computer

मुंबई-नव्यामुंबईच्या १६ मेट्रो कुठून-कुठेपर्यंत-कोणती स्टेशन्स सगळी माहिती एका ठिकाणी!!

मुंबईत ६० च्या दशकात ट्राम बंद झाली. प्रवास करण्यासाठी बस, रिक्षा, टॅक्सि आणि लोकल रेल्वे हे चारच मार्ग उरले. खाजगी वाहन असेल तर उत्तम नाही तर या चार पर्यायांवर आणि खास करून लोकलवर अवलंबून राहावं लागतं.

३ वर्षापूर्वी यात आणखी एक भर पडली. ती म्हणजे मेट्रोची. सुरुवातीला ३ मेट्रो लाईन्सचा प्रकल्प आखण्यात आला होता. सध्या ३ चे १४ झाले आहेत. संपूर्ण मुंबईत, ठाण्यात मेट्रोचं काम सुरु आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे मेट्रोचं जाळं कुठपर्यंत पसरलेलं असेल, आपल्याला त्याचा कसा फायदा होणार आहे, त्यात किती स्टेशन्स असतील, हे काम कधी पूर्ण होईल इत्यादी इत्यादी.

आज आम्ही मुंबई मेट्रोच्या संपूर्ण जाळ्याची सविस्तर माहिती घेऊन आलोय. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का पाहा.

मेट्रो-१ वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपरला जोडणारी ११.४० किलोमीटर लांबीची पहिली मेट्रो ८ जून, २०१४ साली सुरु झाली. या मार्गावर १२ स्टेशन्स आहेत. पूर्वी घाटकोपर ते वर्सोवा प्रवासासाठी दीड तासांचा वेळ लागायचा तेच अंतर आता २० मिनिटात पूर्ण होतं. या मेट्रोचा फायदा आज ४ लाख मुंबईकरांना होत आहे. यातून तब्बल २,३५६ कोटी रुपयांची आर्थिक फायदा होतोय.

मेट्रो-२ A – दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो

दहिसर-चारकोप-बांद्रा-मानखुर्द या चार भागांना जोडणाऱ्या मेट्रो-२ च्या पहिल्या टप्प्यातलं काम सुरु आहे. या मार्गावर १७ स्टेशन्स असतील. या मार्गिकेची लांबी १८.५ किलोमीटर असणार आहे. मेट्रो-२ चा फायदा असा की जे भाग लोकलने जोडलेले नाहीत त्या भागांना मेट्रो जोडणार आहे. या कारणाने प्रवासाचा नवीन मार्ग उपलब्ध होईल, तसेच ट्राफिक कमी होईल, इंधन वाचेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी ६,४१० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

स्टेशन्स :

दहिसर (पूर्व), आनंद नगर, ऋषी संकुल, आय.सी.कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड, कस्तूर पार्क, बांगूर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर, डीएन नगर.

मेट्रो-२ B - डी. एन. नगर ते मानखुर्द

हा मार्ग २३.५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गावर २२ स्टेशन्स असतील. मेट्रो-२ B हा ८ डब्यांच्या मेट्रोसाठी डिझाईन केला गेलाय. मेट्रो तयार झाल्यानंतर २०२१ पर्यंत या मार्गावरून ८.०९ लाख प्रवासी प्रवास करतील.

स्टेशन्स :

ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे, एमएमआरडीए, आयकर कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनल, कुर्ला-ई, ईईएच, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडला (डेपो).

मेट्रो -३ - कुलाबा-वांद्रे-अंधेरी (सिप्झ) कॉरिडोर (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे कार्यान्वित)

कुलाबा ते सिप्झ पर्यंत जाणारी ही मेट्रो संपूर्णपणे भुयारी मार्गाने जाणार आहे. २७ स्टेशन्स असलेला हा मार्ग ३२ किलोमीटरचा असणार आहे. हा मार्ग नरीमन पॉईंट, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सिप्झ या महत्वाच्या भागांना जोडेल.

मेट्रो-३ साठी २३,१३६ कोटी रुपये आर्थिक खर्च येणार आहे. ही आर्थिक मदत भारत सरकार, राज्य सरकार तसेच जपान इंटरनॅशनल कॉऑपरेशन एजन्सी यांच्याकडून केली जाणार आहे. हा मार्ग तयार झाल्यावर अंदाजे २० लाख प्रवाशांना फायदा होईल.

स्टेशन्स :

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रांट रोड, मुंबई सेंट्रल (एम), महालक्ष्मी (एम), विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धी विनायक, दादर, शीतलादेवी मंदिर, धारावी, वांद्रे (एम), विद्यानगरी, सांताक्रूझ (एम), सांताक्रूझ विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ (सहार), मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ.

