computer

गोष्ट ब्रिटिशांची आणि त्यांच्या पंखेवाल्यांची. या कामासाठी लोक कसे निवडले जायचे माहित आहे?

ब्रिटिश जेव्हा आपल्या देशात आले तेव्हा सुरुवातीला त्यांना इथे जुळवून घेणं फार जड गेलं. त्यांना अनेक प्रतिकूल गोष्टींचा सामना करायचा होता. इथलं तुलनेनं उष्ण हवामान, रक्त शोषणारे डास, एकंदर मसालेदार या कॅटेगरीत येणारं भारतीय जेवण, प्रदेशागणिक बदलणारी भाषा सगळंच त्यांच्यासाठी अनोखं आणि नवीन होतं. हळूहळू त्यांनी या गोष्टींशी जुळवून घ्यायला सुरुवात केली, पण एक गोष्ट त्यांच्या आवाक्याबाहेर होती, ती म्हणजे इथला असह्य उकाडा.

आपल्याकडे साधारणतः एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान उन्हाळा असतो. पण हे संपूर्ण देशभरात सगळ्या ठिकाणी सारखं नाही. पावसाळा सुरू होण्याचा काळ आणि उन्हाळ्याची लांबी प्रदेशानुरूप बदलते. काही ठिकाणी हिवाळ्यातपण पाऊस पडतो. एक मात्र खरं, पावसाचं प्रमाण प्रमाण कमी झालं की उकाडा वाढतो आणि असह्य होतो. आपल्या हुशार पूर्वजांनी अर्थातच त्यावर अनेक उपाय शोधून काढलेले आहेत.

पूर्वी जेव्हा वीज सर्वदूर पोहोचलेली नव्हती तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांत लोक हमखास घराबाहेर झोपत. सहसा उघड्यावर किंवा एखाद्या झाडाखाली, किंवा गच्चीत, व्हरांड्यामध्ये मस्तपैकी खाट टाकून किंवा गाद्या घालून झोपणं सर्वसामान्य होतं. घरात उकाड्याने जीव हैराण होत असताना गार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत झोपण्याचा आनंद काही औरच असायचा. बाहेर विशेष वारा नसला तरी हातात वारा घ्यायला पंखा असला की बस. गरज भागायची.

हे झाले सर्वसामान्यांचे उपाय. मात्र श्रीमंत लोकांकडे पंखे किंवा सीलिंग फॅन्स असायचे. एका लांब दोरीच्या मदतीने ते छताला टांगलेले असायचे. हा पंखा आयताकार असायचा. वेत किंवा लाकडी चौकटीत कापड बसवून हे पंखे तयार केले जात. ही दोरी कप्पीच्या साहाय्याने ओढली जाई. या कामासाठी एक खास नोकर म्हणजे पंखावाला नेमलेला असे. पंख्याच्या विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध हालचालीमुळे हवेची एक मंद झुळूक निर्माण व्हायची ज्यामुळे ब्रिटिश अंमलदार आणि श्रीमंत भारतीय सुखेनैव झोपू शकत.

अर्थात ही चैन सगळीकडेच परवडायची नाही. प्रासादतुल्य घरं, सरकारी बंगले आणि कार्यालयं अशाच ठिकाणी ही सोय उपलब्ध होती. अशा भव्य घराच्या प्रत्येक खोलीत असा एक पंखा असे आणि तो चालू ठेवण्यासाठी किमान दोन माणसं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना साहेबांचा नोकर पंखावाल्याला पंख्याची कुठली दोरी खेचायची याबद्दल सूचना द्यायचा, जेणेकरून साहेब जिथे असतील तिथे त्यांच्या आजूबाजूला कायम पंख्याचं वारं आणि खेळती हवा मिळत असे. त्यामुळे दिवसभर घरातला कुठला ना कुठला पंखा सुरूच असायचा.

पंखावाला बहुधा खोलीच्या एका कोपऱ्यात बसून दोरी ओढत पंखा हलवण्याचं एकसुरी काम करत असे. साहजिकच जिथे मालक तिथे हा गडी असायचा. त्यातही एक गोची होती. तो इतका जवळ, अक्षरशः हाकेच्या अंतरावर असायचा; त्यामुळे अनेकांचं खासगीपण धोक्यात यायचं. त्यातून ब्रिटिशांना या खासगीपणाचं कोण कौतुक! मग त्यांनी यावर एक उपाय शोधून काढला : ऐकू कमी येणाऱ्या किंवा कर्णबधिर लोकांना या जागेवर नेमणं. अगदी हे शक्यच नसेल तर पंखावाल्याला शेजारच्या खोलीत भिंतीपलीकडे बसवलं जायचं आणि छत आणि भिंत यांच्यामधल्या छोट्या फटीतून किंवा तिथे छोटं भोक ठेवून त्यातून पंख्याची दोरी ओवली जाई.

पंखावाल्याचं काम कठीण नसलं तरी कंटाळवाणं, रटाळ नक्कीच होतं. त्यातून चक्क त्यांना कामावर असताना झोप लागल्याचीही उदाहरणं आहेत. हे लोक समाजातल्या निम्न स्तरातले असत. या कामासाठी त्यांना अतिशय क्षुल्लक मोबदला मिळायचा. पण तरीही हे लोक त्या काळच्या समाजव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक होते, हे नक्की.

हळूहळू विजेच्या आगमनाबरोबर आणि विजेवर चालणाऱ्या पंख्याचा शोध लागल्यावर पंखावाल्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिह्न निर्माण झालं. त्यांना आपलं उपजीविकेचं साधन गमावण्याची चिंता सतावू लागली. हे कधीतरी होणारच होतं. यंत्रामुळे माणसं बेरोजगार झाल्याची अनेक उदाहरणं इतिहासात आणि वर्तमानात दिसतात, हे त्यातलंच एक.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required