computer

१ टन सोन्याची बुद्ध मूर्ती, गरीब कुलूपवाला आणि लोभी राष्ट्राध्यक्षाची गोष्ट!!

गुप्त खजिने कुणी कुठे दडवून ठेवले आहेत याच्या बातम्या सतत येत असतात. त्यांच्या मागे लागणारे लोकही कमी नसतात. टायटॅनिक बुडाले तिथे काही खजिना सापडेल म्हणून अनेकजण तिथे जाऊन आले. भारतातही काही गडकिल्ल्यांमध्ये लोक भिंती पाडून खजिने शोधत असतात. आजची गोष्ट ही अशाच एका खजिन्याबद्दलची आहे.

आजच्या या कहाणीचा हिरो आहे एक गरीब कुलूप - किल्लीवाला आणि व्हिलन आहे फिलीपाइन्सचा राष्ट्राध्यक्ष फर्डिनान्ड मार्कोस!  आणि गोष्ट आहे  'फिलीपाईन्समधल्या एक टन वजनाच्या सोन्याच्या बुध्दमूर्तीची'!!

कोण होता फर्डिनांड मार्कोस ?

(फर्डीनांड मार्कोस)

अनेक शतकं फिलीपाइन्स स्पेनच्या अंमलाखाली होता. १८९८ साली अमेरिकेने स्पेनचा पराभव केला आणि सत्ता काबीज केली. अमेरिकेचा जम बसेपर्यंत १९०७ साल उजाडलं. या १९०७ ते १९४७ दरम्यान फिलीपाइन्समध्ये झालेल्या राजकीय चळवळीतून १९४७ साली फिलीपाइन्सला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य तसं नावापुरतंच होतं. पडद्याआडून अमेरिकाच राज्य करत होती.

१९६५ साली अमेरीकेच्या गुप्त पाठींब्याने फर्डीनांड मार्कोस राष्ट्राध्यक्ष झाला. फर्डीनांड मार्कोस हा '१० टक्के पंतप्रधान' दर्जाचा नमुना होता. देशात हवे ते करा, पण मला १० टक्के पोहचवा या थाटात फिलीपाइन्सचा कारभार सुरु होता. अमेरिकेला याचे काहीच सोयरसुतक नव्हते. सीआयएच्या माध्यमातून अमेरिकेने मार्कोसला स्वतःच्या कह्यात ठेवले होते. सतत २१ वर्षं मार्कोसने जी लूटमार करून जवळजवळ १० बिलियन डॉलर्सची माया त्याने जमा केली. १९८६ साली जेव्हा कारभार हाताबाहेर जायला लागला, तेव्हा मार्कोस आणि त्याची बायको इमिल्डा मार्कोस यांनी देशातून पळ काढला आणि अमेरिकेने त्यांना हवाई बेटांवर आश्रय दिला.

(फर्डीनांड मार्कोस आणि इमिल्डा मार्कोस)

हवाईच्या हिकहॅमच्या लष्करी विमानतळावर जेव्हा हे जोडपं उतरलं तेव्हा त्यांनी सोबत आणलेल्या वस्तूंची यादी जवळजवळ २३ पानांची आहे. दोन c-1 41 विमानं भरून या जोडप्याने आपली लूट अमेरिकेत आणली.

२३ लाकडी खोके, १२ सुटकेस आणि इतर छोट्यामोठ्या बॉक्समध्ये भरून आणलेल्या खजिन्याची यादी वाचली तर २१ वर्षात देशाची लूट करण्यापलीकडे मार्कोसने दुसरे काहीच केले नाही असे लक्षात येते. मॉलमधल्या ६७ मांडण्या (racks) भरून जातील इतके उंची कपडे, ४१३ रत्नजडीत दागिने, येशू ख्रिस्ताचा चांदीचा चबुतऱ्यावरचा हस्तिदंती पुतळा, २४ सोन्याच्या विटा, २७ कोटी रोकड. 

आता तुमची ओळख करून देतो या कथेच्या हिरोशी. त्याचं नाव आहे रॉजेलीओ (रॉजर) रॉक्सस!