मेट्रो –४ वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली

ठाणे आणि मुंबईला जोडण्यासाठी या कॉरिडोरची कल्पना मांडण्यात आली आहे. ३२ किलोमीटरच्या या मार्गिकेत ३० स्टेशन्स असतील. या मेट्रोने वडाळा, चेंबूर आणि घाटकोपर जोडले जातील. २०१४ साली प्रकल्पाच्या सुरुवातीचा खर्च हा १९००० कोटी एवढा होता. 

स्टेशन्स :

भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टीटी, आणिक नगर बस डेपो, सुमन नगर, सिद्धार्थ कॉलनी, अमर महल जंक्शन, गरोडिया नगर, पंत नगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्य नगर, गांधी नगर, नवल हाउसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शांगरीला, सोनापूर, मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका, तीन हाथ नाका (ठाणे), आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, मजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली आणि ओवळा येथे डेपो.

मेट्रो – ५ - ठाणे-भिवंडी-कल्याण

ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबईला लागून असलेल्या महत्वाच्या भागांना जोडणारी मेट्रो-५ २४ किलोमीटर लांबीची असणार आहे. या मार्गिकेत १७ स्टेशन्स असतील. ही मेट्रो ६ डब्यांची असणार आहे. २०२१ साली २.२९ लाख प्रवाशांना या मार्गाचा फायदा होईल.

स्टेशन्स :

कल्याण एपीएमसी, कल्याण स्टेशन, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोन गाव, गोवे गाव एमआयडीसी, रजनौली, टेमघर, गोपाल नगर, भिवंडी, धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, काशेली, बाळकुम नाका, कापूरबावडी.

मेट्रो – ६ - स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी

ही मेट्रो सुद्धा ६ डब्यांची असेल. या मार्गात १३ स्टेशन्स असतील. ही संपूर्ण मार्गिका १४.५ किलोमीटर लांबीची असणार आहे. २०२१ साली ६.५ लाख लोक या मार्गाने प्रवास करतील असा अंदाज बांधला जातोय.

स्टेशन्स :

स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमीन नगर, जेव्हीएलआर, श्याम नगर, महाकाली लेणी, सिप्झ व्हिलेज, साकी विहार रोड, राम बाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (पश्चिम), विक्रोळी-ईईएच.

मेट्रो – ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व पर्यंतची मेट्रो-७ लाईन १६.५ किलोमीटर लांब असणार आहे. या मार्गात १६ स्टेशन्स असतील. मेट्रो-७ मुळे रेल्वेने जोडले नसलेले भाग जोडले जातील. त्यामुळे प्रवास सोप्पा होणार आहे. खासकरून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. या संपूर्ण प्रकल्पासाठी ६,२०८ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

स्टेशन्स :

अंधेरी (पूर्व), शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद, आरे, पठाणवाडी, पुष्पा पार्क, बांडोंगरी, महिंद्र अँड महिंद्रा, मागठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरीपाडा आणि दहिसर (पूर्व).

मेट्रो – ८ – वडाळा ते जनरल पोस्ट ऑफिस मुंबई

मेट्रो-४ ला वडाळा ते जनरल पोस्ट ऑफिस (GPO) मुंबईपर्यंत वाढवण्यासाठी ८ किलोमीटर लांबीच्या मेट्रो-८ प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. या मार्गाने वडाळाच्या मेट्रो-४ मार्गाला GPO येथील मेट्रो-३ च्या मार्गशी जोडण्यात येईल. या प्रकल्पासाठी २,४०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

मेट्रो–९ - दहिसर(पूर्व) ते मीरा-भाईंदर आणि अंधेरी (पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSIA)

मेट्रो-९ मार्गिकेत १० स्टेशन्स असतील. मीरा-भाईंदर ते मुंबईच्या आतल्या भागात येण्यासाठी सध्या ३० किलोमीटरचं अंतर ओलांडावं लागतं. हे अंतर मेट्रो-९ मुळे कमी होईल. २०२२ ते २३ वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.

स्टेशन्स :

दहिसर (पूर्व), पांडुरंग वाडी, मीरा गाव, काशी गाव, साईबाबा नगर, मेदिटीया नगर, एस.भगतसिंग गार्डन, सुभाष चंद्र बोस स्टेडियम.

मेट्रो-१० गायमुख ते शिवाजी चौक

मेट्रो-७ चा विस्तार करण्यासाठी MMRDA तर्फे मेट्रो-१० चा प्रकल्प मांडण्यात आलाय. मेट्रो-१० ने दहिसरचा भाग मीरा रोड मार्गे भाईंदरशी जोडलं जाणार आहे. हा मार्ग ११.२ किलोमीटरचा असेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३,९०८ कोटी इतका असेल.

स्टेशन्स :

गायमुख, गायमुख रेती बंदर, वर्सोवा चार फाटा, काशी मीरा, शिवाजी चौक.

