मृगाच्या लाल किड्यांबद्दल तुम्हांला काय माहिती आहे? आता ते दुर्मिळ का होत आहेत?

माऊलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार
ही ग.दि. माडगूळकरांची कविता बर्याच जणांनी शाळेत असताना वाचली असेलच, किंवा सत्तावीसातून नऊ गेले उरले शून्य ही अकबर बिरबलाची कथा पण आठवतच असेल. तर त्या नऊ नक्षत्रापैकी पहीले नक्षत्र म्हणजे मृग नक्षत्र!
साधारण सात जूनच्या दरम्यान संध्याकाळी अचानक गडगडाट होतो आणि मृगाच्या पावसाचे आगमन होते. या पावसासोबत शाळेच्या दिवसातल्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. त्यांपैकी एक म्हणजे आपण माचीसच्या डबीत भरून ठेवायचो ते मृगाचे लाल मखमली किडे!! लाल रंगाचे, तुरुतुरु चालणारे ते मृगाचे किडे म्हणजे शाळकरी उत्सुकतेला आमंत्रण असायचं. दोन दिवसांनी त्या डबीत ते किडे मरून गेले की ती उत्सुकता संपायची, पण मनाच्या डबीत अजूनही ते रेशमी लाल किडे भिरभिरतच असतात.
आपल्या संस्कृतीत निसर्गाच्या प्रत्येक विशेषाला पूजेचा मान असतो. बघा, नाग पंचमी, बैल पोळा, वटसावित्री, हे सगळेच दिवस मान्सूनच्या मौसमातच येतात. हे रेशमी लाल किडे पण तेव्हाच दिसतात. हे किडे भारतातल्या जैव विविधतेचा भाग आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये आजही काही ठिकाणी मृगाच्या किड्याची पूजा केली जाते. वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर लाल रंगाचा मखमली किडा आता दुर्मिळ होतो आहे. म्हणूनच आज या लेखाच्या माध्यमातून आपण मृगाच्या मखमली किड्याबद्दल माहिती जाणून घेऊयात....

ग्रामीण भागात मृगनक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात! या नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा किडा बघायला मिळत असल्यामुळे याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असंदेखील म्हटलं जातं. हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे. त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद-कुंकू वाहतात त्याची पूजा करतात. हा किडा जसा ग्रामीण भागासाठी आकर्षणाचा विषय आहे, तसंच शहरी भागात देखील या किड्याने प्रचंड आकर्षण निर्माण केलेला आहे.
या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. ह्या किड्याला संस्कृत मध्ये बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी गोसावी कीडा असेदेखील म्हटले जात.
वैज्ञानिक दृष्ट्या देखील या किड्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकतर अशा प्रजातीचे किडे हे दुर्मिळ असतात. तसं पाहायला गेलं तर या किड्यांमध्ये देखील हजारो वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि या प्रजाती संपूर्ण जगभर सापडतात. विशेषतः कॅनडा ते आफ्रिका इथल्या भूभागांमध्ये हे किडे मोठ्या प्रमाणात दिसतात. विविध भूभागांनुसार यांच्या आकारातदेखील फरक पडत असतो. या प्रकारचा सापडलेला सर्वात लहान किडा दोन सेंटीमीटर लांबीचा आहे.
या किड्यांचं आयुष्यमान तसं खूप कमी कालावधीचंच असतं. साधारणपणे दोन ते तीन महिन्यानंतर हे किडे दिसत नाहीत. या किड्यांची मादी ओल्या मातीत अंडी देते आणि साधारणपणे दोन महिन्यांनंतर या अंड्यांमधून लहानलहान किडे बाहेर पडतात. त्यातील लहान वयाचे किडे हे वृद्धांपेक्षा वेगळे असतात. यांचे अन्न भक्षण करण्याची पद्धतदेखील इतरांपेक्षा प्रचंड वेगळी आहे. हे किडे एखादा लहानसा जीव जंतू शोधतात आणि त्यानंतर त्याला मधोमध दंश करुन त्याच्या शरीरातले रक्त पिण्यास सुरुवात करतात. ही सर्व प्रक्रिया चालू असताना तो बळी किडा थोडीफार हालचाल करतो परंतु मृगाच्या बाळकिड्याच्या मजबूत पकडेमुळे बळीकिडा स्वतःचा जीव वाचू शकत नाहीत.

ह्या किड्यांना साधारणपणे आठ पाय असतात. परंतु जोपर्यंत हे किडे तरुण होत नाहीत तोपर्यंत यांना सहा पायच असतात. पुढे तरुण झाल्यानंतर त्यांच्या शरीरात होणारे बदलांसोबत हे जास्तीचे दोन पाय देखील दिसू लागतात. आधीच सांगितल्याप्रमाणे या किड्यांचं आयुष्यमान फारच कमी असते. त्यामुळे पावसाळ्यानंतर हे किडे आपल्याला बघायला देखील मिळत नाहीत.
कदाचित पुढच्या पिढ्यांना हे रेशमी लाल किडे बघायला पण मिळणार नाहीत. याला कारण आपणच मानवच आहोत. पॅरॅलीसीस आणि लैंगिक समस्येवर औषध म्हणून हे किडे वापरले जातात. तसेही अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे १९९० ते २०२० या दरम्यान किड्यांच्या २५टक्के प्रजाती पृथ्वीवरून दिसेनाशा झाल्या आहेत.
Fittest for the survival हा निसर्गनियम आहे आणि मनुष्यप्राणी लोभी आहे. त्यामुळं आणखी एक प्रजात हळूहळू दुर्मिळ होतेय हे मात्र खरं.
(फोटो आणि व्हिडीओ सौजन्य : अंजना देवस्थळे)
लेखक : रोहित लांडगे