computer

गणेशोत्सव स्पेशल : १०,००० प्लास्टिकच्या बाटल्यांमधून साकारलेला बाप्पा....

“स्वच्छता ही भक्तीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे” या जुन्या उक्तीप्रमाणे आणि ‘स्वच्छ भारत अभियान ’ उपक्रमाच्या अनुषंगाने प्रेरित होऊन सीवुड्स ग्रँड सेंट्रल मॉलने गणेशोत्सव साजरा करण्याचा पर्यावरणपूरक मार्ग स्वीकारला आहे.

मंडळी, प्रख्यात कलाकार आबासाहेब शेवाळे आणि त्यांच्या टीमने ही मूर्ती तयार केली आहे. पहिल्यांदाच भारतात १०,००० पेक्षा जास्त प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करून गणेशमूर्ती बनवण्यासाठी आली आहे. मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या ३०० किलोग्रॅम प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यानंतर त्याचं रुपांतर वंगण इंधनात केलं जाईल.

मूर्ती तयार करण्यासाठी लाल, काळ्या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या आणि पांढर्‍या रंगात रंगविलेल्या २०० मिली बाटल्या वापरण्यात आल्या आहेत. या वेगळ्या कार्यासाठी एसजीसी मॉलने एक देणगी मोहीम सुरू केली होती. त्यांनी लोकांना त्यांच्या वापरल्या गेलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या दान करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे ही मूर्ती साकार होऊ शकली.

परोपकारी देवतेचे आगमन लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणते, परंतु प्लास्टिकच्या वापरामुळे आणि प्लास्टिकच्या कचर्‍याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे पर्यावरणाची मोठ्याप्रमाणात हानी होते. एक जबाबदार कॉर्पोरेट या नात्याने एसजीसी मॉलने प्लॅस्टिकच्या हानिकारक प्रभावाविषयी आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती पसरवण्याचं काम यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलं आहे.

ह्या आर्ट वर्क चित्राची नोंद युनिक बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करण्यात येणार आहे. अशा या भारतातल्या पहिल्याच १०००० प्लास्टिक बॉटलने साकारलेल्या बाप्पाचं दर्शन तुम्ही २ ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत घेऊ शकतात.

 

पत्ता : सीवुड्स ग्रँड सेंट्रल मॉल, नवी मुंबई – ४००७०९.

सबस्क्राईब करा

* indicates required