५५ लाख हेक्टर जमीन, १३०० घरं आणि ५० कोटी प्राण्यांचा घास घेणाऱ्या ऑस्ट्रेलियातल्या आगीची गोष्ट नक्की काय आहे?

अमेझॉनच्या जंगलात लागलेली आग विझते न विझते तोच ऑस्ट्रेलियाच्या आगीची बातमी आली. दोन्हीकडच्या घटनांमध्ये एक मुख्य फरक असा की अमेझॉनची आग ही माणसाने लावली होती, पण ऑस्ट्रेलियाची आग ही निसर्गाच्या प्रकोपाचा परिणाम आहे. आज आपण ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीबद्द्ल जाणून घेणार आहोत.
ऑस्ट्रेलियातील आगीमुळे तिथली ५५ लाख हेक्टर जागा जाळून राख झाली आहे. तब्बल ४४० घरांचं नुकसान झालं आहे तर १३०० घरं जळाली आहेत. १७ ते २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. प्राण्यांच्या मृत्यूची संख्या ही जवळजवळ ५० कोटी एवढी आहे. ही आग लागली कशी ते आता जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियात सध्या दुष्काळ पडला आहे आणि उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. १२० वर्षातील सर्वात कोरडा वसंत ऋतू म्हणून याची नोंद झाली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून कोरड्या हवामानात प्रचंड वाढ झाली आहे. डिसेंबरच्या मध्यात तर ऑस्ट्रेलियाच्या इतिहासतील सर्वात उष्ण तापमानाची नोंद झाली होती. रोजचं सरासरी तापमान ४१.९ डिग्री एवढं प्रचंड असायचं.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स आणि क्वीन्सलँड भागात २०१७ पासून पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. कोरडं तापमान आणि पावसाच्या कमतरतेमुळे वणव्यासाठी योग्य वातावरण निर्माण झालं. आधीच वाळलेल्या झाडं-झुडपांमुळे आगीला इंधन मिळत गेलं. वेगवान वाऱ्यांमुळे आग पसरण्याचा वेग वाढला. ३१ डिसेंबर रोजी वाऱ्याची गती ही तशी ९६ किलोमीटर एवढी होती.

(भाजलेल्या कोआला प्राण्यावर पोर्ट मक्वारी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना)
(कपड्यांच्या आत आगीतून सुखरूप वाचलेली वटवाघुळे आहेत)
(तारांमध्ये अडकून आगीत जळालेला कांगारू)
(भाजलेल्या कोआला प्राण्याचे पाय)
हे हवामानतील बदलामुळे होत आहे का ?
ऑस्ट्रेलियात अधूनमधून वणवा पेटतच असतो. वर नमूद केल्याप्रमाणे कोरड्या हवामानामुळे हे घडून येत. हवामान बदल हे एक महत्त्वाचं कारण असलं तरी ते एकमेव कारण म्हणता येणार नाही. तज्ञांच्या मते ऑस्ट्रेलियाचं तापमान १९२० पासून १ पेक्षा जास्त डिग्रीने वाढत आहे. १९५० पासून हा वेग वाढला आहे.
आग विझवण्यासाठी काय केलं जात आहे.

लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तब्बल ३००० जवान तैनात करण्यात आले आहेत. याखेरीज काही हजार अग्निशामक दलाचे जवान दिवसरात्र काम करत आहेत. मदतीला कॅनेडा आणि इतर देशातून अग्निशामक दलाचे जवानांना पाचारण करण्यात आलंय. सध्याच्या परिस्थितीवरून एवढंच म्हणता येईल की आग संपूर्णपणे आटोक्यात यायला महिने लागू शकतात.
ऑस्ट्रेलियाची आग आटोक्यात येईलही पण त्यामुळे झालेलं नुकसान भरून काढायला अनेक वर्ष जाणार हे मात्र नक्की. हे नुकसान संपूर्ण जगाचं आहे. अमेझॉनच्या आगी इतकीच ही घटना महत्त्वाची आहे.