computer

असा लिहिला गोदरेजच्या टाईपरायटरने स्वातंत्र्यानंतरच्या एका भारतीय पिढीचा इतिहास!

आजच्या पिढीला टाईपरायटर मशीन वापरून माहित नाही. कम्प्युटर, स्मार्टफोनच्या युगात जुनाट टाईपरायटर मशीन वापरायला तरी कशाला हवी ? पण टाईपरायटरच्या महत्वाबद्दल प्रत्येकाने नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. या एका मशीनने भारतातल्या २ पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून दिली होती. हे तुम्हाला माहित आहे का ? स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून नोकरी मिळवून देण्यात याच मशीनचा हातभार होता हे तुम्हाला माहित आहे का ? या लहानशा मशीनने आधुनिक भारताचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आजच्या विशेष लेखात आपण याच टाईपरायटर मशीन विषयी जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून तुम्ही टाईपरायटरकडे एका नव्या दृष्टीने बघाल यात शंका नाही.

टाईपरायटर आणि भारताचा संबंध स्वातंत्र्यपूर्वकाळापासून आहे. १९४० च्या काळात भारत टाईपरायटर परदेशातून मागवत असे. परदेशातून येणाऱ्या टाईपरायटर मध्ये अमेरिकेतून येणाऱ्या टाईपरायटर्सची संख्या जास्त होती. यात अमेरिकेची रेमिंग्टन ही कंपनी अग्रगण्य समजली जायची.

टाईपरायटर वगळता रेमिंग्टनचा आणि भारताचा आणखी एका बाबतीत संबंध आहे. रेमिंग्टन शस्त्र बनवणारी कंपनी आहे. या कंपनीनेच १८५७ साली गाय आणि डुकराची चरबी असलेल्या बंदुका तयार केल्या होत्या. त्यांच्या या घोटाळ्यामुळेच भारतात १८५७ चा उठाव घडून आला.

तर, ही रेमिंगटन कंपनी जवळजवळ १९१० पासून खास भारतासाठी मराठी, गुजराती, उर्दू, अरेबिक आणि गुरुमुखी अशा स्थानिक भाषांमधले टाईपरायटर तयार करत होती. स्थानिक भाषा लिहिता येत असल्याने टाईपरायटर भारतात प्रचंड प्रसिद्ध होते. लेखक, पत्रकार, राजकारणी टाईपरायटरचा नियमित वापर करत.

पण भारताला हवा होता आपला स्वतःचा स्वदेशी टाईपरायटर. ही कल्पना १९४८ सालीच सुचवण्यात आली होती, पण पुढे जाऊन ज्या कंपनीने पहिला भारतीय टाईपरायटर बाजारात आणला ती गोदरेज कंपनी त्यावेळी एका अत्यंत महत्वाच्या कामात गुंतली होती. हे काम होतं भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘मतदान पेटी’ तयार करण्याचं.

भारतीय टाईपरायटरचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी १९५५ साल उजाडावं लागलं. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली कंपनी ठरली. या पहिल्यावहिल्या टाईपरायटरला नाव मिळालं “गोदरेज प्राइमा”.

आज आपण टाईपरायटरला तितकसं महत्व देणार नाही, पण त्याकाळी ही गोष्ट आधुनिक आणि स्वतंत्र भारताचं प्रतिक मानली गेली. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्ष उलटून गेली होती आणि एवढ्या कमी वेळात भारतीय इंजिनियर्सनी संपूर्णपणे स्वदेशी असा टाईपरायटर तयार केला होता. ही बाब स्फूर्तिदायक ठरली.

काही वर्षातच परदेशी टाईपरायटरच्या जागी ‘गोदरेज प्राइमा’ने संपूर्ण भारत व्यापला. ऑफिस म्हटलं की टाईपरायटर आलाच आणि तिथला तो परिचित असा खडखडचा आवाजही आलाच. या सगळ्या गोष्टींची  सुरुवात १९५५ नंतर झाली. सरकारी कार्यालये, कोर्ट, संरक्षण यंत्रणा या गोदरेज टाईपरायटर वापरण्यात पहिल्या क्रमांकावर होत्या.

त्याकाळी रेमिंग्टन व्यतिरिक्त हाल्डा (Halda), ओलीवेटी (Olivetti), स्मिथ-कोरोना (Smith-Corona), अॅड्लर-रॉयल(Adler-Royal), ऑलम्पिया (Olympia), नाकाजिमा (Nakajima) या कंपन्या सुद्धा प्रसिद्द होत्या. गोदरेजने फारच कमी वेळात या प्रसिद्ध कंपन्यांना टक्कर द्यायला सुरुवात केली.

