computer

किलोमागे १० लाख ते काही शे डॉलर्स भाव असलेल्या चहाच्या वेगवेगळ्या प्रजाती!! भारतातही जगातला एक सर्वात महाग चहा पिकतो बरं!

चहा!
भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना पूर्वी गूळाचा खडा आणि पाणी द्यायची पद्धत होती. काळानुसार यात बदल होऊन गुळाच्या खड्याची जागा चहाने घेतली आहे. आल्यागेल्याला चहा दिलाच पाहिजे ही पध्दत रूढ झाली. पूर्वी धारोष्ण दूध पिऊन तब्येत ठणठणीत ठेवणारांसाठी नुकताच आदरातिथ्यात घुसलेला चहा म्हणजे नवीन पिढीचे चोचले होते. चैन होती. तोच चहा आता ‘गरज’ झाला आहे. दिवसाची सुरुवात चहाने झाली नाही तर दिवस आळसावल्यासारखा जातो असे मानणारे चहाप्रेमी वाढत आहेत. चहा हे उत्तेजक पेय आहे आणि त्याने शरीराची हानी होते हे सप्रमाण सिद्ध करू पाहणारांकडे हे चहानिष्ठ सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. खरं तर चहा प्रतिष्ठेचा निकष ठरत आहे. फिटनेस फ्रीक मंडळींसाठी ग्रीन टी, लेमन टी बाजारात आले आहेत. दूध, चहापत्ती, साखर टाकून उकळलेला चहा शरीरावर कसा दुष्परिणाम घडवून आणतो याचा जोरदार प्रचार होऊनही चहाच्या गंधाने बेभान होणारे, कोसळणाऱ्या पावसात गरमागरम चहाचा घोट घेताच ‘आहा ssss’ असा उद्गार काढणारे, चहाला ‘अमृत’ मानणारे रसिक जोवर आहेत तोवर चहा भारत काय, जगातून नष्ट होणार नाही हे खरंच! चला बघू या, अवघ्या जनमाणसाचे जनजीवन व्यापून टाकणाऱ्या चहाचा इतिहास!

ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये चीनचा सम्राट शेन नंग याने कैमेलिया सिनेंसिस या वनस्पतीची पाने उकळत्या पाण्यात टाकून पहिलावहिला चहा बनवला होता असे म्हणतात. त्यानंतर त्याचा प्रसार होऊन तो चीन, भारत, श्रीलंका, जपान, कोरिया, तैवान, तुर्की या देशांच्या संस्कृतीचा देखील अविभाज्य भाग झाला. आपल्या जगण्याचाच भाग झालेल्या या चहासाठी तुमच्या उत्पन्नाचा किती भाग खर्च करायची तुमची तयारी असते?
एक कटिंग चायसाठी पाच किंवा दहा रूपये मोजाणाऱ्याला ताजसारख्या हॉटेलमध्ये एक कप चहासाठी पाचशे रूपये मोजावे लागतात हे समजले की भोवळ येते. चवीशी तडजोड नको म्हणून कितीही चोखंदळपणा दाखवत वाणसामान भरताना तुम्ही कितीही महागड्या किमतीची चहा पत्ती घेतली तरी जास्तीत जास्त महाग चहा किती किंमतीचा असू शकेल याचा तुम्हाला अंदाजही नसेल. चला बघू या, तुमचे डोळे पांढरे होतील अशा चहाच्या काही किंमती.

१. डा-हॉंंग पाओ टी –
चीनच्या फुजियाना प्रांतात वुयि पर्वतात वाढणारा हा चहा जगात सर्वाधिक महागडा आहे. याच्या दुर्मिळ असण्याच्या गुणधर्मामुळे या चहाला राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या चीनच्या दौऱ्यादरम्यान चीन प्रजासत्ताकाचे संस्थापक माओ झेड़ोंग यांनी निक्सन यांना २०० ग्राम डा-हॉंंग पाओ टी भेट स्वरूपात दिला. दोन राष्ट्रातील शांतता नि मैत्रीचे प्रतीक म्हणून या भेटीकडे पाहिले जाते. हा चहा १.२ मिलियन $ प्रति किलो किमतीचा आहे.
डा-हॉंंग पाओ चा अर्थ ‘मोठा लाल पायघोळ झगा’ असा होतो. असं म्हटलं जातं की मिंग घराण्यातील चीनच्या सम्राटाने आपल्या लाल झग्याच्या बदल्यात एक बरणी भरून चहा आपल्या आईसाठी घेतला होता. या चहाच्या औषधी गुणधर्मामुळे आईच्या आजारावर इलाज म्हणून त्याने हा चहा घेतला होता. हा चहा अत्यंत दुर्मिळ आहे. २००५ मध्ये २० ग्राम चहा ३०००० डॉलर्सना विकला गेला होता. हा विक्रीचा अत्युच्च रेकॉर्ड आहे.

