मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला. स्पर्धा हरूनही पद्मश्री इंद्राणी रहमाननी जगभर नाव कमावलं!!
जागतिक स्तरावरील कुठलीही स्पर्धा असली की त्यात आपला देशाचा स्पर्धक जिंकायला हवा असे प्रत्येक देशवासियाला वाटत असते. मिस युनिव्हर्स स्पर्धेत देखील आजवर जे भारतीय जिंकले त्यांना मोठा सन्मान देशात मिळाला आहे. यावर्षीही हरनाज सिंधू या तरुणीने मिस युनिव्हर्स जिंकल्यावर देशभर तिचे कौतुक झाले होते. पण एकेकाळी एका भारतीय तरुणीने ही स्पर्धा हरून देखील देशात नाव केले होते.
१९५२ साली पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा जिंकली होती आर्मी कुसेला यांनी. त्यावेळी भारताकडून स्पर्धेत इंद्राणी रहमान यांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा जरी त्यांनी जिंकली नसली तरी त्यांचा आत्मविश्वास आणि धीट अंदाज यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. स्वीमसूटवर गजरा आणि कपाळावर बिंदी लावून त्यांनी या भन्नाट कॉम्बिनेशनने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
इंद्राणी लहानाच्या मोठया झाल्या चेन्नईमध्ये. वडील रमालाल वाजपेयी भारतीय, तर आई लुएल्ला शेरमान एक अमेरिकी महिला होती. तो काळ तसा आजच्या इतका मॉडर्न नव्हता. इंद्राणींनी १५ वर्षं वय असताना ३० वर्ष वय असलेल्या आर्किटेक्ट हबीब रहमान यांच्यासोबत लग्न केले होते. मिस युनिव्हर्स स्पर्धेत इंद्राणी उतरल्या त्यावेळी त्यांचे वय होते २२ वर्षं! विशेष म्हणजे तेव्हा त्या एका मुलाच्या आई होत्या. त्याआधी त्यांनी मिस इंडिया स्पर्धादेखील जिंकली होती. त्यांचे कर्तृत्व फक्त मिस इंडिया किंवा मिस युनिव्हर्स जिंकणे इतकेच नाही. त्यांच्यात विविध गोष्टींवर प्रतिभा मिळवण्याची क्षमता होती.
चार प्रकारच्या शास्त्रीय नृत्यामध्ये त्या पारंगत होत्या. भरतनाट्यम, ओडिसी, कथकली, कुचीपूडी यांमध्ये त्या निपुण होत्या. सुरुवातीला त्यांनी Chokkalingam Pillai यांच्याकडून भरतनाट्यम शिकून मग कोरडा नर्सिम्हा राव यांच्याकडून कुचीपुडी शिकून जगभर आपल्या प्रतिभेने लोकांना प्रभावित केले. आता इथेही न थांबता सलग तीन वर्ष ओडिसी नृत्य शिकून त्यांनी आपल्या लोकप्रियतेत अजूनच भर घातली.
आता १९५२ साली जरी त्यांना मिस युनिव्हर्स मिळाले नसले तरी एक प्रतिभावान सेलेब्रिटी म्हणून जगभर त्यांचे नाव झाले. १९६१ साली एशिया सोसायटी टूरमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. एकदा तर जगातील सर्व प्रमुख नेते म्हणजे जवाहरलाल नेहरू, तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी, राणी एलिझाबेथ, फिडेल कॅस्ट्रो, चीनचे माओ झेडोंग या सर्वांसमोर त्यांनी कला सादर केली होती.
इंद्राणी यांच्या या सर्व प्रवासाचा सन्मान म्हणून त्यांना १९६९ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. याचबरोबर इतरही अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यांनी पुढे जाऊन हॉवर्ड सहित इतर अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये भारतीय डान्स प्रकार शिकवले आहेत. १९९९ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण तोपर्यंत त्यांनी भारतीय महिलांना आत्मविश्वासाने आपले छंद जोपासण्याची प्रेरणा मिळेल असे काम करून ठेवले होते.
उदय पाटील




