फोर्ब्स ३०: कृषी क्षेत्रात नवीन डोक्यालिटी वापरून शेतकऱ्यांना मदत करणारे ६ तरुण व्यावसायिक !!

भारतातल्या तरुण पिढीविषयी अनेकदा नकारात्मक लिहिले जाते. ती कशी बेजाबदार आहे, आळशी आहे असं काहीसे चित्र बऱ्याचदा उभे केले जाते.. पण हे खरे आहे का? नक्कीच नाही! आजची तरुण पिढी अगदी कमी वयात नोकरीमध्ये कितीतरी वरची पदे यशस्वीपणे सांभाळात आहे. अगदी स्वतःचा व्यवसाय किंवा आपले समजाविषयीचे कर्तव्यही अगदी आत्मविश्वासाने बजावत आहे. वेगवेगळ्या आणि नवीन क्षेत्रात हे तरुण आपल्या भारताचे नाव जगभरात पोहोचवत आहेत. अशा भारतीय तरुण आणि तरुणींची दखल खुद्द फोर्ब्सने घेतली आहे.
फोर्ब्स इंडियाने ३० अंडर ३० ची यादी जाहीर केली आहे. या यादीत कर्तबगार भारतीय तरुणांचा गौरव केला आहे. गेले वर्षभर वय वर्षे ३०च्या आतील ज्या तरुणांनी स्वतःच्या कौशल्याने आपापल्या क्षेत्रात मेहनत घेऊन यश मिळवले त्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. या यादीतील काही मोजक्या तरुणांवर बोभाटा लेखमालिका घेऊन येत आहे.
आजच्या भागात कृषी क्षेत्रातील ६ तरुण चेहऱ्यांना भेटूया.

शेतीचा विकास आणि समृद्धी कशी होईल याचा अभ्यास करण्यासाठी कृषीतंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. एकीकडे तरुण कृषी विभागाकडे पाठ करत असल्याचे म्हटले जात असतानाच भारतातल्या काही उच्चशिक्षित तरुणांनी कृषीतंत्रज्ञानात उडी घेतली आहे. त्यांनी काय केलं, तर शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारे अॅप विकसित केले. ते एवढेच करून थांबले नाहीत तर ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचून हा मदतीचा हात देत आहेत. यंदाच्या फोर्ब्सच्या ३०अंडर३० या यादीत शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या या दोन तरुणांची नावे सामील आहेत. कोण आहेत हे लोक? चला तर भेटूया.
(हर्षित गुप्ता)
हर्षित गुप्ता आणि त्याचे बॅचमेट तौसेफ खान, निशांत महात्रे आणि आशिष राजन सिंग या चार मित्रांनी एकत्रच शिक्षण घेतलं होतं. ते आधी आयआयटीमध्ये होते. तिथून पुढे त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून कृषी व्यवसाय व्यवस्थापन करण्यासाठी अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर कृषी क्षेत्रात काही वेगळे काम सुरू करावे यासाठी ते एकत्र आले. यातूनच इंदूरमध्ये ग्रामोफोनची स्थापना झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे हा या अॅपचा उद्देश्य होता.
ग्रामोफोन अॅप सोबत एक टोल फ्री क्रमांक शेतकऱ्यांना दिला जातो. फोनद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयी सल्ला दिला जातो. शेतकर्यास आपल्या शेतात कधी व कोणते पीक घ्यायचे याची संपूर्ण माहिती मिळते. त्यानंतर, स्वयंचलित सूचनांद्वारे ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागते. या माहितीद्वारे शेतकऱ्याला दर पंधरा दिवसांनी आपल्या पिकामध्ये काय करावे, पिकामध्ये कोणता रोग होऊ शकतो आणि त्याचे निराकरण काय आहे, हे जाणून घेता येते. कृषी रसायने व खतांचा योग्य वापर करून अधिक पीक कसे घेता येईल याचा योग्य सल्ला दिला जातो. सेंद्रिय शेती करण्याबाबतही प्रोत्साहित केले जाते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या अभियानास जोडण्यासाठी ते कॉल सेंटरचीही मदत घेत आहेत.
२०१६ ला ग्रामोफोन ची स्थापना झाली. आतापर्यंत तब्बल ६ लाख शेतकऱ्यांनी हे अँप डाउनलोड करून फोनवर मदत मिळवली आहे.त्यांनी आतापर्यंत ८.०६ दशलक्ष निधी जमा केला आहे. मागील दोन वर्षात त्यांची कमाई १५ टक्क्यांनी वाढली आहे.
(हर्षित गुप्ता, तौसेफ खान, निशांत महात्रे आणि आशिष राजन सिंग)
कृषिक्षेत्रात अजून दोन भारतीय तरुण फोर्ब्सच्या यादीत झळकले आहेत. त्यांचे नाव अमनदीप पंवार (२७) आणि ऋषभ चौधरी (२७). या तरुणांनी ५ वर्षांपूर्वी दिल्लीत भारतरोहन एयरबोर्न इनोव्हेशन ही कंपनी स्थापन केली. आणि अथक प्रयत्नांनी आज त्यांनी यश मिळवले आहे.
एरोनॉटिकल इंजिनियर अमनदीप पंवर आणि ऋषभ चौधरी यांनी लखनौमध्ये पदवीपूर्व अभ्यास सुरू असताना थेट शेतकऱ्यांशी संवाद सुरु केला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. एकदा ते शेतात ड्रोनची चाचणी करीत होते, तेव्हा त्यांना कळले की पिकांना लागणारी कीड, रोग याचे धोके ओळखण्यास शेतकऱ्यांना बरीच अडचण होत आहे. तेव्हा त्यांनी रिमोट सेन्सिंगद्वारे या अडचणी सोडवण्यास काही मदत होईल का याचा विचार केला. त्यांनी लगेच शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करायचे ठरवले. ड्रोनच्या मदतीने 60 मीटर उंचीवरून पिकाची माहिती गोळा करून सेव्ह करण्याचे काम सुरु केले. याला यूएव्ही/ड्रोन हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञान म्हणतात, म्हणजे एक असे तंत्र जे किडीमुळे किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वनस्पतींमध्ये होणारे जैवरासायनिक बदल ओळखण्यास मदत करते. सोप्या भाषेत पिकांचे नुकसान होईल असे बदल हे तंत्रज्ञान ओळखते. यामुळे पिकाचे नुकसान होण्याचा धोका टळतो आणि चांगले पिक येऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
हंगामात दर ७ ते १५ दिवसांनी ड्रोन आधारित हवाई सेवा दिली जाते. पाहणी झाल्यावर पुढच्या ४८ तासांत शेतकऱ्यांना रिपोर्ट पाठवला जातो. शेतकरी आपले उत्पादन भारतरोहन एयरबोर्न इनोवेशन कंपनीला विकतात. आणि कंपनी ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना विकतात.भारतरोहनच्या बहुतेक ग्राहकांमध्ये एफएमसीजी कंपन्या आणि किरकोळ विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून माल नंतर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो. सध्या भरतरोहनचे उत्पन्न २ कोटीच्या वर आहे आणि वर्षाखेरीस ते ३.५ कोटींपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे.
यश आणि अपयश येतच राहते, पण वेगळ्या क्षेत्रात नवी संधी शोधून व्यवसाय सुरू करायला कठोर मेहनत लागते. या तरुणांनी हेच केले आणि आज ते यशस्वी झाले आहेत. भारतासारख्या शेतीप्रधान देशाला अश्या तरुणांचा हात लागला तर देश शेतीत अजून प्रगती करेल यात शंकाच नाही.