computer

गालापागोस बेटावर बकरी आणि माणसांमध्ये २ वर्षे युद्ध का चाललं? या युद्धात कोण जिंकलं??

जगाच्या इतिहासात अशी कित्येक विध्वंसक युद्धे लढली गेली आहेत. या युद्धांमुळे मानवजातीचे आणि पर्यायाने पर्यावरणाचे अधिकाधिक नुकसानच झाले आहे. हिरोशिमा, नागासाकी या दोन शहरांच्या नुसत्या उल्लेखानेही आपल्या अंगावर काटा उभा राहतो. आज मात्र आम्ही तुम्हांला एका वेगळ्या युद्धाची गोष्ट सांगणार आहोत. हे युद्ध याच सहस्त्रकात लढले गेले. पण माणसामाणसांत नाही तर, बकरी विरुद्ध माणूस असे या युद्धाचे स्वरूप होते. आता बकरी विरुद्ध माणूस हे काय युद्ध झाले का? जगभरात दररोज कितीतरी बकऱ्या मारल्या जातच असतात. त्यामुळे बकऱ्या कापणे हे जर युद्ध असेल तर असे युद्ध काय रोजच होते आणि कधीकधी आम्हीही यात भाग घेतोच, असे तुम्ही म्हणाल. पण या युद्धाची कथा थोडी वेगळीच आहे. मग काय आहे ती कथा, चला वेळ न दवडता जाणून घेऊया.

इक्वॅडोरपासून ९०० किमी अंतरावर वसलेल्या गालापागोस बेटावर हे विचित्र युद्ध लढले होते. पॅसिफिक समुद्रातले गालापागोस नावाचे हे बेट अंदाजे लाख वर्ष जुने आहे. उर्वरित पृथ्वीच्या मानाने हे बेट अगदीच नवे म्हणावे लागेल. १८३० मध्ये जेव्हा डार्विन जगसफारीला निघाला तेव्हा याच बेटाने त्याला उत्क्रांतीच्या सिद्धांताची प्रेरणा दिली. डार्विनच्या मते हे बेट म्हणजे एक नवे जग आहे. या बेटावर जीव आपोआप उत्क्रांत झाले आहेत. इथला प्रत्येक जीव हा पृथ्वीवरील इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगळाच आहे.

विविध प्रकारच्या जैवसमृद्धीने नटलेले हे बेट म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच म्हटले जाते आणि म्हणून इथली जैवविविधता टिकून राहावी यासाठी बराच आटापिटा सुरू असतो. १८३० पासूनच इथे मानवी वावरही सुरु झाला. १९५९मध्ये या बेटावर मासेमारीसाठी आलेल्या काही मच्छिमारांच्या बकऱ्या इथेच हरवल्या. बेटाच्या घनदाट जंगलात हरवलेल्या त्या बकऱ्या काही सापडल्या नाहीत. या तीन बकऱ्यांमध्ये दोन नर आणि एक मादी होती. हळूहळू या बकऱ्यांची संख्या वाढू लागली. सुरुवातीला तर या बकऱ्यांचा फारसा कुणाला त्रास झाला नाही. बाहेरून आलेल्या या बकऱ्यांनी बऱ्यापैकी इथल्या वातावरणाशी जुळवून घेतले होते. वाढता वाढता यांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली.

इथली जैव विविधता पृथ्वीवरील इतर ठिकाणांपेक्षा थोडी वेगळी असल्याचे आधीच सांगितले आहे. इथल्या विविधतेतील एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आढळून येणारी मोठमोठी कासवे. इथली कासवे शंभर वर्षे जगतात आणि सुमारे ५०० पौंड पर्यंत त्यांचे वजन भरते. या कासवांमुळेच या बेटाला गालापोगास हे नाव मिळाले. कारण स्पॅनिश भाषेत गालापागो म्हणजे कासव. कासवांचे बेट ते गालापोगास.

बकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे या कासवांच्या जीवाला धोका निर्माण झाला. लाखोंच्या संख्येत वावरणाऱ्या बकऱ्यांना सगळे रान मोकळेच होते. इथला मूळचा झाडपाला, काही वनस्पती, वेली, या निव्वळ बकऱ्यांच्या चरण्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आल्या. कासवांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गवतावरही बकऱ्यांनीच कब्जा मिळवला असल्याने इथली वैशिष्ट्यपूर्ण कासवांची संख्याही लक्षणीय रित्या कमी झाली. सुमारे ३०,०००च्या आसपास असणाऱ्या या कासवांची संख्या फक्त ३,०००-४,००० इतकीच राहिली. बेटावरील इतर प्राण्यांचीही उपासमार होऊ लागली.