गोदरेजचा खप किती होता याची कल्पना येण्यासाठी एक उदाहरण बघूया. त्याकाळी भारतभरातून जवळजवळ १,५०,००० टाईपरायटर्सची मागणी असायची. पण कंपनीकडून फक्त ५०,००० टाईपरायटर्स तयार केले जायचे. भारताबाहेरही गोदरेज प्राईमाचे ग्राहक होते. श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मोझांबिक, अंगोला, मोरोक्को या देशांमध्ये या टाईपरायटर्सचा प्रचंड खप होता.

टाईपरायटर आणि महिला सबलीकरण

टाईपरायटर हे पहिल्यांदा महिलांशी जोडलं गेलं ते अमेरिकेत. अमेरिकन रेमिंग्टन कंपनीने असा विचार केला होता की टाईपरायटरचा सर्वाधिक उपयोय हा महिलांकडून होईल. या विचाराने त्यांनी महिलांसाठी फुलांचं डिझाईन असलेले टाईपरायटर बाजारात आणले. ही कल्पना चांगलीच प्रसिद्ध ठरली. महिला मोठ्या संख्येने टाइपिंगच्या कामाकडे वळल्या.

या ट्रेंडने त्याकाळी उच्चांक गाठला होता. १९१० साली अमेरिकेतील जवळजवळ ८१ टक्के टाईपिस्ट या महिला होत्या. टाईपरायटरने मोठ्या प्रमाणात अमेरिकन महिलांना काम मिळवून दिलं. पण अमेरिकेत याचा एक विपरीत परिणामही झाला. त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या पोर्नोग्राफिक मासिकांमध्ये “टाईपरायटर गर्ल” हा एक नवीन विषय बनला होता.

भारतात असा कोणताही प्रकार घडला नाही. उलट या एका मशीनने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं. १९६० नंतरच्या चणचणीच्या काळात अनेक संसार या स्त्रियांच्या मदतीवर उभे राहिले. नोकरी करणारी बायको ही कन्सेप्ट इथून सुरू झाली. पाचवारी साडी, सायकल आणि टायपिंग मशीन या तीन गोष्टी म्हणजे आधुनिक भारतीय स्त्रीचे प्रोफाइल बनले. भारतीय महिलांना घराचा उंबरठा ओलांडून स्वतःच्या पायावर उभं करण्यात टाईपरायटरचा खूप मोठा हातभार लागला.

गोदरेज टाईपरायटरची भारतातली प्रसिद्धी

भारतात गोदरेज प्राईमा सुपरहिट का ठरलं ? याचं एक प्रमुख आणि गमतीदार कारण आहे. भारतीयांना गोदरेज टाईपरायटरचा खडखडाट प्रचंड आवडला होता. हीच बाब इतर कंपन्यांनी लक्षात घेतली नाही. तसं पाहायला गेलं तर गोदरेज टाईपरायटरचा हा एक अवगुण म्हणता येईल, पण त्यानेच गोदरेजला भारतभर पोहोचवलं.

दिल्लीच्या ‘परवाना प्राधिकरण’ (driving licence authority)च्या ऑफिस बाहेर बसणारे ६० वर्षीय सतीश कालाकोटी गोदरेजच्या सुवर्णकाळाबद्दल सांगताना म्हणतात की, “जर्मन एरिका कंपनी त्यांच्या आवाज न करणाऱ्या आणि टाईप करण्यास अगदी सोप्प्या टाईपरायटर्ससाठी प्रसिद्ध होती. पण मी गोदरेजचा आवाज करणाऱ्या टाईपरायटरची निवड केली.” सतीश कालाकोटी आजही दिल्लीत टाईपरायटरवर काम करतात. गोदरेज टाईपरायटरचा सुवर्णकाळ जगलेल्या मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो.

भारतात टाईपरायटर म्हणजे प्रतिष्ठेचं चिन्ह समजलं जायचं. आजचा मध्यमवर्गी तरुणवर्ग बाइक किंवा कारची स्वप्न बघतो तर त्यावेळचा तरुणवर्ग हा टाईपरायटरची स्वप्न बघायचा. मॅट्रिक पास झालं की टायपिंग, शॉर्टहँड आणि नोकरीत रुजू असा प्रघातच पडलेला होता.

