आज कोणकोणत्या राज्यांत नवं वर्ष चालू होतंय माहित आहे का ??

मंडळी, भारतात विविधतेतून एकात्मता नांदते वगैरे आपण शाळेत शिकलो आहोतच. या आख्ख्या भारत देशात कितीतरी भाषा, संस्कृती, वेगवेगळे सण, रितीरिवाज.. सगळं कसं एकत्र सुखानं नांदत आहे. आपणही आपले आणि इतर राज्यांतले काही महत्त्वाचे सण साजरे करतोच की. तर, आज आम्ही विषय घेऊन आलो आहोत, भारतात वेगवेगळ्या राज्यांत नवीन वर्ष कसं साजरं केलं जातं.. 

सुरुवात करायचीच तर, उत्तर भारतातलं कॅलेंडर आपल्या कॅलेंडरच्या १५ दिवस पुढं पळतं. म्हणजे काय, आपला हिंदू महिना बदलतो अमावस्येला, तर त्यांचा बदलतो पौर्णिमेला. त्यामुळं आपल्या आधी उत्तर भारतातलं नवीन वर्ष होळीलाच चालू होतं. 

आता महाराष्ट्राच्या उत्तरेला होळी कशी साजरी केली जाते ही काय सांगायची गोष्ट आहे का राव?? रंग, भांगमिश्रित दूध, थंडाई, मालपुए.. या सगळ्यांच्या साथीनं वेगळ्याच रंगात आणि ढंगात हे नवीन वर्षाचं आगमन साजरं केलं जातं.  

स्रोत

आता येऊयात आपल्या महाराष्ट्राकडे. आपण भारताच्या नकाशात कसे मध्येच येऊन बसलो आहोत. उत्तर भारतीय कधी तुम्हांला सौदिंडियन समजले, आणि कधी सौदिंडियन लोक तुम्हांला नॉर्थिंडियन समजले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका भौ !! 

तर, हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते, आणि चैत्र महिन्याची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. अगदी संस्कृतातच शिरायचं तर,  चैत्र शुक्ल प्रतिपदेचं संस्कृत नाव गुढीपाडवा!! (आता लगेच "नीट बोल गाढवा" म्हणू नका बरं..)  आणि अर्थातच गुढीपाडव्याला गुढ्या उभारुन आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो. 

या गुढीसोबत गोड गाठी, कडुशार कडुनिंब, भिजलेली हरबऱ्याची डाळ, थोडा गूळ असं सगळं खाऊन आपण येणाऱ्या वर्षातल्या कडू-गोड अशा सगळ्या गोष्टींना सामोरं जायला सिद्ध होतो. 

स्रोत

आता ही गुढी का आणि कशी उभारायची याच्या आपल्याकडे ढीगभर कथा आहेत. 

एका दंतकथेनुसार, गुढी रामाच्या विजयाचं आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला परतण्यामुळे झालेल्या आनंदाचं प्रतिक आहे. (गुगल मॅपवरुन श्रीलंका ते अयोध्या चालायला जितके दिवस लागतात तितक्याच दिवसांचं अंतर दसरा आणि पाडव्यात असल्याचं व्हॉट्सॲप फॉरवर्ड आठवत असेलच तुम्हांला.)  चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून आल्यानंतर रामाचा राज्याभिषेक झाला आणि तेव्हापासून हा सण साजरा केला जातो.

उगादी (स्रोत)

बरं.. गुढीपाडवा हा काही फक्त महाराष्ट्रात साजरा केला जात नाही बरं.. आपल्यासोबत कर्नाटक,  केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा इथंही नवीन वर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा  साजरा करतात. हां, पण प्रत्येक राज्याचं या सणाला वेगळंच नांव आहे बरं.. कोंकणी लोक याला ‘संवत्सर पाडवो’ असं म्हणतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात म्हणतात  ‘युगादी', तर . कर्नाटकात उगादी !! 

चक्क काश्मीरमध्येही याच दिवशी नवीन वर्ष चालू होतं.  तिथं या सणाचं नांव आहे- ‘नवरेह’!! एवढंच काय, सिंधी लोक ही हा सण ‘चेटीचंद’ नावानं साजरा करतात. आहे की नाही गंमत!! 

पण काही असो, आपल्या महाराष्ट्रात जशी पारंपारिक वेषात स्कूटर आणि बाईकवरुन प्रभात फेरी काढतात, तसा प्रकार इतर कुठंच होत नाही.. गुढीची पूजा, मग सकाळी मस्तपैकी या फेरीत मिरवून आल्यावर दुपारी श्रीखंड-पुरी,  पुरणपोळीचा किंवा खीरीचा बेत असायलाच पाहिजे. हो की नाही ? 

स्रोत

उद्योगधंद्यावर जास्त भिस्त असणाऱ्या आपल्या गुजरातेतल्या बेन आणि भाईंचं नवीन वर्ष चालू होतं बळीपाडव्याला. लक्ष्मीपूजनादिवशी नव्या चोपड्यांची पूजा करून, फटाके वाजवून आदल्या वर्षाची संध्याकाळ साजरी केली जाते आणि मग चालू होतं त्यांचं नवीन वर्ष !

केरळ आणि तमिळनाडूमध्ये नवीन वर्ष चालू होतं 'विषु' या सणाच्या दिवशी. मल्याळममधल्या मेष नावाच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा करतात. हा सण साजरा करण्याची त्यांची पद्धतही लै भारी आहे. तर 'विषु'च्या दिवशी होणाऱ्या 'विषुक्कणी'ला म्हणजेच-त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा कोणती गोष्ट पाहाल याला खूप महत्त्व असतं. त्या वस्तूचा प्रभाव पुढचं वर्षभर राहातो असंही ते मानतात. मग ते करतात काय, तर आदल्या संध्याकाळी 'कणीदर्शन'चं सामान म्हणजेच, एखाद्या भांड्यात भरुन तांदूळ, नवे कपडे, भाज्या, फळं, फुलं, पानसुपारी असं सगळं सजवून ठेवतात आणि सकाळी घरातलं मोठं माणूस इतरांचे डोळे झाकून तिथं नेऊन त्यांना कणीदर्शन करवतात. 

स्रोत

आहे ना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांत नवीन वर्षं साजरं करण्याची एक वेगळीच पद्धत. असो.. आज आपलं नवीन वर्ष चालू होत आहे. तेव्हा बोभाटातर्फे सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

लेखिका : सुप्रिया सुतार

सबस्क्राईब करा

* indicates required