जर्मनीत बनताहेत हाय-टेक पत्रावळी..
लहानपणी गावी कधी पत्रावळीवर जेवला आहात? एखाद्या मोठ्या शाळेत नाहीतर घरासमोरच्या मांडवात लागलेलं लग्न, सावधगिरी म्हणून एकावर-एक ठेवलेल्या दोन पत्रावळी, भाताच्या ढिगात बसवलेला त्रिकोणी द्रोण आणि त्यात ओतलेली खास लग्न स्पेशल आमटी. आता सगळीकडे बुफे आले आणि या पत्रावळीवरच्या पंगती संपल्या.

नंतरही आपल्या पत्रावळ्यांवर बरेच प्रयोग झाले. म्हणजे बघा, त्रिकोणी बुडाचे द्रोण जाऊन छान सपाट बुडाच्या वाटयांसारखे द्रोण आले. मग नंतर या पत्रावळींची खाचेच्या ताटांसारखी डिझाईन आली. पण तोपर्यंत पत्रावळीवर खाणं म्हणजे एकदम डाऊनमार्केट झालं होतं. आता लोक एकतर युझ ऍंड थ्रो कागदी खाचेची ताटं तरी वापरतात किंवा थर्माकोलची. कागदाच्या ताटांपर्यंत ठीक आहे, ती रिसायकल तरी होतात. पण थर्माकोलची ताटं म्हणजे पर्यावरणाची हानी आहेच.
पण माहित आहे, आता जर्मनीतल्या एका कंपनीनं ही अशी झाडाच्या पानांपासून प्लेट्स बनवायला सुरूवात केलीय. ते या आधुनिक पत्रावळ्यांची जाहिरात इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल अशी झोकात करत आहेत आणि कार्पोरेट ऑफिसेसमध्ये त्यांनी या पत्रावळ्यांचा प्रचार सुरू केलाय. त्यांनी या पत्रावळी बनवतानाच एकावर एक अशा पानांच्या दोन थर दिले आहेत आणि मध्ये पानांपासूनच बनवलेला कागद घातलाय. त्यामुळं या तीन थरांनी या प्लेटांना मस्त मजबूती आलीय. साधारणपणे प्लास्टिकची प्लेट पर्यावरणात ७३०दिवस राहते पण चांगल्याप्रकारे कुजत नाही. पण ही पानांपासून बनवलेली हाय-टेक पत्रावळ काही दिवसांतच मातीत पूर्ण मिसळून जाते.

एवढंच काय, त्यांनी पत्रावळीची पानं काड्यांनी एकमेकांसोबत न जोडता ती पानं चक्क शिवली आहेत. त्यासाठीचा दोराही या लोकांनी पाम झाडाच्या तंतूंपासून बनवलाय!! जर पत्रावळीवर जेवला असाल, तर भातातून ती पत्रावळीची काडी तोंडात जायची कसली धास्ती असायची ते आठवेलच तुम्हांला.
पिकतं तिथं विकत नाही. त्यामुळं सध्या जरी आपण पत्रावळी सहजासहजी वापरत नसलो तरी भविष्यात कदाचित आपण पत्रावळी कशा बनवायच्या हे जर्मन लोकांकडून शिकू. आणि आपणही कदाचित या ’इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल’ प्लेट्स वापरायला लागू..