computer

मुंबईच्या गजबजलेल्या भागात जपानी मंदिर आहे हे तुम्हाला नक्कीच माहित नसेल !!

मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी शांत जागा मिळणे थोडं कठीणच आहे, पण शोध घेतला तर इतर कुठेही मिळणार नाही एवढी शांत जागा मुंबईत मिळेल अशाच एका अज्ञात जागेविषयी आज आम्ही तुम्हा सांगणार आहोत.

आम्ही बोलत आहोत वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलच्या समोर असलेल्या जपानी मंदिराबद्दल. वरळीकर या मंदिराला नक्कीच ओळखून असतील, पण मुंबईच्या इतर भागातल्या आणि मुंबई बाहेरच्या लोकांना याबद्दल क्वचितच माहित असेल.

हे एक बौद्ध मंदिर आहे. जपानी बौद्ध भिख्खू निचीदात्सू फुजी यांनी १९३० साली हे मंदिर बांधलं.ते महात्मा गांधींचे मित्र होते. गांधीजींच्या अहिंसावादी स्वातंत्र्य लढ्यात फुजी यांचा सहभाग होता.

१९५६ साली ही जागा बिर्ला यांच्या ताब्यात गेली. मुळातल्या मठाच्या जागी त्यांनी मंदिराची उभारणी केली. आज आपण जे मंदिर पाहतो ते १९५६ सालचं आहे. मंदिराचं नाव आहे ‘निप्पोन्झान मायोहोजी बौद्ध मंदिर’

मंदिरात दररोज सकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान प्रार्थना केली जाते. बाहेरच्या धावत्या जगातून ब्रेक घ्यायचा असेल तर हे मंदिर अगदी योग्य आहे. मंदिराच्या आत आल्यानंतर तुम्हाला हे लगेच जाणवेल. मंदिर अगदी साध्या धाटणीचं आणि स्वच्छ आहे. भिंतीवर बुद्धाचं चरित्र दर्शवणारी चित्रं लावण्यात आलेली आहेत.प्रार्थनेच्यावेळी वापरण्यात येणारे ड्रम्सही तुम्ही पाहू शकता. जर तुमची इच्छा असेल तर मंदिराची व्यवस्था पाहणारे भिख्खू तुम्हाला मंदिराची माहिती सांगू शकतात.

प्रत्येक शहरात काही मुख्य आकर्षणाची ठिकाणं असतात. पण त्यापेक्षा बरंच काही त्या शहरात दडलेलं असतं. वरळीतलं हे बौद्ध मंदिर मुंबईच्या अनेक दुर्लक्षित ठिकाणांपैकी एक आहे. एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर या मंदिराला भेट नक्कीच द्या.

 

पत्ता : पोद्दार हॉस्पिटलच्या समोर, अ‍ॅनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई - 400018