(रॉजेलीओ (रॉजर) रॉक्सस)

रॉजेलीओ हा फिलीपिनी सैन्यात सैनिक म्हणून काम करणारा एक तरुण होता. चाव्या आणि कुलूपं बनबवायचा त्याचा मूळ व्यवसाय होता. अतिशय कष्टाळू आणि हिमतीचा असा हा युवक होता. १९७० साली त्याची भेट एका सेवानिवृत्त जपानी सैनीकाच्या मुलाशी झाली. या मुलाने रॉजेलीओ रॉक्ससला फिलीपाइन्समध्ये दडवून ठेवलेल्या एका गुप्त खजिन्याची माहिती दिली. त्या काळी या खजिन्याची चर्चा जगभर होत होती. पण हा खजिना नेमका हूडकून काढण्यात कोणालाही यश मिळाले नव्हते. रॉजेलीओ (रॉजर) रॉक्ससला भेटलेल्या मित्राचे वडील ‘यामाशिता’साठी दुभाषा म्हणून काम करायचे. त्यातून त्याला हा खजिना कुठे असेल याची माहिती मिळाली होती.  आता हा यामाशिता कोण हे समजल्याशिवाय गोष्ट पुढे सरकणार नाही. 

यामाशिताचा खजीना :

(तोमोयुकी यामाशिता)

तोमोयुकी यामाशिता हा जपानी सैन्याचा अधिकारी  होता. त्याच्या धडाडीमुळे त्याचे दुसरे नाव टायगर ऑफ मलाया असेही होते. दुसऱ्या  महायुध्दाच्या काळात जपानी सैन्य आणि सरकारने पोसलेल्या काही गुन्हेगारी टोळ्यांनी आग्नेय आशियातील देशांची लूटमार करून प्रचंड मोठ्या प्रमाणात सोने जमा केले होते. सोन्यासोबत अनेक म्युझियमवर डल्ला मारून अनेक वस्तू हडपल्या होत्या. हा सगळा साठा सुरुवातीला सिंगापूरला जमा केला होता. त्यानंतर तो फिलिपाइन्समध्ये जमिनीखालच्या बोगद्यांमध्ये आणि गुहांमध्ये हलवला गेला.  युध्द संपल्यावर हळूहळू हे सगळे सोने जपानला परत जाणार होते, पण जपान युध्द हारल्यावर ही मिळकत कायमची गाडली गेली आणि फक्त अफवा पसरत राहिल्या.

जमिनीखालच्या या बोगद्यांचे जाळे इतके विस्तृत पसरले होते की यामाशिताचे सोने ही अफावाच आहे अशा बातम्या पसरायला लागल्या होत्या.ज्यांना या खजिन्याची माहिती होती त्यांची हत्या करण्यात आली. यामाशिताला युद्धकैदी म्हणून अमेरिकेत नेण्यात आले आणि त्याला मृत्युदंड देण्यात आला. पण खजिन्याचे रहस्य दिवसेंदिवस गडद होत गेले. या नंतरच्या काळात सीआयएने हा खजिना शोधून पाताळयंत्री कारवाया करण्यास वापरला अशाही अफवा पसरल्या होत्या. पण ह्या सगळ्याच अफवा होत्या, खरा खजिना लिहिला गेला होता रॉक्ससच्या नशिबात!

१९७० साली हातात असलेल्या नकाशाच्या जोरावर रॉक्ससने न्यायालयात अर्ज करून पियो मार्कोस या न्यायाधीशाकडून खजिना शोधण्याची परवानगी मिळवली. पुढची सात महिने दिवसरात्र मेहनत करून जमिनीखालचे बोगद्याचे जाळे शोध घेण्याचे कार्य सुरू झाले आणि तो दिवस उजाडला ! एक बोगदा शोधत असताना काही मानवी सापळे आणि शस्त्रे, जुन्या सामुराई तलवारी सापडल्या. आता हा मार्ग थेट यामाशिताच्या सोन्याकडे जाणार याची खात्री रॉक्ससला पटली. यानंतर थोड्याच दिवसात एक काँक्रीटने बंदिस्त बळद सापडले. सुरुंग लावून ते पडल्यावर सोन्याच्या विटा भरलेली एकावर एक रचलेली लाकडी खोक्याची चळत दिसली. ही खोकी दूर केल्यावर जे नजरेस आले त्यावर रोक्ससचाही विश्वास बसेना.