बकऱ्यांच्या चरण्याने बेटावरील जमिनीची मोठ्याप्रमाणात धूप होत होती. एकंदरीत या बकऱ्यांमुळे इथल्या जैवविविधतेला आणि संपूर्ण बेटालाच धोका निर्माण झाला होता. अशावेळी या बकऱ्यांची संख्या कमी व्हावी म्हणून काही उपाय योजने आवश्यक होते. तरच इथला जैविक समतोल साधला जाणार होता.

बकऱ्यांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी इथे सिंह सोडले जावेत अशीही एक कल्पना इक्वेडोरच्या अधिकाऱ्यांना सुचली होती. पण सिंहांना कसे कळणार की आपल्याला फक्त इथल्या बकऱ्या खाण्यासाठीच इथे आणून सोडले आहे? म्हणून पुन्हा ही योजना रद्द करून या बकऱ्यांविरुद्धच युद्ध पुकारले गेले. गालापागोस संवर्धन समितीने (या समितीलाआता चार्ल्स डार्विन फाउंडेशन म्हणून ओळखले जाते) या योजनेला इसाबेला प्रोजेक्ट असे नाव दिले.

बकऱ्यांची शिकार करण्यासाठी न्यूझिलंडवरून शार्पशूटर्स, हेलिकॉप्टर आणि पायलट बोलावण्यात आले. हेलिकॉप्टरमधून हे शूटर बकऱ्यांच्या कळपावर हल्ला करत आणि त्यांना संपवून टाकत. सुरुवातीला तरी यामुळे बकऱ्यांची संख्या आटोक्यात येऊ लागली, पण हुशार बकऱ्यांनी हा डाव लगेच हाणून पडला. हे बकरे आता गुहेत राहू लागले आणि त्यांनी कळपाने चरण्याचे प्रमाणही कमी केले. एकीकडे शिकाऱ्यांच्या बंदुकी त्यांचा वेध घेत होत्या, पण दुसरीकडे त्यांची संख्याही अबाधित राहत होती. कितीही बकऱ्या मारल्या तरी बकऱ्यांचा शेवट होण्याची काही चिन्हे दिसेनात. या बेटावरून बकऱ्यांचा संपूर्ण नयनाट करण्यासाठी त्यांचे प्रजनन थांबवणे गरजेचे होते. यासाठी पुन्हा एक नवी शक्कल लढवण्यात आली.

हवेतून शिकार करून बकऱ्यांची ९०% संख्या तरी कमी झाली होती पण, अजूनही या बेटावर हजारो बकऱ्या होत्या आणि त्यातून आणखी हजारो बकऱ्या जन्मास येण्याचीही शक्यता होती. गुहेत दडून राहणाऱ्या या बकऱ्यांचा शोध घेणे जास्त महत्वाचे होते. यासाठी जुदास बकऱ्या जंगलात सोडण्यात आल्या. या बकऱ्यांना जीपीएस ट्रॅकर्स लावण्यात आले. त्यामुळे या बकरीच्या मागून बकरा आला की या बकऱ्या त्यांच्या गुप्त ठिकाणी शिरकाव करू शकत होत्या. मग या बकऱ्यांचे ठिकाण शोधून इथे हल्ला केला जाई. हा हल्ला करताना फक्त बेटावरील बकऱ्या मारल्या जात आणि जुदास बकरीला सोडून दिले जाई. त्यामुळे तिच्या सहाय्याने या बकऱ्यांची नवी ठिकाणं शोधणे शक्य होत असे. अशा ९०० जुदास बकऱ्या या बेटावर सोडण्यात आल्या होत्या. या बकऱ्यांच्या सहाय्याने बेटावरील एकेक बकरी शोधून मारण्यात आली. बकऱ्यांविरुद्ध पुकारण्यात आलेले हे युद्ध सुमारे दीड-दोन वर्षे तरी सुरु राहिले.

२००४ साली सुरु झालेले हे युद्ध २००६ साली संपुष्टात आले. महत्वाचे म्हणजे इसाबेला योजना यशस्वी झाली. या बेटावरून फक्त बकऱ्याच नाही, तर डुकरे, गाढवे असे जे काही सस्तन प्राणी होते ते सगळेच नष्ट करण्यात आले. अडीच लाख बकऱ्यांपैकी एकही बकरी या बेटावर आता शिल्लक नाही. बकरींमुळे इथल्या बेटावरील झुडुपे, झाडे वेली नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या त्यांनी आता पुन्हा एकदा बहरायला सुरुवात केली आहे. इथल्या कासवांची संख्याही आता वाढू लागली आहे.

एका बेटावरील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या प्राण्याची हत्या करण्याची ही पहिलीच वेळ असावी. काही लोकांना मात्र हा मानवी हस्तक्षेप गैरवाजवी वाटतो. आता हा हस्तक्षेप गरजेचा होता की अनाठायी हे तुम्हीच ठरवा.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

 

आणखी वाचा:

जेव्हा पक्षी गनिमी कावा वापरून माणसांशी युद्ध जिंकतात...वाचा हा अतरंगी इतिहास !!

सबस्क्राईब करा

* indicates required