computer

विदेशी शेअर बाजारातील फ्रॅक्शनल ओनरशिप काय असते? लाखो रुपयांचा शेअर सहज कसा घेता येऊ शकतो?

फक्त एक डॉलर देऊन अ‍ॅमेझॉनचा शेअर घेणार का ? असा प्रश्न विचारणारा माणूस एकतर अत्यंत भाबडा किंवा पराकोटीचा लबाड असेल ! कारणही तसंच आहे. अ‍ॅमेझॉन, गुगल (म्हणजे अल्फाबेट) हॅथवे बर्कशायर या कंपन्यांच्या शेअरची किंमत सोन्याच्या भावाला लाजवेल अशी आहे. उदाहरणार्थ,अ‍ॅमेझॉनच्या एका समभागाची किंमत ३२९२ डॉलर्स म्हणजे २,४०,००० आहे. गुगलच्या एका शेअरची किंमत १,४०,००० आहे. हॅथवे बर्कशायर या कंपनीची किंमत ऐकली तर क्दाचित भोवळच येईल. हॅथवे बर्कशायरच्या एका समभागाची किंमत $३५०,६२० म्हणजे २.६ कोटी रुपये आहे !!

पण मग या लेखाच्या सुरुवातीला विचारलेला प्रश्न फक्त एक डॉलर देऊन अ‍ॅमेझॉनचा शेअर घेणार का ? हा 'बोभाटा' च्या लेखाचा विषय का आहे ते आता वाचा

आता हे खरं आहे की १ डॉलरमध्ये अ‍ॅमेझॉनचा शेअर मिळणार नाहीच पण त्याचा एखादा छोटासा तुकडा तर मिळेल ! असे शेअरचे तुकडे तर बाजारात कधीच विक्रीला उपलब्ध नसतात पण त्यावर एक उपाय आहे तो म्हणजे फ्रॅक्शनल ओनरशिप (fractional ownership).

तर आधी समजून घेऊ या की फ्रॅक्शनल ओनरशिप  म्हणजे काय.

अनेकजणांनी एकत्र येऊन प्रत्येकाने काही टक्केवारीत घेतलेला एखाद्या संपदेचा मालकी हक्क म्हणजे  फ्रॅक्शनल ओनरशिप.रियल इस्टेट क्षेत्रात अनेकजण एकत्र येऊन एखादी मोठी इमारत विकत घेतात. त्यानंतर ती इमारत भाड्याने दिली जाते किंवा योग्य वेळी विकली जाते. ज्या टक्केवारीत मालकी हक्क घेतला असेल त्याच प्रमाणात नफा वाटून घेतला जातो. परंतु या संकल्पनेचा उगम झाला घोड्यांच्या रेसकोर्सवर !

एखादा महागडा घोडा अनेक गुंतवणूकदार पैसे एकत्र करून विकत घेतात. घोड्यावर मिळणारे पैसे प्रत्येक शर्यतीनंतर वाटून घेतले जातात. मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर अशा पध्दतीने घोडे घेतले जातात. साधारण चार लाखाच्या गुंतवणूकीत घोड्याचा अंशतः मालकीहक्क मिळतो. काही वेळातर अगदी ३०/४० हजाराची गुंतवणूक पुरेशीअसते. अशा सिंडीकेटमध्ये पैसे टाकणार्‍यांचा एक वेगळाच फायदा असतो तो म्हणजे त्यांना 'हॉर्स ओनर' असण्याचे फायदे मिळतात. त्यांची समाजातील उच्चभ्रू श्रीमंताशी ओळख वाढते.  हे झाले फ्रॅक्शनल ओनरशिप या संकल्पनेबद्दल !

पण अ‍ॅमेझॉन -गुगल-हॅथवेचे समभाग घेण्यासाठी हीच आयडीया कशी वापरता येते ते आपण बघू या !

लंडनच्या ग्लोबलाइज नावाच्या कंपनीने ही योजना आता भारतात आणली आहे. तुम्हाला हव्या असलेल्या परदेशी कंपनीचे शेअर तुम्हाला फ्रॅक्शनल ओनरशिप तत्वावर त्यांच्या माध्यमातून विकत घेता येतात. विकास नंदा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी स्थापन केलेली ग्लोबलाइज कंपनी एक शेअर ब्रोकींग फर्म म्हणजे दलालाची पेढी आहे. भारतीयांना विदेशी कंपन्यांचे समभाग कमीतकमी गुंतवणूक करून विकत घेता यावे म्हणून फ्रॅक्शनल ओनरशिपची योजना त्यांनी आखली आहे. कमीतकमी गुंतवणूक केवळ १ डॉलरची पण असू शकते. उदाहरण द्यायचे झाले तर असे :

१ डॉलर म्हणजे ७३ रुपये. अ‍ॅमेझॉनच्या समभागाची किंमत २.४ लाख रुपये म्हणजे १ डॉलरमध्ये तुम्हाला ७३/२४०००० इतका हिस्सा मिळेल. गुंतवणूक कमी आणि जोखीमही कमी !

आता प्रश्न असा येतो की समजा आपल्या खिशात २.४ लाख आहेत तर थेट गुंतवणूक करता येते का ? होय, तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील तर फक्त ग्लोबलाइजच नव्हे तर इतर अनेक ब्रोकरच्या माध्यमातूनही गुंतवणूक करता येते.

अशी गुंतवणूक करणे फारसे कठीण नाही. नेहेमीच्या पध्दतीने 'केवायसी' कागदपत्रांची पूर्तता करून आंतराष्ट्रीय बाजारातले शेअर विकत घेता  येतात. पण फ्रॅक्शनल ओनरशिप योजना काही मोजकेच शेअर ब्रोकर देतात. ग्लोबलाइज ही त्यापैकी एक !

परदेशी कंपनीचे कार्यालय भारतात असल्यावर गुंतवणूकदारांना त्याचा दिलासा वाटतो, म्हणून ग्लोबलाइजने त्यांचे कार्यालय दिल्लीत स्थापन केले आहे. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर दिल्लीला जाण्याची गरज नाही कारण खरेदी-विक्री 'ऑनलाइन' करता येते.

अशी परदेशी कंपनीत गुंतवणूक करणे  रिझर्व बँकेला मान्य आहे का ? हा एक महत्वाचा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. Liberalised Remittance Scheme (LRS) या रिझर्व बँकेच्या योजनेअंतर्गत भारतीय नागरीक USD 2,50,000 दरवर्षी गुंतवू शकतो. त्यामुळे अशी गुंतवणूक कायदेशीर आहे हे वेगळे सांगायला नको.

चला तर , घेऊ या उद्यापासून अ‍ॅमेझॉन आणि गुगलची अंशतः मालकी !

(या लेखाचा एकमेव उद्देश ही एक अभिनव कल्पना बोभाटाच्या वाचकांना सांगावी इतकाच आहे. बोभाटा आणि ग्लोबलाइज यांचा परस्पर काहीही संबंध नाही)

सबस्क्राईब करा

* indicates required