computer

गांधीजींचा 'गावाकडे चला'हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणणार्‍या नौशाद्या आणि सुधाकर यांची ही जीवनशैली म्हणजेच आपली खरी संस्कृती आहे.

शहरी जीवन म्हणजे नुसती धावपळ आणि दगदग! अनेकांना शहर सोडून गावात राहायला जाण्याची इच्छा असते पण शहरातील रोजीरोटीसोडून गावात जाऊन करणार काय, मुले मोठी झाली, त्यांची लग्न झाली की मग बघू असा विचार करून आहे तेच आयुष्य ढकलत राहतात. पण, जर खरंच निसर्गाच्या कुशीत आणि निसर्गानुकुल राहण्याची तीव्र इच्छा असेल तर, आजच्या युगातही गावात राहणे खूप सोपे आहे, हे बेंगळूरूच्या एका उच्चशिक्षित जोडप्याने सिद्ध करून दाखवले आहे.

तामिळनाडूच्या नौशाद्या आणि सुधाकर यांच्या बदलाची ही कथा कदाचित तुमच्या मनातील आयुष्य जगण्याची प्रेरणा देऊन जाईल. सुधाकरचे बालपण मुंबईत गेले तर नौशाद्याचे चेन्नई-बेंगळूरू सारख्या महानगरात. बालपणापासून महानगरात जीवन काढलेल्या दोघांनीही फक्त काही तरी बदल म्हणून गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याच्या या निर्णयामागेही एक इतिहास आहे. अगदी विचारविमर्श करूनच दोघांनीही साधीसरळ ग्रामीण जीवनशैली अंगिकारली आहे.

खरे तर आता खेडीही पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. जागतिकीकरणाच्या रेट्यात खेड्यांचा तोंडावळाही बदलून गेला आहे. पूर्वीची मातीची घरे जाऊन त्याठिकाणी सिमेंटचे ऐसपैस बंगले उभारले आहेत. शेतीतही ट्रॅक्टर, रोटर, मळणीयंत्र, अशा यंत्रांचा आणि रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. सुधाकर आणि नौशाद्याने स्वीकारलेले ग्रामीण जीवन मात्र अगदी याच्या उलट आहे. आपल्याकडून निसर्गाला हानी पोहोचेल अशी एकही कृती होणार नाही अशी त्या दोघांनी शपथच घेतली आहे. पण तुम्हाल प्रश्न पडलाच असेल की, या दोघांकडे निसर्गाबद्दल इतकी तळमळ आणि जाणीव आली कुठून?

तर मंडळी नौशाद्या आणि सुधाकर पूर्वी विवध सामाजिक संघटनांसाठी काम करत होते. या संघटना पर्यावरणापासून विविध सामाजिक प्रश्नांवर काम करत होत्या. अशा सामाजिक संघटनांसोबत काम करत असतानाच त्यांना आपल्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाला किती हानी पोहोचते आणि त्याचे परिणाम किती सर्वदूर आहेत याची जाणीव झाली आणि याच जाणीवेतून ते पर्यावरणाशी कटिबद्ध राहण्यास प्रवृत्त झाले.

इतकी वर्षे महानगरीय जीवनशैली जगल्यानंतर एकदम साधेसुधे राहणीमान आपल्याला मानवेल का याबद्दल दोघांनाही सांशकता होती. यासाठी प्रयोग म्हणून त्यांनी सुधाकरच्या ओळखीतील एका सहकाऱ्याची शेतजमीन करायला घेतली. तामिळनाडूतील ऑरोविल गावात त्यांनी हा प्रयोग करून पहिला. तिथल्या शेतात तीन महिने राहिल्यानंतर साधे राहणीमान म्हणजे काही दिव्य नसून उलट मानसिक शांतीचा स्त्रोत आहे हे त्यांना कळून चुकले आणि मग त्यांनी स्वतःचीच शेतजमीन खरेदी करून तिथे राहण्याचा निर्णय घेतला. महत्वाचे म्हणजे असे जीवन किती आत्मनिर्भर असते याचीही त्यांना खात्री पटली होती. तीन महिन्यातच नौशाद्याला याचा इतका लळा लागला की इथून पुढे असेच गावाकडे राहू हे तिने पक्के ठरवले.

