computer

बोभाटा स्पेशल : जगातल्या सर्वात जुन्या २०००वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्तीसोबत पाहा अनेक प्राचीन गणपतीशिल्पे!!

युगानुयुगाचे गणेश दर्शन हे पद्मश्री डॉ.प्रकाश कोठारी यांचे गणेशमूर्तींचे प्रदर्शन २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आले होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गणेश मूर्ती हे या प्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण होते. 'बोभाटा' टीमच्या प्रतिनिधीना हे प्रदर्शन पाहताना डॉ.प्रकाश कोठारी यांना भेटायची संधी मिळाली.

"या प्रदर्शनाला भेट देणे हे भौगोलिक अंतरामुळे सगळ्यांना शक्य होणार नाही म्हणून प्रदर्शन संपल्यानंतर या गणेशाचे दर्शन बोभाटाच्या  माध्यमातून आयोजित करता येईल का ?" अशी विनंती केल्यावर डॉ. प्रकाश कोठारी यांनी ताबडतोब होकार दिला. केवळ होकार देऊन न थांबता ताबडतोब या सर्व गणेश प्रतिमा बोभाटाला दिल्या. या कार्यात डॉ. कोठारी यांचे एक मित्र श्री कमलेश देवरुखकर यांची बहुमोल मदत मिळाली. हा खजिना बोभाटातर्फे रसिक आणि भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांचे अनेक आभार! तर मंडळी, चला या युगानुयुगातील गणेशाच्या दर्शनाला!!

१. २००० वर्षांपूर्वीची अतिप्राचीन टेराकोटा गणेशमूर्ती

इंग्रजी इसवी सनाच्या पहिल्या शतकातली,  सातवाहन कालातली म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची ही गणेश मूर्ती पैठण येथे सापडली आहे. भाजलेल्या मातीत म्हणजे टेराकोटामध्ये बनवलेला हा गणेश योगमुद्रेत बसलेला असून त्याची दोन्ही पावले एकत्र आहेत आणि गुडघे बाहेरच्या बाजूस झुकलेले आहेत. एका हातात लाडू तर दुसरा हात अभय मुद्रेत आहे. आखूड सोंड, सुपासारखे कान आणि गळ्यात नागाचे यज्ञोपवीत धारण केलेले असून नाभीच्या जवळ सर्पमुद्रा दिसत आहे. हे शिल्प कदाचित गळ्यात घालण्यासाठी तयार केले असावे असा तर्क आहे कारण मागच्या बाजूस धागा किंवा साखळी घालण्यासाठी नेढं केलेलं आहे.

२. सव्यललितासनात बसलेल्या गणेशप्रतिमेची मोहोर

ही भाजलेल्या मातीतली मोहोर किंवा शिक्का असावा. याच्या एका बाजूला  गणपतीबाप्पा सव्यललितासनात बसलेला दिसतो. डाव्या हातात लाडू किंवा मोदक आहे, पण उजवा हात झिजल्याने स्पष्ट दिसत नाही. इसवी सनाच्या पहिल्या ते चौथ्या शतकात कधीतरी ही मोहोर तयार झाली असावी. मध्यभारतात मिळालेल्या या शिक्क्याच्या दुसऱ्या बाजूस नंदी असून त्या खाली ब्राह्मी लिपीत  "जग-इस्वर किंवा जगेस्वर" अशा अर्थचा मजकूर कोरला आहे. या मोहरेचा काळ निश्चित करण्यासाठी डॉ. प्रकाश कोठारी यांनी देश विदेशातील अनेक तज्ञांचे मत घेतले आहे.

३. द्विभुज गणपती

सहाव्या शतकापर्यंत गणपतीच्या सर्व मूर्तींमध्ये अशा दोन भुजा असलेल्याच मूर्ती असायच्या. हा द्विभुज गणपती सुखासनात बसला असून दोन्ही भुजा गुडघ्यावर टेकल्या आहेत. याची सोंड वाकडी नसून सरळ आहे. अशी सरळ सोंड फारच क्वचित नजरेस येते. अपवाद फक्त इंडोनेशियाचा आहे. तेथील मूर्तीत सरळ सोंड असते. दगडात घडवलेल्या या शिल्पाचा काळ साधारण सहाव्या शतकाचा आहे.

४. शिवलिंगावरचा गणपती

दहाव्या शतकातील हे शिल्प एका वेगळ्याच घडणीचे आहे. चौरस ग्रॅनाईटमध्ये (काळा दख्खनी दगड) घडवलेल्या या शिल्पाची मांडणी एखाद्या दक्षिणेतल्या देवळासारखी आहे. चारी बाजूने प्रदक्षिणा मार्ग सोडलेला आहे. या मार्गावर योनी पीठ असून  त्यात शिवलिंग दिसत आहे. चार बाजूंपैकी एका बाजूस शिवाचे , दुसर्या  बाजूस गणेशाचे तर उरलेल्या दोन बाजूंवर नंदी आणि कार्तिकेय यांचे रुप कोरलेले आहे.

