माय लेकराची अग्नी परीक्षा : जाणून घ्या या व्हायरल फोटो मागील विदारक सत्य !!

पळणारी हत्तीण आणि तिच्या पिल्लाच्या फोटोने सगळीकडे खळबळ माजवली आहे. यात दोन्ही हत्तींना आग लागलेली दिसत आहे. आग लागल्याने ते लहान पिल्लू ओरडताना दिसतंय. हे भयानक दृश्य आपल्या कॅमेराने टिपलंय ‘विप्लव हाजरा’ या फोटोग्राफरने !! या फोटोला “२०१७ सेन्चुरी वाइल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ दि यिअर” पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरणाशी निगडीत “सेन्चुरी नेचर फाउंडेशन” दर वर्षी हा पुरस्कार वाइल्ड लाईफ फोटोग्राफीला देतं.
विप्लवने या फोटोला “हेल इज हिअर” नाव दिलंय. मंडळी निसर्ग आणि माणूस यांच्यात बिघडत जाणारी परिस्थितीच हा फोटो दाखवून जातो. पश्चिम बंगाल मधील ‘बांकुरा’ जिल्हातील शेतकरी आपल्या शेतात शिरणाऱ्या हत्तींवर फटाके आणि आगीचे गोळे फेकतात. या फोटो मध्ये सुद्धा माणसं हत्तींवर आगीचे गोळे फेकून पळताना दिसतायत.
इथे हत्ती आणि स्थानिक लोकांमध्ये अश्या चकमकी नेहमी होतात. पूर्वी फटाके फोडून त्यांना पळवल जायचं, आता जळतं डांबर टाकून त्यांचा कायमचा नयनाट करण्याची पद्धत वापरली जात आहे. भारतात एकूण ३०,००० हत्तींची संख्या आहे. जगातील ७०% हत्ती हे भारतात आढळतात. त्यातील ८०० हत्ती पश्चिम बंगाल मध्ये आहेत. याच प्रकारे कत्तल सुरु राहिली तर ही संख्या बोटावर मोजण्या इतकी होण्यास वेळ लागणार नाही.
मंडळी एका बाजूने बघितलं तर शेतकऱ्यांची बाजू पटू शकते कारण त्याचं उभं पिक हे हत्ती नष्ट करतात. पण माणूस हे विसरत चालला आहे की हत्ती त्यांच्याच हद्दीत आहेत उलट आपण त्यांच्या जागेत धुडगूस घालतोय.
विप्लव हाजराने सांगितल्या प्रमाणे हे पिल्लू आगीपासून कसेबसे बचावले आहे. पण तरी हा फोटो नक्कीच विचार करायला भाग पाडतो !!