computer

मसालेदार, खळबळजनक बातम्यांचा जनक 'विल्यम रॅन्डॉल्फ हर्स्ट'...त्याने पत्रकारितेला नवीन वळण कसे दिले?

ब्रेकिंग न्यूज किंवा खळबळजनक बातम्या या आजकाल रोज आणि २४ तास चालू असतात. दिवसभर वेगवेगळ्या वाहिन्यांवर बातम्या पहिल्या तर कोणाला शांत झोप येईल का? शक्यच नाही. कधीकधी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली खरी माहिती मोडून तोडून दाखवतात किंवा छोट्या बातमीला मोठे करून सांगितले जाते. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा शेवटी गोंधळ उडतो आणि शेवटी आपण टीव्ही बंद करून टाकतो. पण या अश्या फेक बातम्यांचा मूळ स्त्रोत कुठला? अश्या खोट्या किंवा चुकीच्या बातम्या देण्याचे पहिले काम कोणी केले? याबद्दल थोडी शोधाशोध केली असते आम्हाला काही रोचक माहिती मिली, ती आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत.

१८६३ मध्ये जन्मलेला विल्यम रॅन्डॉल्फ हर्स्ट हा फेक न्यूजचा जन्मदाता मानला जातो. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे त्याचा जन्म झाला. लक्षाधीश खाण अभियंता जॉर्ज हर्स्टचा तो एकुलता एक मुलगा. वडिलांसारखा विल्यमला मात्र खाण उद्योगात फारसा रस नव्हता. हार्वर्डमध्ये शिक्षण घेत असताना त्याने पत्रकार म्हणून काम केले. नंतर तो न्यूयॉर्क शहरात गेला आणि वडिलांच्या मदतीने न्यूयॉर्क जर्नल ताब्यात घेतले.

विल्यम हर्स्ट त्या वर्तमानपत्राचा संपादक आणि मालक होता. त्याला हव्या तश्या बातम्या तो बनवू लागला. कुठल्याही बातमीचा अभ्यास न करता, ती खरी किंवा खोटी हे न तपासता, तो फक्त आकर्षक मथळ्याखाली बातमी छापत असे. वृत्तपत्राची किंमत त्याने अगदी कमी म्हणजे कोणालाही परवडेल अशी केली. त्याचे वर्तमानपत्र हातोहात खपू लागले. या प्रकारच्या पत्रकारितेला पत्रकारितेच्या दुनियेत 'यलो जर्नलिझम' म्हटलं जातं. विल्यम हर्स्ट हा या 'यलो जर्नलिझम'चा जनक होता. 

वर्तमानपत्रे विकण्यासाठी लक्षवेधी मथळे आणि खळबळजनक कथा लागतात एवढंच तो बघायचा. हळूहळू त्याचं साम्राज्य इतकं वाढलं की तो एक महत्वाची व्यक्ती बनला. सगळीकडे त्याचा दबदबा निर्माण झाला. वाचकांना तो सहज हाताळू लागला. वाचकही त्याची बातमी खरी मानू लागले. किरकोळ बातम्या तो मोठ्या प्रिंटच्या हेडलाईनखाली छापत होता. काल्पनिक चित्र वापरत होता. खोट्या मुलाखती, तसेच काही माहिती तज्ञांच्या नावाखाली छापत होता. रविवारी रंगीत पुरवण्यांवर भर देई. सहानभूती निर्माण होईल अशा तर्हेच्या बातम्या चांगल्या लेखकांना पैसे देऊन लिहून घेणे आणि ते छापणे त्याला लिलया जमत असे.

त्याचा एक किस्सा म्हणजे, एकदा अमेरिकेने स्पेनविरूद्ध युद्धाची घोषणा केली. १८९७  मध्ये विल्यमने युद्धाचा तणाव कळण्यासाठी कलाकार फ्रेडरिक रेमिंगटन याला युद्धाच्या ठिकाणी पाठवले. थोड्या वेळाने फ्रेडरिकने हर्स्टला एक चिठ्ठी पाठविली: “इथे सर्व काही शांत आहे. कोणतीही अडचण नाही. युद्ध होणार नाही. मी परत येतो." हर्स्टने त्याला उत्तर दिले: “कृपया येऊ नकोस, तू चित्रे काढ, त्यातून युद्धाची बातमी कशी लिहायची ते मी पाहतो." लवकर त्याने ती खोटी बातमी लिहून चित्रासकट छापली देखील.

हॉलिवूड अभिनेत्री मेरीन डेव्हिस हिला विल्यमनेच सुपरस्टारही बनवले. तिला वर्तमानपत्रांतुन सतत प्रमोट करणे, तिच्या चित्रपटंविषयी चांगले लिहिणे, हे सगळे तो करत होता. तिच्याबरोबर त्याचे अफेअर पण बरेच वर्षे चालले. तिच्यासाठी लाखो रुपये त्याने खर्च केले.

हॉलीवूडच्या इतिहासातील अत्यंत गाजलेल्या सिटीझन केन या चित्रपटाची कहाणी विल्यम रॅन्डॉल्फ हर्स्टच्या जीवनावर आधारित आहे असे गृहीत धरले जाते. १९४१ मध्ये दिग्दर्शक ऑरसन वेल्स यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. असे असूनही आपले नाव कोठेही प्रकाशित न केल्याचा राग हर्स्टला आला होता, म्हणून आपला प्रभाव आणि पैसे वापरून हा चित्रपट थांबवण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तो असफल झाला. पुढे हा चित्रपट खूप चालला. याला नऊ ऑस्कर पुरस्कार मिळाले. पण हर्स्टला हे अजिबात आवडले नाही. यावर बोलताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी असे स्पष्टीकरण दिले की, “आमचा हिरो गरिबीतून वर आलाय. रँडल हर्स्ट श्रीमंत घरातला लाडावलेला मुलगा आहे." रँडल हर्स्ट आणि समीक्षक यांचे अर्थतच या उत्तराने समाधान झाले नाही, कारण चित्रपटातले अनेक प्रसंग रँडलच्या जीवनावरच बेतले होते.

वृत्तपत्राची सर्व तत्व नियम मोडून धाब्यावर बसवणारा विल्यम रॅन्डॉल्फ हर्स्टचा मृत्यू ८८ व्या वर्षी झाला. पडद्यामागील राजकीय शक्ती म्हणून त्याला ओळखले जायचे. एकुलता एक लाडावलेला, अत्यंत श्रीमंत असलेल्या हर्स्टने त्या काळात पत्रकारितेची पूर्ण व्याख्या बदलली. आजही काही बातम्या पाहिल्यास याची आठवण होते हा फक्त योगायोग समजावा का?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required