computer

एक बिबट्या 1500 माणसं, हिंस्त्र कोण? माणूस कि बिबट्या?

तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी अचानक बिबट्या शिरला तर तुम्ही काय कराल? एकच गोंधळ उडेल ना? प्रत्येक जण आपला जीव वाचवायचा प्रयत्न करेल हे मान्य, पण म्हणून माणसाने त्या प्राण्याच्या जीवावर उठायचं?

 मानव आणि प्राणी संघर्ष आपल्याला नवीन नाही. दिवसेंदिवस वाढणारी मानवी वस्ती आणि वाऱ्याच्या वेगानं उभं राहणारं मोठमोठ्या टॉवरचं जंगल यातून जंगली प्राणी शहरात किंवा गावात शिरल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानावर येतात.  पण मग पुढे जे होतं, ते माणूस आणि प्राणीमात्र या दोघांच्याही हिताचं नसतं..

 

अशाच एका मानव-प्राणी संघर्षात एका बिबट्याला जीव गमवावा लागल्याची घटना काल २४ नोव्हेंबरला घडली.  गुरगाव इथल्या मांडवार गावात  एक बिबट्या शिरला. सकाळी एका गावकऱ्यानं बिबट्याला खाटेखाली लपलेलं बघितलं, हा-हा म्हणता म्हणता पूर्ण गावभर बातमी पसरली आणि गावात एकच गोंधळ उडाला.

आपला जीव बिबट्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे उपाय करू लागले. काहीजणांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं तर काही लोक हातात कुर्‍हाड आणि काठ्या घेऊन बाहेर पडू लागले. म्हणता म्हणता बाजूच्या सुक्रोली व इतर गावातील असे जवळपास १५०० लोक जमले. 

 गर्दी पाहून भांबावलेल्या बिबट्यावर त्यांनी काठ्या,दगड आणि कुऱ्हाडीने अमानुषपणे हल्ला केला.

जवळपास ३ तास चाललेल्या ह्या थैमानाचा शेवट बिबट्याचा मृत्यू होण्यात झाला. यात  एका पोलीस कर्मचाऱ्यासहित आणखी नऊजण जखमी झाले.

बिबट्याचा मृत्यू कमी होता म्हणून कि काय म्हणून बिबट्याच्या मृत्यूनंतरही काही निष्ठूर लोकांनी बिबट्याला काठीनं आणि कुऱ्हाडीने मारणं चालूच ठेवलं. हे सगळं होत असताना तिथं पोलिस आणि वनसंरक्षण दलाचे लोकही हजर होते. 

ह्या सर्व प्रकारानंतर एका अधिकाऱ्याने सांगितले " जो कोणी बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत असेल त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. "  सध्या  तीन डॉक्टरांची एक समिती बिबट्याच्या पोस्टमॉर्टेमसाठी निवडण्यात आली आहे.
 

वाढत्या लोकवस्तीमुळं वन्य क्षेत्रावर होणारे अतिक्रमण हे मानव आणि प्राणी संघर्षाचे मुख्य कारण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या प्रकरणात लोकांचा अतिउत्साह बिबट्याचा जीव जाण्यास कारणीभूत ठरला. 

सबस्क्राईब करा

* indicates required