२. पांडा डंग टी –
नैऋत्य चीनमधील आन यांशी नावाच्या उद्योजकाने चहाच्या वनस्पतीची लागवड करताना नैसर्गिक खत म्हणून पांडा बेअर (अस्वल)ची विष्ठा वापरली आणि पहिले उत्पादन ३,५०० डॉलर्सला ५० ग्राम चहा या भावाने विकले. एंटीऑक्सायडंट घटकांमुळे हा चहा कमालीचा आरोग्यवर्धक झाला आहे. किलोमागे ७०,००० डॉलर्स या दराने हा चहा विकला जातो.

३. यलो गोल्ड टी बड्स –
याची लागवड वर्षातून एकदाच केली जाते. यात सोन्याच्या काड्या वापरून उन्हात वाळवतात. चहापत्तीवर २४ कॅरट सोन्याचे कण विखुरले जातात. हा चहा सम्राटांचा चहा म्हणून ओळखला जातो. एका किलोमागे ७,८०० डॉलर्स या भावाने यलो गोल्ड टी बड्स विकला जातो. याच्या नावानुसार सोने धातू आणि कळ्या यांच्या अफलातून मिश्रणाने या चहाला अफलातून आगळीवेगळी चव प्राप्त झाली आहे. याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत, त्यातील एक म्हणजे हा चहा तुमचे तारुण्य अबाधित राखतो. सध्या हा चहा फक्त सिंगापूरमधील TWG कंपनीमध्येच उपलब्ध आहे.

४. सिल्व्हर टिप्स इम्पीरियल टी –
दार्जिलिंगच्या डोंगर उतारावर मकाईबारी टी इस्टेट येथे या चहाची शेती केली जाते. चांदीच्या तारांसारख्या दिसणाऱ्या कळ्या आणि पक्व फळासारखा मधुर गंध असणाऱ्या या चहाची पाने तज्ञ व्यक्तीकडूनच खुडून घेतात, तेही पौर्णिमेच्या रात्री! २०१४ मध्ये झालेल्या एका लिलावात हा चहा किलोमागे १८५० डॉलर्स या दराने विकला गेला होता. हा भारतातील सर्वात महाग असा चहा आहे.

५. ग्योकुरो – 

जपानमधील सर्वात उच्च प्रतीचा चहा म्हणून हा चहा ओळखला जातो. ‘मोत्यांचे दवबिंदू’ असा ग्योकुरोचा अर्थ आहे. उजी जिल्ह्यात या चहाची शेती करतात. गवती काडयांच्या सावलीत याची लागवड करतात. या प्रक्रियेमुळे एल-थिएनिन एमिनो ॲसिड टिकवून ठेवले जाते आणि चहाचा स्वाद वाढतो. या चहाचा शोध १८३५ मध्ये कहेई यामामाटो सहावाने लावला. एक किलो ग्योकुरो चहाची किमत अंदाजे ६५० डॉलर्स इतकी आहे.

६. Pu`erh tea-
१८ व्या शतकात चीनमध्ये या चहाचा शोध लागला. १००००डॉलर्स प्रति किलो या अत्यंत महाग दराने विकला जाणारा हा अतिशय प्राचीन आणि शुद्ध स्वरूपातील चहा आहे. हा वड्यांच्या स्वरूपात विकला जातो. याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. वजनावर नियंत्रण राहते. कोलेस्ट्रॉल कमी होते आणि पचनशक्ती सुधारते.
नैऋत्य चीनच्या युनान प्रांतात याची शेती केली जाते. यांची काही झाडे तर हजारो वर्षे जुनी आहेत. सूक्ष्मजीवांचा वापर करुन किण्वन प्रक्रिया घडवली जाते. या चहा साठी चीनच्या इतिहासात अनेक युद्धे लढली गेली असं म्हटलं जातं.

