स्टेट बँक ऑफ इंडियानं दिलं ग्राहकाला चूरण... एटीएममधून निघाली नकली नोट!!

६ फेब्रुवारी या दिवशी दिल्लीतल्या संगम विहारमध्ये एक अजब प्रकार घडला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मधून २००० रुपयांची ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ ची नोट निघाली आहे. या नोटेवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ऐवजी ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ आणि ‘भारतीय मनोरंजन बँक’ लिहिलंय. लहान मुले खातात त्या चूरणवर या नोटा फुकट दिल्या जातात.

रोहित नावाच्या एका ग्राहकानं  या SBIच्या ATM मधून पैसे काढले, तेव्हा लहान मुलं खेळताना वापरतात तशी नोट बाहेर निघाली. नीट बघितले असता त्यावर ‘चूरण लेबल’ लिहिलेलं दिसलं. पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी त्या एटीएममधल्या सगळ्या नोटा ताब्यात घेतल्या आणि सध्या पुढील तपास सुरु आहे.

८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या आणि ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात चलनात आल्या. नव्या नोटांचा कागद पातळ असल्यानं या नोटा बाजारात आल्यापासूनच अनेकांना त्या खोट्या नोटांसारख्या वाटत होत्या. खऱ्या नोटा आणि चूरणवर मिळणाऱ्या नोटा यात फरक नसल्यानं एकवेळ माणसाकडून चूक होऊ शकतं. पण आता खुद्द एटीएमनेच खोट्या नोटा द्यायला सुरुवात केल्यावर हद्दच झालीय. खर तर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ लिहिलेल्या नोटेची ही केस नवीन नाही. पण प्रत्यक्षात एटीएममधून चूरणवाली नोट निघण्याचा प्रकार नवीन आहे.

अशाच प्रकारे ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या नोटा बाजारात येत राहिल्या तर माणसे एटीएम सोडून चूरण घ्यायला रांगा लावतील असेच म्हणावे लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required