फॉर्ब्स ३०: भारतीय आर्थिक क्षेत्रात मोलाची भर घालणारे फोर्ब्सच्या यादीतील दोन तरुण चेहरे !!

भारतातल्या तरुणाई विषयी अनेकदा नकारात्मक लिहिले जाते. ती कशी बेजाबदार आहे,आळशी आहे असं काहीसे चित्र बऱ्याचदा उभे केले जाते.. पण हे खरे आहे का? नक्कीच नाही! आजची तरुणाई अगदी कमी वयात नोकरीमध्ये कितीतरी वरची पदे यशस्वीपणे सांभाळात आहे. अगदी स्वतःचा व्यवसाय किंवा आपले समजाविषयी चे कर्तव्यही अगदी आत्मविश्वासाने बजावत आहे. वेगवेगळ्या आणि नवीन क्षेत्रात हे तरुण आपल्या भारताचे नाव जगभरात पोहोचवत आहेत. अशा भारतीय तरुण आणि तरुणींची दखल खुद्द फोर्ब्सने घेतली आहे.
फोर्ब्स इंडियाने ३० अंडर ३० ची यादी जाहीर केली आहे. या यादीत कर्तबगार भारतीय तरुणांचा गौरव केला आहे. गेले वर्षभर वय वर्षे ३०च्या आतील ज्या तरुणांनी स्वतःच्या कौशल्याने आपापल्या क्षेत्रात मेहनत घेऊन यश मिळवले त्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. या यादीतील काही मोजक्या तरुणांवर बोभाटा लेखमालिका घेऊन येत आहे.
आजचा हा दुसरा भाग
आजच्या भागात पाहुयात अश्या दोन तरुणांची यशोगाथा ज्यांनी आर्थिक क्षेत्रात खूप वेगळी शक्कल लढवली आणि कंपनीला अल्पावधीतच नफा मिळवून दिला. बंगलोरचा आकाश सिन्हा(29) आणि दिल्लीचा शंतनू अगरवाल (24) हे ते दोन तरुण. २०२० हे वर्ष इतर कंपन्यासाठी जरी आर्थिकदृष्ट्या अवघड असले तरी या दोघांसाठी ते फलदायी ठरले आहे.
आता या दोघांची ओळख करून घेऊया.
आकाश सिन्हा हे IIT मधून BTech (कॉम्प्युटर इंजिनिअर) आहेत. २०१२ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बंगलोरच्या बँकबझार डॉट कॉम या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांना २०१३ मध्ये अमेझॉनमध्ये नोकरी मिळाली. या दोन्ही नोकरीत त्यांना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कॅशफ्लो. डिजिटल पेमेंट सिस्टीमची नुकतीच सुरुवात झाली होती. बऱ्याच गोष्टी रोख पैसे देऊन होत असत. डिजिटल पेमेंट करायला लोक सहज तयार व्हायचे नाही. व्यवसायिकही व्यवहार करताना रोख पैसेच स्वीकारत. आकाश यांनी ग्राहकांना आणि व्यवसायिकांना डिजिटल पेमेंट करताना कोणत्या अडचणी येतात यावर अभ्यास केला. नव्या व्यावसायिकांना पैशाची गरज असताना काही मार्ग काढता येईल का याचा विचार केला. अमेझॉनमध्ये नोकरीला दोन एक वर्षेच झाली होती. मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी २०१५ मध्ये कॅशफ्री नावाची कंपनी स्थापन केली. त्या कंपनीची टॅगलाईन हीच तिची ओळख आहे - Solving payment challenges for India.
ग्लोबल पेआउट्सच्या सहाय्याने ही कंपनी आंतरराष्ट्रीय व्यवसायांना त्यांचे विक्रेते किंवा फ्रीलान्सर्सना थेट त्यांच्या स्थानिक भारतीय बँक खात्यात पैसे भरण्यास मदत करते. आकाश सिन्हा म्हणतात की, 'कॅशफ्रीच्या सुरुवातीच्या काळातच आम्ही ओळखले की, मोठ्या रकमेची आणि जास्त प्रमाणात करायची पेमेंट्स (देयके)आणि त्याचे वितरण हे डिजिटल पेमेंट्समध्ये, व्यवसायांसाठी एक अवघड आव्हान होते.'
त्यासाठी त्यांनी आघाडीच्या बँका आणि व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. सुट्टीच्या दिवसांमध्येही पेमेंट करता यावेत यासाठी ऑटोमेटेड कॅशफ्री डॅशबोर्डचा वापर करून ही समस्या सोडवली. गेल्या काही वर्षांमध्ये कॅशफ्री ला इतका चांगला प्रतिसाद मिळाला, की पहिल्या वर्षापासून चांगला नफा होऊ लागला. मार्च २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत कॅशफ्रीचा महसूल तिप्पट झाला. सुरुवातीला फक्त ४० कर्मचारी असलेली कंपनी आज १००च्या वर कर्मचाऱ्यांची झाली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बेंगलोर या चार शहरांमधून कॅशफ्रीचं काम चालतं. आता त्यांना आपल्या शाखा भारतभर पसरवायच्या आहेत.
शंतनू अगरवाल हे आणखी एक नाव आर्थिक क्षेत्रात आघाडीवर आहे. Paisalo हे डिजिटल ऍप हे त्यांच्या कल्पनेतून तयार झाले. लोकांची गरज ओळखून त्यांना कर्ज देणे हे या Paisalo चे काम. जिथे बँकेच्या शाखा जवळ नाहीत किंवा कर्ज घेण्याइतकी रक्कम मोठी नाही, अश्या लोकांच्या आर्थिक गरजा Paisalo ने भागवल्या. आज फक्त भारतात जवळजवळ ८ लाख कोटींची उलाढाल Paisalo करत आहे.
उत्तरप्रदेशच्या खेडोपाडी जिथे काही बँका उपलब्धही नाहीत तिथे यांनी कर्ज दिले आहे. २०,००० ते ३०,००० रुपयांचे कर्ज १२.४ टक्के व्याजाने म्हणजे अगदी कमी टक्के व्याजावर देतात. ४ वर्षांपूर्वी दिवसाला १०० च्यावर कर्ज दिली जायची, ज्याची किंमत महिन्याला जवळजवळ ५ कोटी होती. नंतर हा आकडा वाढत गेला. गेल्या वर्षी पैशाची गरज सर्वाधिक म्हणजे ८१ टक्केने वाढली.
शंतनूने आखून दिलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे कंपनीला खूप फायदा होत आहे. सध्या ते Chief Innovation Officer म्हणून कार्यरत आहेत. Paisalo ला अजून तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी भविष्यात एक टीम बनवून त्या मार्फत काम करण्याची त्यांची योजना आहे.
शंतनू आणि आकाश यांच्यासारखी तरुणाई आर्थिक क्षेत्रात नवीन कल्पना लढवून खूप मोलाचे काम करत आहेत. चौकटीबाहेरचा विचार करून ते यशस्वी ठरत आहेत. पुढच्या पिढीला नक्कीच यांचा आदर्श घेता येईल.
लेखिका: शीतल दरंदळे