५. कसोटीच्या दगडावर गणपती आणि मारुती

गणपती आणि मारुती दोन्ही संरक्षक देवता एकाच शिल्पात फारच कमी दिसतात.  पण या १३ व्या शतकातील शिल्पाचे वैशिष्ट्य काही वेगळेच आहे. यासाठी वापरलेला दगड साधा नसून अत्यंत कठीण असा कसोटीचा दगड आहे. कसोटीचा म्हणजे सोने पारखण्यासाठी वापरला जातो तो दगड. या मूर्तीत एका बाजूला गणपती आणि शक्ती असून दुसऱ्या बाजूस हनुमान कोरलेला आहे. हनुमान आणि गणपती हे दोघेही शंकराचे अंश मानले जातात. म्हणून त्याकाळी प्रवास  निर्विघ्न पार पडावा म्हणून असा कसोटीचा दगड वापरला जात असावा.

६. बाराव्या शतकातला चतुर्भुज गणपती

होयसळ कर्नाटकातील ही मूर्ती काळ्या ग्रॅनाइटमध्ये घडवली असून या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की गणेशाचे डोळे उभे आहेत. सोंडेला गोल वर्तुळाकार वळण आहे. वरच्या दोन हातात पाश आणि अंकुश, तर खाली एका हातात लाडू आणि अभय मुद्रा आहे. या मूर्तीची खासियत दिसते की इथे मनगट्या, पैंजण किंवा इतर अलंकाराला अतिमहत्व देण्याचे टाळले आहे.

७. दशभुजा गणपती

पंधराव्या शतकातील हा ब्राँझ (कांस्य) गणपती दहा हातांचा म्हणजे दशभुज असून उजव्या बाजूस एक मोठ्ठा लाडू दिसत आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूस शक्ती  दिसत आहे.  अंगावर काहीच ठळक दागिने आहेत. थोडासा मागे रेलून बसलेल्या अवस्थेतला हा गणपती आहे.

८. मूषकारूढ गणपती

काशाच्या धातूत घडवलेली ही मूर्ती महाराष्ट्रातील असून ती सोळाव्या शतकातील आहे. या शिल्पात मूषकाच्या पाठीवर गणपतीचे वजन असल्याने त्याचे तोंड वर उचललेले दिसते आहे. देवाइतकाच उंदीर मोठा दिसत आहे हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. सोबत प्रभावळ असावी पण ती येथे दिसत नाही. प्रभावळ जोडण्यासाठी दोन्ही बाजूस व्यवस्था केलेली दिसते आहे.

९. तामिळनाडूमधल्या मंदिरातला घंटेवरील गणपती

 सोळाव्या शतकातील या घंटेवर चारी बाजूला गणपती आहे. घंटेसाठी मिश्रधातू -बेल मेटल- म्हणजे तांबे आणि  कथिल वापरले आहे.  घंटानाद मधुर व्हावा यासाठी हा धातू वापरला जातो. याखेरीज हा धातू ओतीव कामातील बारीक नक्षी उत्तमरित्या दाखवतो. या घंटेचे वजन सात किलो आहे.

१०. षटभूज महाकालाच्या पायाशी गणपती

 नेपाळ-तिबेट या परिसरात सापडलेल्या या शिल्पात महाकालाच्या पायाखाली गणपती दाखवला आहे. या महाकालाच्या हातात त्रिशूल डमरू पाश, अंकुश, दिसत असून त्याची मुद्रा भय निर्माण करणारी आहे. प्रभावळ किर्तीमुद्रेची आहे. अतिशय बारिक नक्षीत  घडवलेल्ले हे शिल्प बौध्द तांत्रिकांचे असावे असा अंदाज आहे. वाढत जाणाऱ्या गणेश माहात्म्याला विरोध करण्यासाठी तांत्रिक पूजक अशी मूर्ती घडवायचे.

या लेखाच्या मर्यादा लक्षात घेता मोजक्या दहा मूर्तींविषयी आज आम्ही लिहिले आहे. अजून शंभराहून अधिक प्रतिमा आपल्यासमोर कशा प्रदर्शित कराव्यात याचा बोभाटा विचार करत आहे.  वाचकहो, या प्रदर्शनाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर पुस्तक डॉ प्रकाश कोठारींनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक मिळाल्यास जरूर घ्या आणि जतन करा.

सबस्क्राईब करा

* indicates required