टाईपरायटरने भारतीय सिनेमांवरही आपली छाप सोडली आहे. जुन्या सिनेमातले कोर्ट आठवा. कोर्टचं सेशन चालू असताना एक माणूस टाईपरायटर घेऊन बसलेला हमखास दिसायचा. गुरुदत्तच्या Mr and Mrs ’55 सिनेमात तर टाईपरायटर एक खास पात्र म्हणून समोर येतं. सिनेमात यास्मिन (विनिता भट) ही टायपिस्ट दाखवण्यात आली आहे. यास्मिन आणि जॉनी (जॉनी वॉकर) यांचातला हे रोमँटिक गाणं तर तुम्ही नक्कीच ऐकलं असणार.

गाण्याचीच गोष्ट निघाली आहे तर टाईपरायटरवर बनलेलं खास गाणं कसं विसरून चालेल. शशी कपूर यांच्या प्रसिद्ध ‘बॉम्बे टॉकी’ सिनेमात टाईपरायटरला समर्पित ‘टाईपरायटर टीप टीप’ हे गाणं होतं. हा पाहा त्याचा व्हिडीओ.

त्याकाळच्या गोदरेजच्या जाहिरातीचा मजकूरही बघण्यासारखा आहे. १९५० साली गोदरेजने आपल्या जाहिरातीत म्हटलं होतं, “Godrej presents The all-Indian Typewriter,”. आणखी एका जाहिरातीत “Today’s typewriter with the touch of tomorrow” हे वाक्य होतं. गोदरेजची टीव्हीवर येणारी ही जाहिरात जुन्याजाणत्या लोकांना नक्कीच नॉस्टॅल्जिक करेल.

कम्प्युटर आणि टाईपरायटरचा उतरता काळ

कम्प्युटरने टाईपरायटरच्या सुवर्णयुगाचा अंत केला. २००० पासून टाईपरायटरची जागा कम्प्युटरने घेतली. कम्प्युटरच्या लाटेने गोदरेज कंपनीला जबरदस्त धक्का दिला होता. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी तर होतीच, पण गोदरेज कंपनीच शेवटचा टाईपरायटर बनवणारी कंपनी पण ठरली.

गोदरेजने त्यांचा शेवटचा टाईपरायटर १२,००० रुपयांना विकला होता. २०११ साली त्यांचा मुंबईचा टाईपरायटर तयार करणारा कारखाना कायमचा बंद झाला. यावेळी ५०० टाईपरायटर कारखान्यात पडून होते. गोदरेजच्या पुण्याच्या कारखान्याची अशी दश झाली नाही. कारण हा कारखाना पुढे रेफ्रिजरेटर तयार करण्यासाठी नव्याने वापरण्यात आला.

गोदरेजने टाईपरायटर आता जुन्या जमान्याची आठवण बनली आहे हे वेळीच ओळखून एक वेगळी कल्पना शोधून काढली. त्यांनी आपल्या ६० जुन्या टाईपरायटर्सचं रुपांतर एका मोठ्या शिल्पात केलं आहे. हे पाहा ते शिल्प.

जर्मी मेयर या कॅलिफोर्नियाच्या प्रसिद्ध शिल्पकाराने गोदरेजसाठी हे शिल्प तयार केलंय. यासाठी वापरण्यात आलेले टाईपरायटर हे टाईपरायटरच्या इतिहासतील सर्वात शेवटचे टाईपरायटर्स आहेत. तयार केलेलं शिल्प हे मोठ्या कमळाच्या आकारातील आहे. हे कमळ सकाळी ९ वाजता खुलतं आणि संध्याकाळी काम संपण्याच्या वेळी मिटतं.

मंडळी, सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर आजही टाईपरायटर पूर्णपणे संपलेले नाहीत. काही ठराविक सरकारी क्षेत्रात काम मिळवण्यासाठी आजही टाईपिंगचा कोर्स आवश्यक असतो. याखेरीजही बरेच तरुण टाईपरायटर शिकून घेतात. ही संख्या कमी असली तरी शून्य झालेली नाही हे महत्वाचं.

जाताजाता गोदरेजने “गोदरेज प्राइमा”वर बनवलेली ही छोटीशी डोक्युमेंट्री बघायला विसरू नका.

तर मंडळी, गोदरेजच्या टाईपरायटरने अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या एका संपूर्ण पिढीचा इतिहास लिहिला.

सबस्क्राईब करा

* indicates required