मेट्रो-११ वडाळा ते जनरल पोस्ट ऑफिस (GPO) मुंबई

मेट्रो-४ जिथे संपते तिथून मेट्रो-११ सुरु होणार आहे. वडाळ्याला छत्रपती शिवाजी टर्मिनसशी जोडणारी ही मेट्रो लाईन असणार आहे. या मार्गातील २ स्टेशन्स जमिनीवरून असतील तर ८ भुयारी मार्गाने असतील.

स्टेशन्स :

वडाळा आरटीओ, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल (एलिव्हेटेड), सेवरी मेट्रो, हे बंदार, कोळसा बंडार, दारुखाना, वाडी बंडार, क्लॉक टॉवर, कॉरनॅक बंदर, सीएसएमटी मेट्रो.

मेट्रो-१२ कल्याण-डोंबिवली-तळोजा

मेट्रो-१२ हा मेट्रो-५ चा विस्तार असणार आहे. हा संपूर्ण मार्ग २०.७५ किलोमीटरचा असेल. या मार्गात १७ स्टेशन्स असतील. ठरवलेल्या प्रकल्पानुसार मेट्रो-१२ साठी ४,१३२ कोटी रुपये खर्च येईल.

स्टेशन्स :

एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सा गाव, सोनार पाडा, मानपाडा, हदुतणे, कोळे गाव, निल्जे गाव, वडवली, बाले, वाकलाण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा.

मंडळी, १३ आणि १४ क्रमांकाच्या मेट्रो लाईन्सपैकी मेट्रो-१४ ला हिरवा कंदील मिळालाय. मेट्रो-१३ लाईन अजून मंजूर व्हायची आहे. मेट्रो-१३ ही मीरा-भाईंदरला विरारशी जोडणारी असेल, तर मेट्रो-१४ लाईन कांजुरमार्गला बदलापूरशी जोडणारी असेल. मेट्रोचं सगळं काम पूर्ण व्हायला २०२३ उजाडावा लागणार आहे.

नवी मुंबई मेट्रो :

नवी मुंबई मेट्रोचा प्रकल्प तसा फार जुना आहे. १ मे २०११ साली नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं, पण काम रखडल्याने मेट्रो यायला २०२० वर्ष उजाडावं लागणार आहे. नवी मुंबईत मेट्रो प्रकल्पात ५ वेगवेगळ्या मेट्रो लाईन्स असतील. या पैकी ४ मेट्रो लाईनची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

लाईन-१

पहिली मेट्रो लाईन एप्रिल २०२० ला सुरु होईल. ही मार्गिका ३ टप्प्यात पूर्ण करण्याची सिडकोची (CIDCO ) योजना आहे. पहिला टप्पा हा बेलापूर ते पेंधरपर्यंतचा असेल, दुसरा टप्पा तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वरपर्यंत असेल, तिसरा टप्पा आधीच्या दोन्ही मार्गांना जोडणारा असणार असेल. या २३.४० किलोमीटर मार्गिकेत २० स्थानाकं असतील. त्यासाठी ४,१६३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

लाईन-२

मानखुर्द- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ-पनवेल या ३ भागांना जोडणारी दुसऱ्या क्रमांकाची मेट्रो लाईन असेल. हे काम ‘एमएमआरडीए’ पूर्ण करणार आहे. ही मार्गिका ३२ किलोमीटर लांब असणार आहे. सिडकोने या प्रकल्पासाठी २,८२० कोटी रुपये मंजूर केलेत.

लाईन-२ च्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो लाईन सायन पनवेल महामार्गावरून जाऊन शिवडीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे. हा मार्ग २२ किलोमीटरचा असेल.

लाईन-३

‘नवी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन’ मेट्रो लाईन-३ चं काम करणार आहे. दिघे-तुर्भे-बेलापूर या तीन भागांना जोडणारा हा २० किलोमीटरचा मार्ग असणार आहे. या प्रकल्पासाठी १,८५० कोटी रुपये खर्च येईल.

लाईन-४

मेट्रो लाईन-३ घणसोली-वाशी-महापे या महत्वाच्या भागांना जोडणारी असेल. हे काम देखील नवी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन तर्फे करण्यात येणार आहे. ९ किलोमीटरच्या या मार्गासाठी १,२७० कोटी रुपये खर्च येईल. 

नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या लाईनचं काम संपत आलेलं आहे. इतर लाईन्सचं काम पूर्ण झालेलं नाही. त्या विषयी नवीन माहिती आम्ही भविष्यात तुमच्यापर्यंत पोचवू.

मंडळी, मेट्रोचा संपूर्ण प्रकल्प बघितला तर लक्षात येईल मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या संपूर्ण भागात मेट्रोचं जाळं पसरणार आहे. मेट्रोमुळे मुंबईत प्रवास करणं सोप्पं होणार आहे. तरी एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे  मेट्रोमुळे लोकल ट्रेनचा भार कमी होईल का ? तुम्हाला काय वाटतं ? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required