एका गाण्याची -एका परदेशी कथेची आणि दोन शब्दांची गोष्ट !! एका तळ्यात होती बदके पिले सुरेख !

आधी गाण्याबद्दल बोलू या. हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलं आहे. एके काळी गाणं म्हणायला सांगीतलं की हे गाणं म्हणजे गाणार्याचं पहिल्या पसंतीचं गाणं होतं. ग.दि.माडगूळकरांनी जी अविट गोडीची गीतं आपल्याला दिली आहेत त्यापैकीच हे एक गाणं !
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक !
तळ्यातल्या बदकांच्या थव्यातलं एक पिल्लू , ज्याच्या मनात आपण इतरांसारखे नाही अशी खंत आहे, आपण बहिष्कृत आहोत अशी ठाम समजूत आहे अशा एका दु:खी पिल्लाला एक दिवस पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते आणि त्याला कळते की आपण इतर बदकांसारखे दिसत नाही कारण आपण सामान्य बदक नाही तर राजहंस आहोत ! हे गाणं ऐकताना -हे गीत वाचताना , अनेकांना आपण सामान्य नाही तर असामान्य आहोत याची प्रचिती यायची. खिन्न मनाला उभारी देणारं हे गाणं 'सुखाचा संसार' या चित्रपटासाठी मधुबाला जव्हेरी या गायीकेने गायलं होतं. संगीत दिग्दर्शक होते वसंत पवार.
याच गाण्याची दुसरी आवृत्ती आशा भोसले यांच्या आवाजातही ऐकायला मिळते.त्याची चाल बांधली होती श्रीनिवास खळे यांनी ! आपल्या सर्वांच्या परिचयात असलेले गाणे हे आशा भोसले यांनी गायलेले आहे.
(या गाण्याची आणखी एक आवृत्ती रविंद्र साठे यांनी गायली आहे असं म्हणतात.)
पण या लेखाचा विषय किती आवृत्त्या आल्या हा नाही तर या गाण्यामागे असणारी प्रेरणा कुठून आली हे सांगण्याची आहे !
१९ व्या शतकात लहान मुलांसाठी परीकथा लिहीणार्या हॅन्स अँडरसन या लेखकाची 'अग्ली डकलींग' नावाची एक कथा आहे हे त्या गीताचे मूळ स्फूर्तिस्थान आहे. या कथेत पण एक बदकाचे पिल्लू आपण कुरुप आहोत, इतरांपेक्षा कुठेतरी कमी आहोत या भावनेने दु;खी असतं. आणि एक दिवस पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे बघू त्याला स्वतःच्या खर्या अस्तित्वाची ओळख पटते. तो एक राजहंस आहे हे कळते.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण असाच एक क्षण येतो जेव्हा आपण फक्त 'अग्ली डकलींग' नाही तर हंस आहोत हे कळतं. या साक्षात्कारी कथेमुळे इंग्रजी भाषेत ugly duckling हा शब्दप्रयोग जन्माला आला. एखाद्या व्यक्तिला आपन कोण आहोत याची उशिराने जाणिव होणे किंवा इतरांना त्याची खरी ओळख फार उशिरानी समजणे हे स्पष्ट करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो. त्याचा शब्दकोशातला अर्थ असा आहे
"One that seems unattractive or unpromising at first but has great potential and later turns out to be quite attractive or successful."
हा शब्दप्रयोग १८७७ साली जन्माला आला आणि आजही तो वापरला जातो.
शेवटची पण अत्यंत महत्वाची नोंद हॅन्स अँडर्सनला ही कथा लिहायला कदाचित दोन पानभरून शब्द वापरावे लागले असतील पण गदिमांच्या प्रतिभेने तीच कथा मोजक्या तीन कडव्यात सांगीतली, म्हणून संदर्भासाठी सोबत ते पूर्ण गीत देत आहोत.
एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु: ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनीं परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक
परक्या देशातली गोष्ट आपल्याच मातीतली वाटावी इतक्या सहजतेने लिहिणारे, संगीत देणारे आणि गाणारे... सगळेच थोर!!