७. टीएग्वानियन टी –
चीनमधील सर्वात लोकप्रिय चहापैकी हा एक चहा! बुद्धिस्ट दैवत ग्वान यिन यांच्या सन्मानार्थ या चहाला त्यांचे नाव दिले आहे. याचा अर्थ दयेची देवता असाही होतो. फुजियान प्रांतात उंचीवर या चहाची लागवड होते. सोनेरी रंग येऊन कुरकुरीतपणा येइपर्यंत पाने उन्हात वाळवतात. चहाची आवड नसलेल्यादेखील चहाचे व्यसन लागेल अशी या चहाची अद्भुत चव आहे.
हा चहा अत्यंत दुर्मिळ असल्याने याच्या किमतीत वाढ होतच आहे. सध्या ३००० डॉलर्स प्रति किलो या दराने तो उपलब्ध आहे.

८. व्हिंटेज नार्सिसस वुयि उलोंग टी-
ग्रीक दंतकथेतील नार्सिसस या नावावरून या चहाचे नाव ठेवण्यात आले आहे. फुजियान प्रांतातील वुयि आणि तैवानमधील पिंग्लिन टी एरिया येथे या चहाची शेती केली जाते. फळ आणि फुलांचा संमिश्र गंध आणि उत्कृष्ट चॉकलेटी चव हे या चहाचे वैशिष्ट्य! वाइन जुनी होताना तिची चव जशी अत्यंत दुर्मिळ होते तसे या चहाचे आहे. हा जसजसा जुना होत जातो तशीतशी याची चव वाढत जाते. चवीत अधिकाधिक सुधारणा व्हावी म्हणून दर दोन वर्षांनंतर हा चहा भाजतात नि यातला ओलसरपणा नष्ट करतात.

९. गाओ शान टी –
तैवानमध्ये १००० मीटर्सपेक्षा अधिक उंचीवर असणार्या चहाच्या बागांमध्ये या चहाची शेती केली जाते. म्हणून यांना हाय माउन्टन टी म्हणून ओळखले जाते. उंचीवरील विरळ हवा, अत्याधिक आर्द्रता, किण्वन प्रक्रिया या सार्यामुळे या चहाला आगळावेगळा स्वाद आणि सुगंध प्राप्त झाला आहे. २५०डॉलर्स प्रति किलो या दराने विकला जातो.


१०. तिएंची फ्लॉवर टी –
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक सर्वात महाग चहापैकी हा एक चहा! आरोग्यवर्धक गुण आणि वेगळी चव यामुळे हा चहा लोकप्रिय आहे. तीन वर्षांतून एकदाच वाढणाऱ्या, फुलणाऱ्या पॅनॅक्स नोटोगिनसंग या यूनान प्रांतातील फुलांचा गंध आणि स्वाद या चहात मिसळला आहे. निद्रानाशावर हा चहा प्रभावी आहे. या चहाच्या सेवनाने शरीरातील ऑक्सीजनची पातळी वाढते, शरीरातील विषारी घटकद्रव्ये कमी होतात. दाह थांबतो. १७० डॉलर्स प्रति किलो या दराने हा चहा विकला जातो.

बघितलं मंडळी?
जो चहा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, जो तुमच्या दैनंदिन दिनक्रमातून वगळता येणं अशक्य आहे, त्या चहाच्या या किंमती बघितल्या ना? मग? या चहाचा आस्वाद घेउन बघायचा?
छे! या चहासाठी बँकेत किती शिल्लक आहे हे तपासून पाहावं लागणार असेल तर मला माहीत आहे तुमची प्रतिक्रिया काय असेल ते! तुम्ही म्हणाल,
गड्या आपला टपरीवरचा कटिंग बरा......! हो ना???

सबस्क्राईब करा

* indicates required