२०१८ मध्ये लग्न केल्यानंतर त्याच वर्षी त्यांनी तिरुनेलवेली जिल्ह्यातील एका खेडेगावात अकरा एकर शेती खरेदी केली. हे गाव म्हणजे सुधाकरचे मूळ गाव पण मुंबईत वाढल्याने त्याने यापूर्वी आपला गाव कधी बघितलाच नव्हता. तेव्हापासून हे जोडपे याच शेतावर आपले छोटेसे मातीचे घर बांधून राहत आहे. हो, हो मातीचे घर! त्यांनी आपले घर बांधतानाही पर्यावरण पूरक घर बांधले आहे. यासाठी माती, उनात पोळलेल्या विटा, चुना आणि शेण असे नैसर्गिक घटक वापरूनच घर बांधले आहे. घरासाठी लागणाऱ्या बहुंताश वस्तू त्यांनी जुन्याच म्हणजे आधी वापरलेल्या घेतल्या आहेत. घराचा पाया तयार करतानाही त्यांनी दगड आणि चुना यांचाच वापर केला आहे.

त्यांच्या घराचे छत हे अगदी जुन्या पद्धतीच्या मद्रास टेरेस पद्धतीने बनवण्यात आले आहे. हे टेरेस बनवताना लाकडी चौकट वापरली जाते आणि त्यात मातीच्या विटा आणि चुना भरूनच छत बनवले जाते. पावसापासून या छताचे आणि घराच्या भिंतीचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांनी नारळाच्या झावळ्यांनी छत शाकारून घेतले आहे. घरातील जमिनीसाठीही त्यांनी मातीपासून बनवलेल्या फारशाच वापरल्या आहेत फक्त त्या जोडताना सिमेंटचा वापर केला आहे.

भिंतीचे प्लास्टर करण्यासाठी त्यांनी माती, चुना आणि शेणाचा वापर केला आहे. घराला रंग देण्यासाठीही त्यांनी पेंट किंवा पुट्टीचा वापर केलेला नाही. घराच्या भिंती चुन्यानेच रंगवल्या आहेत.

अशा प्रकारचे घर उभारताना त्यांनी स्वतः प्रशिक्षण घेतले आणि ज्या गवंड्याकडून हे बांधकाम करवून घेतले त्यांनाही प्रशिक्षण दिले. या घरात वीज कनेक्शनही नाही हे संपूर्ण घर सौर उर्जेवर चालते. उन्हाळ्यातही हे घर थंड राहते त्यामुळे त्यांना एसीची गरज लागत नाही.

घरातील सांडपाणी त्यांनी थेट शेतात सोडले आहे. त्यांच्या घराच्या सांडपाण्यावरच त्यांची शेती पिकते. शेतीतही त्यांनी एक-पिक पद्धती न वापरता मल्टी-लेयर्ड पेरणी केली आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक पिके घेऊ शकतात. वर्षातून एकदा तांदूळ आणि डाळींचे पीकदेखील घेतले जाते. घराच्या वापरासाठी लागेल तेवढ्या धान्याची साठवणूक केल्यानंतर उरलेले धान्य ते विक्रीसाठी पाठवतात.
शेतातही त्यांनी सोलर ड्रायर बसवला आहे. याठिकाणी ते तुलस, कडीपत्ता, सारख्या वनस्पतींची पाने सुकवून त्यांची पावडर बनवतात.

त्यांच्या घरात कमीतकमी रासायनिक वस्तू वापरायल्या जातात. कपडे धुण्यासाठी साबणाऐवजी रीठ्याचा वापर केला जातो. भांडी घासण्यासाठीही राख वापरली जाते. त्यांचे म्हणणे आहे की, ही जीवनशैली स्वीकारल्यापासून ते अधिक सुखी आणि स्वस्थ आहेत. तरीही केवळ आमचे पाहून किंवा आमच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही या पद्धतीचे जीवन जगू नका. आधी तुमच्या घरातील ज्या सुखसोयीच्या वस्तू आहेत त्यावरील अवलंबन कमी करा. हळूहळू तुम्हालाही सध्या जीवनशैलीची सवय होऊन जाईल. एकमद जर तुम्ही बदल करायला गेलात तर तो बदल तुम्हाला मानवणार नाही, असे त्या दोघांचे मत आहे.
नौशाद्या आणि सुधाकर यांची ही जीवनशैली म्हणजेच आपली खरी संस्कृती आहे, जी नैसर्गिक घटकांचा वापर आणि आदर यावर भर देते.

तुम्हालाही तुमच्या धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आला असेल तर, त्यापासून मुक्त कसं व्हायचं हे ठरवा आणि त्यासाठी एकेक स्टेप आखून मगच त्यावर अमंलबजावणी करा.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required