’, ‘खारान’, ‘लास बेला’ यांनी पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला. कलाटने मात्र आपली स्वायत्तता जाहीर केली.

सुरुवातीला कलाटच्या स्वातंत्र्याला मोहम्मद अली जिना यांचा पाठींबा होता, पण नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि कलाटला पाकिस्तानशी जोडून घेतलं. २७ मार्च १९४८ रोजी संपूर्ण बलुचिस्तान पाकिस्तानच्या अखत्यारीत आला.

बलुचिस्तानचा प्रश्न काय आहे ?

‘आम्हाला स्वतंत्र राहायचं होतं पण पाकिस्तानने आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं’ असं बलुची लोकांचं म्हणणं आहे. या कारणाने बलुची लोकांमध्ये असंतोष आहे. याखेरीज दुसरा प्रश्न हा सांस्कृतिक आहे. बलुची लोक आणि पाकिस्तानचा इतर भाग यांच्यात सांस्कृतिक वेगळेपण आहे. हेच वेगळेपण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होतं. त्याचाच परिणाम म्हणून बांगलादेश स्वतंत्र झाला.

बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर बलुची लोकांना बळ मिळालं आणि त्यांची स्वातंत्र्याची मागणी आणखी जोर धरू लागली. ७० च्या दशकात बलुचिस्तानात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते, पण स्वातंत्र्याची मागणी करणारे लोक पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या अगदीच कमी होते. असं म्हणतात की पाकिस्तानने आपल्या लष्करी शक्तीने ह्या मागणीला थोपवून टाकलं.

यानंतरच्या काही दशकानंतर जेव्हा नवीन पिढीला जाग आली तेव्हा त्यांचे प्रश्न वेगळेच होते. स्वतंत्र होण्याची मागणी कमी होऊन नैसर्गिक संसाधनांवरच्या हक्काची मागणी वाढली. याला कारणही तसंच होती. पाकिस्तानने बलुची भागातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनं उपसून काढण्याची सुरुवात केली होती. यातून जो पैसा आला तो बलुचिस्तानच्या पदरात पडत नव्हता.

सध्या काय परिस्थिती आहे ?

बलुचिस्तानचा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय दर्जावर चर्चेत आहे. असं असूनही तिथली परिस्थिती बदललेली नाही. बलुची लोकांचं म्हणणं आहे की पाकिस्तान मानवी अधिकारांच उल्लंघन करून तिथल्या विरोधांना थोपवत आहे.

चीनचे हात देखील बलुची भागात गुंतलेले आहेत. काही वर्षापूर्वी चीनने One Belt One Road (OBOR) संकल्पना मांडली होती. OBOR द्वारे चीनला आशिया, आफ्रिका आणि युरोपच्या देशांना जोडायचं आहे. बलुची लोकांचा OBOR ला कडाडून विरोध आहे. OBOR अंतर्गत सुरु केलेल्या कामांन बलुची लोकांनी नष्ट करण्याच्या घटना घडल्या आहेत.

बलुचिस्तानला या सर्व प्रकरणात आंतरराष्ट्रीय मदत हवी आहे. भारताकडेही त्यांनी मदतीचा हात मागितला आहे. एवढ्या वर्षात स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचं स्वरूप मोठं झालेलं असलं तरी तिथली परिस्थिती बदललेली नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required