computer

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अन्नात झिंक हवं...पण कोणकोणत्या पदार्थातून झिंक मिळतं?

आजकाल फेसबुक उघडले की बऱ्याच घरगुती पौष्टिक जेवण मिळेल अशा खूप पोस्ट्स दिसतात. बरोबरच आहे म्हणा, सध्याच्या ह्या पँडेमिक मुळे एक झाले आहे, की आपण आहाराबाबत जागरूक झालो आहोत. आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याकडे सगळे लक्ष देऊन आहेत. आज अशाच एका महत्वाच्या प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या खनिजा (मिनरल्स) बाबत जाणून घेऊ. हे खनिज म्हणजे जस्त अर्थात झिंक zinc.

झिंक आपल्या चयापचय कार्यास मदत करते. जखमेच्या उपचारांसाठी त्या लवकर भरून येण्यासाठी तसेच आपली जिभेची चव आणि गंधाची क्षमता ठीक करण्यासाठी झिंक महत्वाचे आहे. झिंक आपल्या त्वचेसाठी पण खूप गरजेच आहे. ते त्वचेला उष्मा, थंडी, बॅक्टेरीया आणि विषाणूंपासून संरक्षण देते. बऱ्याचशा त्वचेच्या मलमांमध्ये याचा वापर केलेला आढळतो. वयोमानाने कमजोर होणाऱ्या दृष्टीसाठी सुद्धा योग्य प्रमाणात झिंक आहारात असणे गरजेचे आहे. ज्या पुरुषांच्या शरीरात झिंक पातळी कमी असते अशा पुरुषांमध्ये प्रजनन आणि लैंगिक आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

झिंक योग्य प्रमाणात आहारात घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात प्रौढ महिलांमध्ये 8mg तर पुरुषांना 11mg झिंक पुरेसे आहे. चला तर पाहूया, योग्य झिंक कोणत्या पदार्थांमधून मिळते.

१) मासे :

सगळ्यात जास्त  झिंक हे ऑयस्टर (कालवं, शिंपले) / खेकडे म्हणजेच कवच असलेल्या जलचरात मिळते. आपल्या शारीरिक आवश्यकतेपेक्षा ५ पट झिंक या खाद्यतून मिळते. 
जवळजवळ सगळ्याच समुद्री माशांमधून झिंक ची शरीराला असणारी गरज पूर्ण होऊ शकते.

२) चिकन - मटण :

रेड मीट अर्थात मटण आणि चिकन मध्ये पण झिंक चांगल्या प्रकारे उपलब्ध असते, पण हे पदार्थ चरबीयुक्त असल्याने प्रकृती प्रमाणे घेणे आवश्यक आहे.

३) काजू आणि बिया :

ह्यात पहिला नंबर लागतो सूर्यफूल बियांचा आणि जवस बियांचा. काजू व इतर सुका मेवा जसे की बदाम, अक्रोड, जर्दाळू शेंगदाणे ह्यामधून पण झिंक चांगल्या प्रमाणात मिळते.

४) राजगीरा :

राजगिरा हा प्रथिने, फायबर, जस्त आणि लोहाचा ग्लूटेन-मुक्त स्त्रोत आहे. याखेरीज राजगिऱ्याच्या वापरणे जळजळ कमी होणे, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होणे आणि वजन कमी होणे यासह अनेक फायदे मिळतात. 

५) भाज्या :

लसणामध्ये  झिंक ची मात्रा जास्त असते. याखेरीज पालक, बीट, मटार यामध्ये पण काही प्रमाणात झिंक मिळते. मशरूम, डाळींब, किवी, पेरू यातही काही प्रमाणात झिंक मिळते.

६) अंडी :

संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे। अंड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात झिंक असते. शिवाय अंडीमध्ये व्हिटॅमिन बी, प्रथिने, सेलेनियम सारखे इतरही अनेक पोषक घटक असतात..

 

आता एक महत्त्वाची सूचना: 

झिंक हे नेहमी योग्य प्रमाणातच आहारामध्ये ठेवणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरावर दुष्परिणाम होतो. यामध्ये पोट दुखणे, जुलाब होणे, डोकेदुखी सारखे त्रास होऊ शकतात.

चला तर मग "योग्य आहार + योग्य प्रमाण + योग्य वेळ  = चांगली रोगप्रतिकारक शक्ती"  हे समीकरण लक्षात ठेवूया.

 

लेखिका: रचना काणे

सबस्क्राईब करा

* indicates required