रोक्सस आणि त्याच्या टीम समोर होती, तीन फूट उंचीची, शुद्ध सोन्यातली गौतम बुद्धाची मूर्ती! जवळजवळ एक टन वजनाची मूर्ती आठ-दहाजणांनी रॉक्ससच्या घरी हलवली. या सोबत एक खोके उघडून त्यातल्या चोवीस सोन्याच्या विटाही घरी पोहचल्या. या मूर्तीचा नीट तपास केल्यावर एक आणखी गुपित उघडकीस आले. मूर्तीचे शीर वळवल्यावर ते वेगळे होऊन एक गुप्त कप्पा उघडला ज्यात मूठभर हिरे लपवलेले होते. यानंतर उर्वरीत खजीना ताबडतोब हलवण्याचे शक्य न झाल्याने त्यांनी हा रस्ता बुजवून टाकला. 

हे उत्खनन करण्यापूर्वी रॉक्ससने सरकारी परवानगी घेतली असल्याने लपवण्यासारखे काहीच नव्हते. त्याने ताबडतोब जज पियो मार्कोसला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. जज मार्कोस उपलब्ध नसल्याने रॉक्ससने हा खजिना विकून पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरु केले. एका वर्तमानपत्राच्या फोटोग्राफरला बोलावून त्याने या बुद्ध मूर्तीचे फोटो काढले. दरम्यान जो प्रचंड खर्च झाला होता तो निपटण्यासाठी त्यानी सोन्याच्या सात विटा विकून भांडवल उभे केले. काही तज्ञ मंडंळींना बोलावून ती मूर्ती शुध्द २२ कॅरट सोन्यात बनवली आहे याची खात्री त्याने करवून घेतली. अजूनही जज पियो मार्कोसचा संपर्क होत नव्हता.

रॉजर रॉक्ससला अजून बऱ्याच दुर्दैवाला सामोरे जायचे होते, पण ते त्याच्या लक्षात आले ५ एप्रिल १९७१ च्या मध्यरात्री. त्यादिवशी पाच सहा लष्करी अधिकारी त्याच्या घरात घुसले. या अधिकाऱ्यांनी रॉजरला सर्च वॉरंट दाखवले. त्यावर जज पियो मार्कोसची सही होती. घरातल्या सर्वांना जबरदस्त मारहाण करून हे लष्करी अधिकारी बुध्दाची मूर्ती, सोन्याच्या विटा, सामुराई तलवारी आणि बंदूका घेऊन निघुन गेले. सात आठ महिन्याच्या मेहनतीनंतर जे घबाड हाती लागले होते ते एका रात्रीत हातून निघून गेले.

रॉक्ससने या अन्यायाविरुध्द आवाज उठवला. तो कोर्टात गेला आणि जज पियो मार्कोसला त्याने या धाडीचा अर्थ विचारला. हा आदेश थेट राष्ट्राध्यक्ष फर्डीनांड मार्कोस यांनी दिल्याने आपण हे वॉरंट जारी केल्याचे जज पियो मार्कोसने कबूल केले. जास्त उठाठेव केली तर जीवाला धोका आहे असेही त्याला यावेळी सांगण्यात आले. रॉक्ससने लगेच अज्ञातवासात जाण्याचा निर्णय घेतला आणि तो दिसेनासा झाला. २९ एप्रिलला लष्करी अधिकाऱ्याने जप्त केलेली बुध्दाची मूर्ती कोर्टाच्या हवाली केल्याचे वृत्त समजल्यावर तो पुन्हा उगवला. मूर्ती बघितल्यावर त्याच्या लक्षात आले की कोर्टात जमा केलेली मूर्ती नकली प्रतिकृती आहे.

रॉक्ससला या दरम्यान काही माणसं भेटायला आली. कोर्टात जमा केलेली  मूर्ती खरी आहे असे निवेदन करण्यासाठी रॉक्ससला त्यांनी ५,००,००० डॉलर देऊ केले. रॉक्ससने असे काही करण्यास नकार दिला आणि तो पुन्हा नाहीसा झाला. महिन्याभरात लष्कराने त्याला हुडकून काढले आणि तुरुंगात डांबले. लष्करी अधिकाऱ्यांनी रॉक्ससचा छळ केला. त्याला रबरी दंडूक्यानी मारहाण केली. अंगावर सिगारेटचे चटके दिले.

हे सगळे घडत असताना फिलीपिनी जनतेला या प्रकरणाचा सुगावा लागला होता. जनतेत चर्चेला उधाण आले होते. लष्कराने घरावर टाकलेली धाड शांतातापूर्ण होती असे निवेदन रॉक्ससकडून लिहून घेण्यात आले. लष्कर हे विसरले होते की रॉक्ससचा मूळ व्यवसाय डुप्लिकेट चावी बनवण्याचा आहे. एक दिवस तुरुंगाचे कुलूप तोडून रॉक्सस पुन्हा पळाला. यानंतर १९७२ साली पुन्हा त्याची धरपकड करून तुरुंगात टाकण्यात आले. १९७४ साली त्याची सुटका करण्यात आली. यानंतर १२ वर्षं रॉक्ससअज्ञातवासात गेला.

१९८६ साली फिलीपाइन्समध्ये क्रांती झाली. फर्डीनांद मार्कोस आणि त्याची पत्नी इमेल्डा दोघही अमेरिकेच्या आश्रयाला गेले. रॉक्ससयाच संधीची वाट बघत होता. मार्कोसने ज्या अमेरीकन राज्यात म्हणजे हवाई बेटांवर आश्रय घेतला होता त्या कोर्टात मार्कोसवर दावा ठोकला. हा खटला अतिशय गुंतागुंतीचा होता. एक टन वजनाची मुर्ती अस्तित्वात होती अथवा नव्हती हे सिध्द करणे आवश्यक होते. ती मूर्ती रॉक्ससच्याच ताब्यात होती हे पण सिध्द करायचे होते. नशिबाने हे सर्व पुरावे रॉक्ससने स्वतः गोळा केले आणि कोर्टाची मान्यताही त्यांना मिळाली.

अनेक साक्षीदार ज्यांनी ही मुर्ती बघीतली होती ते लोकही साक्षीसाठी कोर्टात हजर झाले. बरीच वर्षे हा खटला चालला. त्यात अपीले झाली. कोर्टाने अनेक वेळा रिव्ह्यू घेतले. रॉक्सससाठी हा खटला चालवणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत गेले. त्याने त्याचे हक्क एका इन्व्हेस्टर कंपनीला विकले. आता हे सर्व हक्क 'गोल्डन बुध्दा' या कंपनीकडे हस्तांतरीत झाले. या सर्व प्रयत्नांना अखेरीस १९९६ साली यश मिळाले. कोर्टाने फर्डीनांड मार्कोसच्या संपत्तीतून २२ बिलीयन डॉलर वसूली करून 'गोल्डन बुध्दा'ला देण्याचे आदेश दिले.

रॉक्सस जिंकला पण दुर्दैवाने हा निर्णय येण्याआधीच वयाच्या ४९ व्या वर्षी त्याचे निधन झाले होते. आजच्या तारखेस ती बुध्दाची मूर्ती कुठे आहे याचा ठावठिकाणा कोणालाही माहिती नाही. या सोबत जमेची बाजू अशी की खटल्या दरम्यान जे साक्षीपुरावे झाले त्यात एक नविनच सत्य पुढे आले. रॉक्ससने शोधलेल्या मूर्तीसारख्या  आणखी अठरा मूर्ती अजूनही फिलीपाइन्सच्या जमिनीखाली दडलेल्या आहेत. 

सांस्कृतीक वारसा चोरीला जाण्याची ही एकच कहाणी नाही, आपल्या देशातूनसुध्दा अनेक प्राचीन वस्तू परदेशी गेल्या आहेत. सुभाष कपूर नावाच्या एका अमेरीकन नागरीकाने भारतातून चोरलेल्या नटराजाच्या मूर्तीची कहाणी पण वाचण्यासारखी आहे, ती बघू या पुढच्या आठवड्यात !!

सबस्क्राईब करा

* indicates required